मुंबईतलं पुस्तकांचं नवं दुकान wayword & Wise

मुंबईतलं पुस्तकांचं नवं दुकान wayword & Wise

बोरीबंदर स्टेशनमधून बाहेर पडल्यावर
समोर दिसतो एक कबूतर खाना. तिथं असंख्य कबूतरांची फडफड आणि गुटरगू. अखंड. तिथंच उजव्या
हाताला आहे पुस्तकाचं नवं कोरं दुकान. Wayword and Wise.
इमारत ब्रिटीश आहे. स्वतःचं एक स्वतंत्र
व्यक्तिमत्व पांघरलेली, लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी. दुकानाची पाटी वेगळी, निळ्या
रंगाची,  लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी.
आजूबाजूला बसेस, कार, उडुपी हॉटेलं
आणि कबुतरांचा गोंगाट.
दुकानात दिव्यांचा लखलखाट नाही. 
दीर्घ काळ टिकलेल्या, मुरलेल्या गोष्टी
वातावरणात असतात. लंडनमधे, मँचेस्टरमधे, एडिंबरात जुन्या पबमधे गेल्यावर जसं वाटावं
तसं काहीसं.
दुकानात नीट मांडलेली पुस्तकं.  लगट करत नाहीत, आपल्याला चिकटायचा प्रयत्न करत नाहीत.
आदबीनं कपाटात असतात. दोन कपाटांच्या रांगेत दोन माणसं पाठीला पाठ लावून पुस्तक शांतपणे
चाळू वाचू शकतील येवढं अंतर.
आत शिरतांनाच समोर   गिरकी 
घेऊ शकणाऱ्या पुस्तकाच्या कपाटावर प्रिमो लेवी यांची चार पुठ्ठा बांधणीची पुस्तकं
एका खोक्यात ठेवलेली दिसतात. किमत सहा हजार रुपये.
कोण हा प्रिमो लेवी?
“Monsters exist, but they are
too few in number to be truly dangerous. More dangerous are the common men, the
functionaries ready to believe and to act without asking questions.”  असं म्हणणारा.
प्रिमो लेवी हिटलरच्या ऑशविझ छळछावणीत
होता. तिथून तो वाचला. इटालीत आपल्या गावी परतला. त्यानं कथा, कादंबऱ्या लिहिल्या.
तो अनुभवानं, विचारपूर्वक अश्रद्ध  होता.
इंग्रजी साहित्यातला तो ऑलटाईम मोठा
लेखक, विचारवंत मानला जातो. त्याच्या कादंबऱ्या, लेख, कथा, निबंध माणसं सतत वाचत असतात.
उत्तम छपाई केलेले त्याच्या साहित्याचे वरील खंड नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या खंडांच्या
निमित्तानं  न्यू यॉर्करनं युरोप सतत प्रिमो
लेवीची आठवण कां काढतात ते लिहिलं होतं. तो मजकूर प्रसिद्ध होत असतानाच इकडं मुंबईत
लेवीचे खंड  वेवर्ड अँड वाईजमधे पोचले होते.
हे खंड विकत घेणारी माणसं मुंबईत थोडीच असतील, पण आहेत.
पुढं गेल्यावर कपाटांत जपानी, आफ्रिकन,
अमेरिकन, द. अमेरिकन, पोलिश, तुर्की इत्यादी साहित्यातली निवडक पुस्तकं दिसतात.
पुस्तकं पहात पुढं सरकलं की डाव्या
बाजूला  कोपऱ्यात टेबलं आणि खुर्च्या मांडून
ठेवलेल्या दिसतात. सध्या त्या रिकाम्या आहेत. काही दिवसांत तिथं बसून कॉफी आणि ब्राऊनी
खाता येणार आहे. आणखी काही महिन्यांनी तिथं चांगली वाईनही मिळणार आहे. 
लंडनमधे लंडन  रिव्ह्यू ऑफ बुक्सचं  दुकान आहे. तिथं दुकानाच्या कडेला कॉफी मिळते, केक्स
मिळतात आणि मद्याचे घोट घेत घेत पुस्तकं चाळता येतात. तिथं येणाऱ्या वाचकांची जातकुळी
लक्षात घेऊन खानदानी ब्रिटीश स्कॉच तयार करणारे लोक जातीवंत स्कॉच वर्षातून काही दिवस
या दुकानात पाठवतात. स्कॉच आणि पुस्तक.
हा सारा उद्योग उभारणाऱ्या माणसाचं
नाव आहे विराट चांडोक. याचं सारं आयुष्य पुस्तकांत गेलं आहे. वाचन आणि वाचन. सर्व विषयांचं.
माणूस आहे पंजाबी. घराची परंपरा आहे आर्थिक उद्योगाची. वडील धनिक व्यावसायिक. विराटला
कळायला लागलं तेव्हापासून वाचनाचा नाद. धंद्यात इंटरेस्ट नाही. वडिलांनी विराटला लहानपणापासून
पुस्तकांच्या दुकानात फिरवलं, वाचनाचा नाद जोपासू दिला.
वीसेक वर्षं झाली असतील.   वांद्र्याला एका पेट्रोल पंपात लोटस बुक स्टॉल
विराटनं चालवला होता. पेट्रोल पंपात बुक स्टॉल.  
तिथं अगदी वेचक पुस्तकं असत. विजय तेंडुलकर, बाजी कुलकर्णी इत्यादी वाचणारी
माणसं तिथं दर आठवड्याला फेरी मारत. काही तास पुस्तकं आणि विराटशी चर्चा. वाचकाचा कल
पाहून त्यानं काय वाचावं, जगात काय नवं आलंय ते विराट सांगत असे. विराटनं लोटस सोडलं,
नंतर तो क्रॉसवर्डमधे गेला. क्रॉसवर्डच्याही काही मर्यादा होत्या. तिथं खेळणी, देखणी
पुस्तकं ठेवावी लागत कारण त्यांना गिऱ्हाईकं होती. विराट तिथं रमत नसावा. तिथंच त्याची
गाठ अतुल सूद नावाच्या एका बिझनेसमनशी पडली. अतुल बिझनेस करतो आणि त्याला पुस्तकांची
आवड आहे. उत्तम, अभिजात, निवडक पुस्तकांचं दुकान काढणं यावर दोघांचं एकमत झालं. वेवर्ड
उघडलं. उघडल्या उघडल्या काही दिवसातच रोमिला थापर दुकानात रेंगाळून गेल्या.
।।
Wayword and Wise हे दुकान तसं लहान
आहे.
 जेवढी जागा जास्त तेवढी पुस्तकं जास्त. स्योलमधलं
(द.कोरिया) क्योबो बुक
स्टोअर.  दुकानाचा कार्पेट एरिया एक हेक्टर
आहे.
 
