पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

 अली अकबर पॅरिसच्या सेंट जर्मन या वॉर्डात अजूनही पेपर विकतात. त्यांचं वय आहे ७३.

अलिकडं लोक त्याला पेपर विकत घेण्यापूर्वी थांबवतात. विचारतात ‘अरे तूच ना तो अली अकबर? तुलाच प्रेसिडेंट मॅक्रॉननी राष्ट्रीय किताब देऊन गौरवलं होतं ना?’

अली अकबरचा एलीसी पॅलेसमधे एका समारंभात सत्कार झाला, फ्रेंच अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याच्या गळ्यात एक पदक टांगलं. मॅक्रॉन म्हणाले ‘तू फ्रान्सचा गौरव आहेस. तू पॅरिसची सेवा केलीस त्या बद्दल फ्रान्स तुझा ऋणी आहे.’

मॅक्रॉननी पदक देताना एक छोटंसं भाषण केलं. त्या भाषणात अली अकबरनं सोसलेल्या क्लेषांचा उल्लेख केला. 

पॅरिसची ही एक गंमतच आहे. एक पेपर विकणारा माणूसही पॅरिसला मोठा वाटतो.

अली अकबर रावळपिंडीचे. घरची गरीबी. आठ भावंडं. काम शोधण्यासाठी देशाबाहेर पडले. युरोप गाठायचं होतं.अफगाणिस्तान, इराण, तुर्किये असा प्रवास करत निघाले. व्हिसा मिळत नव्हता. आड वाटा घेत ग्रीसमधे पोचले. ग्रीसमधे बोटीवर खलाशी म्हणून काम केलं. व्हिसा नव्हताच. शेवटी पॅरिसमधे पोचले.

कागदपत्रं नाहीत, व्हिसा नाही, काम मिळालं तर व्हिसा मिळणार होता, पण या माणसाला काम कोण देणार? एका मित्रानं सांगितलं पेपर वीक. 

ल माँद या प्रतिष्ठित पेपराच्या प्रती विकू लागले. ल माँद डाव्या विचारांचा पेपर.

१९७२-७४ चा सुमार होता. पॅरिस तसं लहान होतं. पॅरिसमधला एकेक वॉर्ड म्हणजे एक गावच असायचं. हॉटेलं, बार, फूटपाथवर कॉफी टेबलं. संध्याकाळ झाली की पॅरिस गजबजायचं, रंगेल व्हायचं. बारमधे, कॉफीच्या टेबलावर बसून ज्याँ पाल सार्त्र, सिमन दी बुवा अशी मातबर वैचारिकं गप्पा छाटायची. त्यांच्या भोवती त्यांचे विद्यार्थी, चाहते. मामला एकदम आंतरराष्ट्रीय व्हायचा. त्यांना भेटायला युरोपभरून, अमेरिकेतून साहित्यिक, विचारवंत, राजनेते यायचे. त्यांच्या टेबलावर ल माँद असायचं.

तिथंच एकाद्या टेबलावर फ्रान्सचे अध्यक्ष मितराँ बसलेले असायचे. अली अकबरकडून पेपर घ्यायचे.

अली अकबर हाळी देत पेपर विकत असत. पेपर विकत घेणाऱ्या माणसाशी हसून काही तरी बोलत , एकादा चुटका सांगत. अली अकबर त्या परिसराचा एक अटळ अंश झाला होता.  

दिवसभर पेपर विकायचा, रात्री पुलाखाली झोपायचं. चार बरे पैसे मिळायला लागल्यावर एका अस्वच्छ इमारतीतल्या काळोखी, कोंदट खोलीत राहू लागले. जमेल तसे चार पैसे आईला पाठवायचे.

यथावकाश त्यांनी एक बरं घर  घेतलं. लग्न केलं. संसार सुरु झाला. मुलं शिकू लागली.

पॅरीस मोठं होऊ लागलं. गर्दी वाढू लागली. सार्त्र, बुवा अशी मातबर माणसं नाहिशी झाली. पाठोपाठ इंटरनेट आलं. मजकूर डिजिटल झाला, छापील पेपर बंद होऊ लागले. ल माँद सारख्या पेपरांनी संकटं झेलत पेपर चालू ठेवला, कमी प्रती छापू लागले. अली अकबरचं उत्पन्न कमी होऊ लागलं.

