राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री

राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री

राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री 

एल्सी सलडाणाचं वय आहे ८१. कॅलिफोर्नियात फ्रेस्नो या गावात ती रहाते. घरांची साफसफाई हे तिचं काम. आपण ज्याला झाडूपोछा म्हणतो ते काम ती पोटासाठी करते. दिवसभर काही घरांत ती जाते. संध्याकाळ झाली की घरी जाऊन कपडे बदलते आणि बारमधे जाते.  

बारमधे ती काय करते? ती जे सादर करते त्याला ड्रेग (Drag) असं म्हणतात. ड्रेग या नाट्य प्रकारात पुरुष स्त्रियांच्या भूमिका करतात, स्त्रिया पुरुषांच्या भूमिका करतात. या कलाप्रकाराला व्हॉडविल, बहुरंगीढंगी, कलाप्रकार असं म्हणता येईल. कलाकार नाचतो, गातो,नकला करतो, संवाद म्हणतो, चुटके सांगतो. कधी कधी तो गाजलेल्या कलाकारांची गाणी किंवा भूमिका सादर करतो. अलीकडं ट्रॅकवर गाणी वाजवतात आणि ड्रेग कलाकार ओठ हलवतो, गातोय असं भासवतो.

एल्सी  राजाची भूमिका वठवते. 

एल्साचा राजा एकविसाव्या शतकातला सूटबुटातला राजा असतो. एकविसाव्या शतकातला सूट आणि दहाव्या शतकातली हॅट किंवा सहाव्या शतकातल्या राजाचा मुकूट.

ड्रेग करणारे खूप कलाकार आहेत. त्यांचा राजा एल्सीच्या राजापेक्षा खूपच नखशिखांत राजा असतो.  चिलखत, कंबरपट्टा, डोक्यावर शिरस्त्राण, पायात गुडघ्यापर्यंत बूट, मनगटभर पसरलेला मनगट पट्टा इत्यादी. हा राजा युरोप, रशिया, चीन, इजिप्त, अजरबैजान,इंग्लंड, फ्रान्स, रोम, ग्रीस, इत्यादी कुठल्याही देशातला असू शकतो.  

राजाला मिशा असतात, कधी नखरेल, कधी  राकट. कधी त्या ओठावर सुरू होऊन कानाच्या पलिकडं जातात, पूर्ण गाल व्यापतात. मिशा रंगवलेल्या असतात. कधी बाटलीचं बूच जाळून त्याची राख मिशा  आणि दाढी दाखवण्यासाठी वापरतात. कधी केस चिकटवतात. 

दाढीचे नाना प्रकार.

चेहऱ्यावर रंगांची उधळण. पांढरा चेहरा, लाल डोळे, पिवळ्या भुवया, लाल केस, मोरपिशी कान. काहीही. सर्व रंगांच्या दाट छटा. आपल्याकडल्या कुडीअट्टम या नृत्य प्रकारातल्या पात्राची आठवण व्हावी. जपानी पारंपरीक प्रकारातही चेहरे रंगवण्याची प्रथा आहे.

ड्रेगचे कपडे,दागिने अत्यंत कल्पक असतात, कलात्मक असतात, वेधक असतात.

अंग हलवण्यावर भर. ढुंगण हलवत राजा किंवा राणी मंचावर फिरते तेव्हां जनता खिदळते. ढुंगण आकारानं मोठं असतं. ते मोठं करण्यासाठी कापडाचे बोळे, प्लास्टिकचे बोळे वगैरे घालून ढुंगणाचा आकार वाढवतात. राजा असेल तर त्याचं लिंग त्याच्या कपड्यांतूनही उठून दिसेल अशा रीतीनं मोठं केलेलं असतं.

लोककलेचं एक वैशिष्ट्यं म्हणजे प्रमाणाची, प्रपोर्शनची ऐशी की तैशी. वास्तव अवास्तव करून मांडायचं.

ड्रेग  म्हणजे एक बहुरंगी, बहुढंगी, धमाल. या धमालीत समोरचे प्रेक्षक सामिल होत असतात. धुंदी असते, ध्वनीचा कल्लोळ असतो.  