दुकानाचे दोन मजले जमिनीच्या खाली आहेत. मांडणी चकचकीत. ब्रिटिशांच्या दुसऱ्या
टोकाची. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कपाट, प्रत्येक पुस्तकं रचलेलं टेबल वाचकांना आपल्याकडं
खेचायचा प्रयत्न करत. रंग, दिवे यांच्या मदतीनं. 
पुस्तकाची कव्हरं फ्लोरोसंट रंगाची. हे पुस्तक बघू की ते पुस्तक बघू असं होतं.
बहुतांश पुस्तकं कोरियन भाषेतली. सर्व
विषयातली. इंजिनियरिंग असो की टेक्नॉलॉजी की मेडिसीन, सर्व विषयातलं अद्यावत ज्ञान
कोरियन भाषेत.  पुस्तकांची छपाई, मांडणी, फाँट्स,
चित्रं वगैरे सारं काही आकर्षक. एका पुस्तकात शस्त्रक्रियेबद्दल काही तरी लिहिलेलं
असतं. कोरियन भाषेत. त्यामुळं काय लिहिलय ते कळत नाही. पण तिथं काढलेली आकृती आणि ऑपर्शन
थेटराचा फोटा या गोष्टी पहातच रहाव्याशा वाटतात.
इंग्रजी पुस्तकं कमीच.
एका पुस्तकावर इंग्रजी अक्षरं दिसतात.
उत्सुकतेनं पहावं तर त्या पुस्तकावर लिहिलेलं असतं की या पुस्तकात दिलेले शब्द आणि
वाक्य कोरियन नसलेल्या लोकांनी कृपया जपून, काळजीपूर्वक वापरावीत. पुस्तक उघडल्यावर
कोरियन आणि इंग्रजी भाषेत मजकूर असतो.  कोरियन
भाषेतल्या शिव्या, अपशब्द. पुस्तक चाळू लागलं की दुकानातली मदत करणारी कोरियन मुलगी
गालातल्या गालात हसत, लाजत विचारते, काही मदत हवीय का. पुस्तकातलं एक पान उघडून त्यातली
एक त्यातल्या त्यात मुळमुळीत असभ्य ओळ ती वाचून दाखवते.
दुकानातला एकच मजला फिरता फिरता पाय
दुखतात. दाम खात, दुकानातच असलेल्या दोन खाणावळीत थांबत थांबत, खात पीत एकेक दालन फिरायचं.
जागोजागी मदत करण्यासाठी माणसं.
किती पुस्तकं आहेत या दुकानात?
२३ लाख.
शनिवार रविवारी सव्वालाख माणसं दुकानात
फेरी मारतात.
00

9 thoughts on “मुंबईतलं पुस्तकांचं नवं दुकान wayword & Wise

  1. पुस्तकाचं वेड लावणारा विराटचा बाप ग्रेट आणि ते वेड आजच्या काळात तगवू शकणारा मुलगा बापापेक्षा ग्रेट
    तुमच्या अप्रतिम लिखाणामुळे माझ्या अंगा खांद्याला मनाला पुस्तकाच्या पानांचा तो खास वास लिंपून राहिला आहे (अनंत अमेंबल ).

  2. खरतर माझ्या घरापासून जवळ आहे. आता जायलाच हवे. प्रिमो लेवी फार पूर्वी वाचल्याचे आठवत आहे पण आता परत एकदा nostalgia!! सुंदर लेख.

  3. आपण एकेका पुस्तकांच्या खजिन्याची माहिती देत आहात. हे तर आपल्या मुंबईत असून अजून कसा पत्ता लागला नाही याचे आश्चर्य वाटले. त्या विराट चांडोक यांना धन्यवाद.
    मंगेश नाबर

  4. सर गेल्या काही दिवसांपासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुकवरही तुम्हाला मेसेज पाठविला आहे. तुमचा फोननंबर मिळू शकेल का?

  5. फार गरजेची गोष्ट या माणसाने केलीय. चांडोक सारखी माणसं वाढायला हवीत. जागतिकीकरणाचा खरा अर्थ जाणून घेणारी.

  6. Grate information sir,now whenever I ģo to Mumbai, I will see the place & purchase desired books . previously I used to go to 'landmark' Andheri. Good day Sir!

  7. धन्यवाद, निळू. मोलाची माहिती पुरवलीस, तीही तुझ्या खास शैलीत .
    जगात मझा घेण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत, हे आजच्या काळात मुद्दाम सांगावं लागतं . तू ते काम, मझा घेत करतोस , हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *