नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

आपण सर्रास ओ द कोलोन हे परफ्युम वापरतो.

नाना कंपन्यांनी तयार केलेलं कोलोन परफ्युम आपण वापरतो. अलीकडं ओ द कोलोनमधे कंपन्यांनी आपापले स्वतंत्र गंध मिसळले आहेत. बाजारात मिळणारं कोलोन हे एका परीनं भेसळच असतं.

कोलोन हे परफ्युम आहे. कधी कधी परफ्युमला अत्तर असंही संबोधलं जातं. ते बरोबर नाही. परफ्युम अल्कोहोलमधे सुगंधी तेल मिसळून तयार केलेलं असतं. अत्तरात अल्कोहोल नसतं, अत्तर नैसर्गिक तेलात तयार करतात, त्यात वापरलेली सुगंधी द्रव्यं फुलांमधून, वनस्पतीतून घेतली जातात. ते सुगंधी घटक नैसर्गिक असतात

परफ्युम लवकर उडतं, त्याचा वास मिनिटांत, तासांत जातो. अत्तर मात्र दीर्घ काळ टिकतं.

ओ द कोलोन नेपोलियन वापरत असे. ( तो जे परफ्युम वापरत असे त्याची शुद्धता आणि आपण वापरतो त्यातली शुद्धता यात खूपच फरक आहे.)नेपोलियनला कोलोनचं वेडच असे. तो कपड्यांवर कोलोन शिंपडत असे, आंघोळीच्या पाण्यात कोलोन मिसळत असे, काही पदार्थांवरही तो कोलोन पसरत असे. घरात, ऑफिसात कोलोनच्या बाटल्या आसपास असत. लढाईवर जातानाही तो कोलोनच्या बाटल्या सोबत ठेवत असे. ऐन लढाईतही त्याच्या कपड्यांना कोलोनचा सुगंध येत असे.

ज्याँ फारिना हा सुगंध निर्माता त्यानं पदरी बाळगला होता. त्यानं स्वतः तयार केलेलं कोलोन नेपोलियन वापरत असे. फारिना जर्मनीत कोलोनमधे रहात असे, त्याचा कारखानाही कोलोनमधे होता. नेपोलियनसाठीच केलेलं कोलोन तो पॅरिसमधे पोचवत असे.

कोलोन तयार करण्याचा फारिनाचा एक खास फॉर्म्युला होता. संत्रं, कडू संत्रं, कडू संत्र्याच्या फुलांचा अर्क, रोझमेरी या एका झुडुपातून काढलेलं द्रव्यं फारिना त्याच्या विशिष्ट पद्धतीनं एकत्र करत असे.

फारिनाचे आजोबा इटालियन होते. १९०७ साली त्यांनी कोलोनचा फॉर्म्युला तयार केला होता. फारिनाचे वडील जर्मनीत स्थलांतरीत झाले. त्यांनी वडिलांचा वारसा कोलोनमधे नेला. तिथं त्यांनी सुगंधद्रव्याचं उत्पादन आणि व्यापार सुरु केला. आजही कोलोन हे सुगंधीद्रव्य उत्पादनाचं एक मोठं केंद्र आहे, तिथून सुगंधी द्रव्य जगभर निर्यात होतात.

फारिनानं कोलोन व इतर सुगंधी द्रव्यांचे फॉर्म्युले लिहून ठेवले. लिहिले असले तरी त्याचं पुस्तक केलेलं नसल्यानं ते गुप्त होते. फारिना कोलोनचे अनेक प्रकार तयार करत असे पण नेपोलियनसाठी केलेलं कोलोन अद्वितीय असे, त्याचा फॉर्म्युला गुप्त राहिला पाहिजे अशी नेपोलियनची ताकीद होती.

एक गंमत. परफ्युमचा असतो तसा शाईचाही एक फॉर्म्युला असतो. शाईची पूड,पाणी,शाई सुकू नये म्हणून वापरलेलं विशिष्ट द्रव्य यातून शाई तयार होते. शाईचं प्रवाहीपण आणि ती किती वेळात सुकते हा शाईतला एक महत्वाचा घटक असतो. निबात आणि कागदावर लिहीपर्यंत शाई सुकता कामा नये हा महत्वाचा मुद्दा असतो. पेनातून निबात आणि निबातून कागदावर या प्रवासासाठी लागणाऱ्या काळात शाई प्रवाही असावी लागते. हवेत आर्द्रता किती आहे, हवेचं तपमान काय आहे या गोष्टी महत्वाचं असतात. पर्वतात शाई थिजेल, वाळवंटात सुकेल. भारत, अरबस्तान,युरोप,अमेरिका अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाया वेगळ्या कराव्या लागत असतात.

