बलुचिस्तान फुटतोय
बलुचिस्तान फुटू मागतोय
बलुचिस्तानात पुन्हा एकदा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानचं लष्कर यांच्यात अनेक चकमकी झाल्या. ९२ बलुचसेना लढवैये आणि ३३पाकिस्तानी सैनिक मारले गेले. हे आकडे पाकिस्तान सरकारनं दिले.
सुमारे वर्षभरापूर्वी एका ट्रेनवर बलुचसेनेनं हल्ला केला होता. त्या ट्रेनमधे सर्वसाधारण प्रवासी होते आणि पोलिस-सैनिकही होते. पोलिस-सैनिक होते म्हणूनच बलुचसेनेनं हल्ला केला असावा. आत्ता झालेले हल्ले पाकिस्तानातले तुरुंग, पोलिस चौक्या, सैन्याची केंद्रे इत्यादींवर होते.
बलुचांना वाटतं की बलुचिस्तानातली नैसर्गिक वायू, तांबं, कोळसा आणि सोनं ही बहुमोल संपत्ती पाकिस्तान वापरतं, त्या बदल्यात बलुचिस्तानला काही देत नाही. पाकिस्तानचा विकास होतो पण ज्या बलुचिस्तानच्या जिवावर विकास होतो त्या बलुचिस्तानला विकासापासून वंचित ठेवलं जातं.
बलुच लोकांचं हे दुखणं पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्षिलं. त्यातून लिबरेशन आर्मी तयार झाली. आमचा विकास करा नाही तर आम्ही फुटून निघू, स्वतंत्र बलुचिस्तान स्थापन करू असं या सेनेचं म्हणणं आहे.
अशीच परिस्थिती पूर्व पाकिस्तानात होती. बंगाली भाषिक बहुसंख्य होते, पाकिस्तानातली निर्यात पूर्व पाकिस्तानातून होत होती, तरीही पूर्व पाकिस्तानात बेकारी होती, आर्थिक विपन्नावस्था होती, सरकारात आणि लष्करात बंगाली माणसालाचं स्थान नगण्य होतं. असमतोल दूर करा अशी मुजीबुर्रहमान यांची मागणी होती. पाकिस्तान सरकारनं दुर्लक्ष केलं, मागणी लष्करी टाचेखाली चिरडली. त्यातून बांगला देश निर्माण झाला.
बलुचिस्तान फुटेल अशी भीती पाकिस्तानला वाटतेय पण त्यावर योग्य ती उपाययोजना करणं पाकिस्तानला जमत नाहीये. बलुचसेनेला दडपलं की बलुच बंड शमेल असं पाकिस्तानला वाटतंय.
बलुच फुटीरांना भारत मदत करतंय असा पाकिस्तानचा आरोप आहे. भारतानं या आरोपाचा इन्कार केलाय. पाकिस्तानला भारता विरोधात पुरावे देता आलेले नाहीत.
भारत बलुच फुटीरांना मदत करत नसलं तरी इतर देश मदत करणार नाहीत याची खात्री देता येत नाही.
उदा. अफगाणिस्तान. बलुचिस्तानची सरहद्द अफगाणिस्तानला लागून आहे. ही सरहद्द बहुतांशी काल्पनीकच आहे. माणसं, वहानं कुठूनही कुठंही सहज ये जा करू शकतात. एकेकाळी अफगाणिस्तानत रशिया आणि अमेरिका यांच्या विरोधात लढणाऱ्या जिहादीना पाकिस्ताननं बलुचिस्तानात आश्रय दिला होता. मुल्ला उमर या तालिबान प्रमुखाचा कित्येक वर्षं मुक्काम बलुचिस्तानात क्वेट्ट्यामधे होता. तिथून प्रशिक्षित व सशस्त्र झालेले तालिबान अफगाणिस्तानात हल्ले करत आणि पुन्हा पाकिस्तानात परतत.
आता ती येजा उलट्या बाजूनं होऊ शकेल. बलुचसेनेचे सैनिक पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करतील आणि पाठलाग झाला की अफगाणिस्तानात जातील. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातले संबंध खूपच बिघडलेले असल्यानं इतकी साधी मदत अफगाणिस्तान नक्कीच करेल.
इराणचा सत्ताधारी शहा याच्या विरोधात बंड करणारे अली खोमेनी शेजारच्या इराकमधे आश्रय घेऊन होते. हिटलरनं फ्रान्स काबीज केल्यावर डी गॉलनी ब्रीटनचा आश्रय घेऊन फ्रेंच सरकारविरोधात लढा चालवला होता. एकेकाळी मुक्ती बाहिनीनं भारतात आश्रय घेतला होता आणि आता शेख हसिनानी भारतात आश्रय घेतला आहे.खालिस्तानी कॅनडात आश्रय घेतात आणि कॅनडातले आर्बर्टा प्रांतातले फुटीर कदाचित अमेरिकेत आश्रय घेतील.
समाजात अनेक घटक असतात. आर्थिक हिशोबात काही घटक मागे पडलेले असतात. आपण मागे पडलो याची अनेक कारणं हे घटक शोधतात. दुर्लक्षिलो गेलोय, आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना त्या घटकात निर्माण होते. ती भावना कधी थंड पडते, कधी तीव्र होते; समाज देशातून बाहेर पडू मागतो. हा मामला पुर्णपणे तो घटक आणि तो व्यापक समाज यांच्यातला असतो.
कधी कधी न्यायाची भावना किंवा मानवतेची भावना म्हणून इतर देश फुटीराना मदत करतात. कधी कधी राजकारण म्हणून मदत करतात. बांगला फुटीरांना भारतानं केलेली मदत मानवी होती आणि राजकीयही होती.
बलुचांबाबत भारताची भूमिका काय असावी?
भारतानं त्यात न पडलेलं बरं. हिंसेचा वापर न करता पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांनी हा प्रश्न आतल्या आत सोडवावा; त्यांनी मागणी केल्यास भारतानं मदत करावी.
।।
निळूदामले डॉट कॉम