देश उंदराचा पुतळा उभारतो

देश उंदराचा पुतळा उभारतो

 कंबोडियानं मागावा नावाच्या  उंदराचा एक पुतळा आंगकोर वाट या स्थळी उभारलाय. आफ्रिकेतून हा उंदीर कांबोडियानं आयात केला होता.  

मागावा ७० सेंमी लांबी-उंचीचा होता. पुतळा २.२ मीटर उंचीचा आहे.

आंगकोर वाट हा एक मंदिरांचा काँप्लेक्स आहे, तिथं अनेक मंदिरं आहेत. ११ व्या शतकात विष्णू या देवाची आठवण म्हणून तत्कालीन राजा सूर्यवर्मन या राजानं आंगकोर वाट उभारलं. नंतर त्याचं रुपांतर बुद्ध मंदिरांमधे झालं. आंगकोर वाटमधल्या १००० मंदिरांमधे हा उंदीर पुतळा असेल.

विष्णू,बुद्ध, उंदीर.

उंदराचा पुतळा कां?

मागावानं १०० भूसुरूंग शोधले. मागावा जमीन हुंगत फिरत असे, त्याला जमिनीत खोलवर पुरलेल्या सुरुंगाचा वास येत असे. सुरंग काढणारी माणसं मागावाला जमिनीवर फिरवत, मागावानं सुरुंग हुडकला की सुरूंग निकामी केला जात असे. वीसेक फूटबॉल मैदानां येवढ्या जमिनीतले सुरुंग त्याच्यामुळे निकामी झाले. किती तरी माणसांचे प्राण वाचले, किती तरी माणसं अपंग होण्यापासून वाचली.

भूसुरुंग ही एक खतरनाक गोष्ट असते. खड्डे करून ते पुरले जातात, वर माती पसरली जाते. खाली सुरुंग आहे हे कळत नाही. वरून वाहन गेलं की धडाम. बरेच वेळा त्यावरून माणूस गेला तरी त्याचा स्फोट होत असे, माणूस मरत असे किंवा अपंग होत असे. नुकसानीचा आकार सुरुंगाच्या शक्तीवर अवलंबून असे. सुरुंग हे युद्धातलं एक जुनं हत्यार आहे.

आधुनिक काळात सुरुंग विषयक कायदा आहे. सुरुंग कुठं कुठं पेरले आहेत याची माहिती सुरुंग पेरणाऱ्या सैन्याजवळ असायला हवी असा कायदा आहे. युद्ध संपल्यानंतर ती माहिती सार्वजनिक व्हायला हवी कारण नंतर त्या माहितीच्या आधारे सुरुंग निष्प्रभ करणं शक्य होतं. 

सैन्यामधे सुरुंग पेरणारी एक तुकडी असते. सुरुंग पेरताना त्या त्या क्षेत्रफळाचा नकाशा तुकडीजवळ असतो, नकाशावर ती तुकडी नोंदी करत जाते.

युद्ध सुरु झाल्यावर सैन्याला पुढं सरकत असताना सुरुंग शोधावे लागतात, निकामी करावे लागतात. अनेक वेळा कुठल्या तरी वाटेनं सुरुंग फोडले जातात, नंतर सैन्याची तुकडी (पायदळ, रणगाडे दळ, तोफखाना) पुढं सरकतो.

१९८० सालच्या इराक इराण युद्धात इराणी सैन्यानं एक अघोरी उपाय योजला होता. आठ दहा वर्षाची मुलं रणात पाठवली. ती मुलं पुढं जाताना सुरुंग फुटत, जमीन निर्धोक होत असे नंतर  इराणी सैन्य पुढं सरकत असे. या नादात हज्जारो छोटी मुलं मारली गेली. इराण त्या मुलांना शहीद म्हणून गौरवत असे.

कंबोडिया हा जगातला सर्वात जास्त सुरुंगवासी देश आहे. तिथं अजूनही ४० ते ६० लाख सुरुंग जमिनीत चार ते सहा मीटर खोलवर निवांत पहूडले आहेत.

कुठून आले हे सुरुंग?

सुमारे १९७० पासून सुरुंग पेरणी सुरु झालीय. कंबोडियाचा राजकीय इतिहास याला कारणीभूत आहे.