आता अशीही शाई करतात जी फक्त एकाच माणसासाठी तयार केली जाते. शाईचा फॉर्म्युला त्या एकाच माणसासाठी असतो, दुसऱ्या कोणाला तो दिला जात नाही. याची अर्थातच जबर किमत शाई निर्माता घेत असतो. ती शाई आणि ती वापरणारा माणूस याचं रेकॉर्ड शाई निर्माता गुप्त ठेवत असतो.त्या शाईनं केलेला कागद, केलेली सही कोणाची आहे हे शाई निर्माते सांगू शकतात.

अगदी तसंच ओ द कोलोनचं. नेपोलियनचं कोलोन वेगळं. फारीनाच सांगू शकत असे की नेपोलियनचं कोलोन कोणतं.

परफ्यूम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्यांनी परफ्यूम म्युझियम करायचं ठरवलं. त्यांनी जगभरचे परफ्युम गोळा करायला सुरवात केली. त्यांनी जगभरची ठिकाणं धुंडाळून परफ्युमच्या बाटल्या मिळवल्या. त्यांना कुठं कुठं परफ्युम शिंपडलेले कपडे मिळाले. फ्रान्समधे परफ्युम हुंगण्यासाठी रुमालावर शिंपडलं जात असे. असे कोणाकोणाचे रुमाल त्यांना सापडले. काही बाटल्या आणि वस्तू तर दोन हजार वर्षं जुन्या होत्या. त्यावरचे परफ्युमचे अवशेष अगदीच पुसट आणि नसल्यागत झाले होते. त्यातून मूळ परफ्युम शोधणं हे कष्टाचं काम होतं. आधुनिक रसायन ज्ञान आणि तंत्रं वापरून त्यांनी मूळ परफ्यूम निश्चित केलं.

या साऱ्या प्रयत्नांती त्या मंडळीनी १९९० साली फ्रान्समधे व्हर्सायमधे एक संग्रहालय तयार केलं.त्याचं नाव ऑस्मोथेक.

त्या खटपट्या मंडळींना नेपोलियनच्या राजवाड्यात कोलोनच्या बाटल्या सापडल्या. त्यांनी नेपोलियची पुस्तकं, पत्र इत्यादी जे काही मिळेल ते तपासलं. त्यात फारिनानं लिहून ठेवलेला फॉर्म्युला त्यांना सापडला. मंडळी फारिनाच्या कोलोनमधल्या कारखान्यात पोचली. फारिना १८०९ सालीच वारला होता. पण त्याचा कारखाना अजूनही चालला आहे. तिथून त्यांनी कोलोनची माहिती मिळवली.

कोलोनचा फॉर्म्युला व्हर्सायमधल्या (फ्रान्स) ऑस्मोथेक या संग्रहालयात दाखल झाला आहे.संग्रहालयात परफ्युमचे ६ हजार नमुने साठले आहेत.

नेपोलियन किंवा आणखी कोणी तत्सम मोठ्या माणसाचं सोडू पण एकूणच अनेक परफ्यूमचे फॉर्म्युले आता ऑस्मोथेकमुळं उपलब्ध झालेत. त्यांचा वापर करून अनेक जुने परफ्युम पुरुज्जीवित करण्यात आलेत. घटक योग्य प्रमाणात,योग्य काळ, योग्य वातावरणात मिसळण्याचं शास्त्र आणि तंत्र आता उपलब्ध असल्यानं अनेक नवे परफ्युम बाजारात येत आहेत.

परफ्यूम आणि अत्तरांची जागतीक उलाढाल ७० अब्ज डॉलरची आहे. परफ्यूम पश्चिमी जगात खपतात. अत्तरं मध्यपूर्व आणि आशियात खपतात.

अगदी पाच सातशे रुपयांमधेही आता नावाजलेले परफ्यूम बाजारात मिळतात.

।।

Comments are closed.