बदललेल्या वातावरणात चक्रम,विक्षिप्त, मनस्वी, डावे वगैरे वळणाचे फ्रेंच लोक मात्र टिकून राहिले. त्यांची संख्या भले कमी झाली असेल.  माजी पंतप्रधान एदुआर्द फिलिपे, एमॅन्युएल मॅक्रॉन    फ्रेंच तऱ्हेवाईकपणा टिकवत सेंट जर्मनमधे टवाळक्या करत राहिले.  अगदी काल परवा पर्यंत सेंट जर्मनवरच्या बार आणि कॉफी हाऊसमधे ते लोकांशी तावातावानं चर्चा करताना दिसत. 

जाता जाता. सेंट जर्मनवरचं इंटेक्चुअल, साहित्यिक वातावरण अजूनही शिल्लक आहे. आता मायकेल होलबेक हा उजवा, अतिरेकी उजवा कादंबरीकार आणि बुद्धीवादी तिथं दिसतो. सेंट जर्मनच्या डाव्या वातावरणातल्या डाव्यांशी तो झुंजत असतो. जोरात वादावादी होत असते. होलबेकचा डाव्या ल माँदवर खुन्नस आहे. तो ल माँदला झुरळ, सरडा अशी विशेषणं लावत असतो. त्याच्याशी झुंजणाऱ्यांच्या बगलेत ल माँद असतो.

फ्रान्समधेही उजवी सांस्कृतीक लाट आहे. मरीन ल पेन जोरात आहे, तिला आणि तिच्या नॅशनल फ्रंट पक्षाला खूप अनुयायी मिळत आहेत, सर्व डाव्यांनी एकजूट करून तिला सत्तेबाहेर ठेवलंय. थोडक्यात असं की पारंपरीक डावी लाट आता फ्रान्समधे ओसरली आहे. त्याचा परिणाम अर्थातच ल माँदवर झाला आहे.

अली अकबर सांगतात की आता ते ल माँदच्या फार तर २० प्रती विकतात. इतरही साप्ताहिकं, दैनिकं ते आता विकतात. पण बहुदा त्यांचं मन त्या पेपरात रमत नसावं. कधी कधी काय होतं की पेपर विकणारा माणूस एकाद्या पेपरात गुंततो, त्या पेपरचा चाहता होऊन जातो.तसंच अली अकबरचं झालं असणं शक्य आहे.

अली अकबर थांबायला तयार नाहीत. लोक पेपर घेवोत न घेवोत अकबर पॅरिसच्या फूटपाथवर हिंडतात. कारण तेच त्यांचं जगणं आहे. घरी बसून काय करायचं?

‘मला राष्ट्रीय सन्मान मिळाला हे मला खरंच वाटत नाहीये. सन्मान मिळाला म्हणजे काय झालंय? खरं सांगू? इथपर्यंत पोचत असताना ज्या जखमा मला झाल्या आहेत त्यावर एक सुखकारक मलम मॅक्रॉननी लावलंय. पॅरिस बदललंय. मी आलो तेव्हां छोटछोटी दुकानं होती, आता मॉल आलेत. खाटीक होता, सकाळी ताजं मास घ्यायला लोक यायचे. आता कोल्ड स्टोरेजमधून मांसाच्या पिशव्या घेतात. नवे चेहरे, नवे पेहराव, सारं मला अनोळखी आहे. तरीही मी थांबणार नाही. जोवर वरून बोलावणं येत नाही तोवर मी पेपर विकणार, त्यांची संख्या पन्नास असो की पाच की एक.’

अली अकबर हा पॅरिसचा पन्नास वर्षाचा चालता बोलता इतिहास आहे. 

आपण आपल्या शहरातलं लहानपण आठवून पहावं. एकाद्या स्थानिक अली अकबरची आठवण नक्की येईल.

।।

Comments are closed.