कंबोडियाच्या पूर्वेला वियेतनाम आहे, उत्तरेला लाओस आणि चीन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्या विभागात उलथापालथी सुरु झाल्या. वियेतनाममधे फ्रान्स, अमेरिका घुसलेलं होतं. दोन्ही भांडवलशाही देश. वियेतनाम (उत्तरेचा भाग) आणि उत्तरेला चीन हे कम्युनिष्ट देश होते. जगाची वाटणी करण्यात भांडवलशाही आणि कम्युनिष्ट देश गुंतलेले होते. 

वियेतनाम प्रकरण धगधगायला लागलं तेव्हां शेजारच्या कंबोडियावर वर्चस्व असणं कम्युनिष्ट आणि भांडवलदारांना आवश्यक होतं. कारण तिथून उत्तर वियेतनाममधले कम्युनिष्ट लढवय्ये अमेरिकेनं व्यापलेल्या दक्षिण वियेतनाममधे पोचत असत.

छोटे देश बळीचा बकरा असतात.  प्रत्येक बलवानाला बकरे हवे असतात.  कंबोडियाचा एक राजा असे, तो स्थानिक ख्मेर वंशाचा होता; ना कम्युनिष्ट ना भांडवलशाही अशी स्थानिक कंझर्वेटिव प्रजा त्याच्या पाठी असे.  राजा आपलं स्वातंत्र्य टिकवण्याच्या नादात  परिस्थिती पाहून कधी कम्युनिष्टांकडं जात असे कधी अमेरिकेकडं. 

कंबोडियात चिनी वळणाचे कम्युनिष्ट, वियेतनामी वळणाचे कम्युनिष्ट, अमेरिकी आणि स्थानिक कंझर्वेटिव असे ढोबळ चार गट झाले. त्यांची आपसात मारामारी चाले, प्रत्येक गटाला देश आपला असावा असं वाटत असे. प्रत्येक गटाला अमेरिका, चीन, रशिया, वियेतमान यांच्याकडून मदत मिळत असे.

हे सर्व गट आणि त्यांना खेळवणारे बलवान देश सतत एकमेकाशी मारामारी करत असत. लढाया करण्याची सामग्री, सुरुंग वगैरे, त्यांना पुरवली जात असे. त्या खटाटोपात कंबोडियात सुरुंग पेरले गेले. मरणारी माणसं कंबोडियन आणि मारणारी माणसंही कंबोडियन.  चीन-रशिया-अमेरिका मजा पहात असे.

आजही कंबोडिया आणि शेजारचा थायलंड या दोन देशात मारामारी चालूच आहे.

तर मुद्दा येतो सुरुंगांचा. १९७० पासून जमिनीत झोपलेले सुरुंग सतत फुटत असतात. कारण त्यांचा रेकॉर्ड अमेरिका, चीन, रशिया आणि कोणीकोणी उपलब्ध करून देत नाहीत. एक नोंद सांगते की १९७९ पासून आजवर ६५ हजार माणसं सुरुंगामुळं मेलीत, तितकीच जखमी झालीत.

सुरुंग शोधण्याचं आजपर्यंत उपलब्ध असणारं तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री मर्यादित काम करू शकतं. एका टेनिस कोर्टाच्या आकाराच्या जमिनीखालचे सुरुंग शोधायचे असतील तर आज एका माणसाला चार दिवस लागतात. त्यात जरा चूक झाली तर शोधक मेलाच समजा.

मागावा उंदराचं वजन होतं सुमारे सव्वा किलो. तेवढ्या वजनाचा परिणाम सुरुंगावर होत नाही. मागावाला खास प्रशिक्षण दिलेलं होतं. तो तुरुतुरू पळत जमीन हुंगत असे. वास आला की तसं दर्शवत असे. २०१६ साली मागावा कंबोडियात पोचला. २०२२ साली मरेपर्यंत त्यानं १०० सुरुंग शोधून दिले. त्याबद्दल त्याला सुवर्णपदकही देण्यात आलं होतं.

गणपतीच्या काळात युद्धंबिद्धं होत होती काय? त्यासाठीच गणपतीनं उंदराला वाहन केलं होतं की काय?

।।

Comments are closed.