एकेकाळी ड्रेगचा प्रयोग छोट्या जागेत होत असेल. आताशा ही धमाल बारमधे, मद्यालयात घडते. बहुतांशी हे बार समलिंगींचे किंवा लिंगबदल झालेल्या लोकांचे असतात.

 हा नाट्य प्रकार चीनमधे सहाव्या शतकात उदयाला आला. नंतर तो युरोपात पसरला. काळाच्या ओघात तो सादर करण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या. स्त्रियांना रंगभूमीवर वावरायला परवानगी नव्हती तेव्हां त्यांनी पुरुषांच्या भूमिका करायची आयडिया निघाली. भारतात वेगळीच गंमत. स्त्रीला मंचावर जाता येत नव्हतं म्हणून पुरूष स्त्री भूमिका करत होते. 

भडक रंग, वरच्या आवाजातले संवाद आणि गाणी. प्रयोग होत असताना सभोवताली वर्दळ असते, आवाज आणि रंगाची तीव्रता लक्ष वेधण्यासाठी  आवश्यक असते. 

अलीकडच्या काळात आपलं लिंगभान व्यक्त करण्यासाठी समलिंगी, लिंगबदल झालेले लोक या पद्धतीचा प्रयोग करत असतात. आपण पुरुष आहोत, आपण पुरुष झालो आहोत हे व्यक्त करण्यासाठी राजाची भूमिका. आपलं स्त्रीत्व व्यक्त करण्यासाठी राणीची भूमिका. अमेरिकेत, युरोपात आता समलिंगी आणि लिंगबदल केलेल्यांचे बार खूप आहेत. तिथं ड्रेगला वाव मिळतो. 

  ड्रेगला मार्केट नाही.ड्रेगचे शो टीव्हीवर होत नाहीत. त्यामुळं एल्सी सलडानाला ड्रेग केल्याचे फारसे पैसे मिळत नाहीत, तो हौशी उद्योग ठरतो. दूरवरच्या ठिकाणी एल्सीला बोलावतात. एल्सी ट्रेन किंवा बसनं जाते. ड्रेगसाठी लागणारे कपडेही ती स्वतःचा झोळीत भरून कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाते. 

दिवसभर प्रवास करून बारमधे पोचायचं. गेल्या गेल्या मेकअप करून प्रयोग करायचा. अलीकडं ती बरीच प्रसिद्ध झालीय. गेली साठ वर्ष ड्रेग करण्याबद्दल तिची नोंद गिनीज रेकॉर्ड पुस्तकातही झालीय. त्यामुळं जिथं जाते तिथं लोक तिच्या भोवती गोळा होतात, सेल्फी काढतात, तिचं खूप कौतुक करतात. तिला बरं वाटतं. कार्यक्रम पूर्ण व्हायला उशीर होतो. तोंडाचा रंग पुसून एल्सी बसमधे बसून आपल्या गावाकडं परतते.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून तिचं घरं स्वच्छ करणं सुरु होतं.

ड्रेग ही एक प्रकारे लोककलाच म्हणायची. शेक्सपियरनं स्क्रिप्ट लिहिलेलं नसतं. ड्रेगवाले स्वतःचंच स्क्रिप्ट करतात. लोकांचं मनोरंजन करतात. 

सहाव्या शतकापासून तर थेट अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत शहरांत, गावात छोटेछोटे समूह होते. त्या जनसमूहात लोककलांना जागा होती. समाजाची घडण आणि अर्थव्यवस्था अशी होती की  लोककलेचा आस्वाद घेणारे आणि कलाकार दोघही जगू शकत होते. 

काळ बदललाय. लोककला लोप पावू लागल्या आहेत. मनोरंजनाची साधनं, तंत्रज्ञान, आर्थिक गणीत, लोकांच्या अपेक्षा, सारं सारं बदललंय.

एल्सी सलडाना किल्ल्याचा शेवटला बुरूज लढवतेय.

।।

Comments are closed.