फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

शृंगेरी मठ. 
मंत्रोच्चारण चाललंय.
श्रीनिवासन यांच्या जानव्याच्या टोकाला बांधलेला फोन थरथरतो. सायलेंटवर असल्यानं आवाज येत नाही. सभोवतालच्या घनगंभीर मंत्रवातावरणात श्रीनिवासन मग्न.
श्रीनिवासन यांच्या अंगरक्षकाच्या ते लक्षात येतं. अंगरक्षकही धोतर नेसून त्यांच्या शेजारी बसलेला असतो. साहेबांना डिस्टर्ब करायचा धीर त्याला होत नाही.
थरथर थांबत नाही.
नाईलाजानं अंगरक्षक श्रीनिवास यांच्या मांडीवर टकटक करतो. एकदा. दोनदा. तिसऱ्या वेळी श्रीनिवासन त्रासिक नजरेनं रक्षकाकडं पहातात. रक्षक हावभाव करून फोन घ्या असं सांगतो.
श्रीनिवासन फोनकडं पहातात. क्षणभर फोन घ्यावा की नाही या गोंधळात. उठतात. हॉलच्या बाहेर येतात. मागोमाग अंगरक्षकही. 
रीनिवासन फोन कानाला लावतात.
स्वित्झर्लंडहून सेप ब्लाटरचा फोन.
‘ हल्लो सर, तुमचं अभिनंदन करू ? निवडून आल्याबद्दल ?’ श्रीनिवासन.
‘ हल्लो. अभिनंदन कसलं करतोस बोडक्याचं. अजून मतदान व्हायचंय. नवीनच लचांड. अरे इकडं माझा उपाध्यक्ष आणि इतर चौदा जणांना पोलिसांनी कोठडीत घातलंय. ‘
श्रीनिवासन मनाशी हिशोब करतात. तिकडं स्वित्झर्लंडमधे अजून पहाटच असणार. इतक्या पहाटे अटक?
 ‘ स्विस पोलिसांना शिस्त म्हणून नाही. आरामात नाष्टा वगैरे करून अटक बिटक करायची सोडून उजाडलंही नसतांना कसल्या अटका करतात. ‘ श्रीनिवासन यांच्या मनात आलं.
‘ काळजी नका करू, त्यांना सोडवता येईल. तुम्हाला पकडलं बिकडलं नाहीये ना. मग ठीक. बरं मतदानाचं काय ?’ श्रीनिवासन.
‘ मतदानाची काळजी नको करूस. ते मी मॅनेज केलंय. तजवीज झालीय. ‘ 
‘ तजवीज म्हणजे काय ? त्या वेड्या कतारीसारखं तर नाही केलस ना. गाढव साला. गेल्या वेळी त्यानं झुरीकमधे ब्राऊन पेपरच्या जाड एनवलपमधून पैसे वाटले. एनवलप येवढा जाड झाला होता की तो लोकांच्या खिशातही मावेना. गाढव साला. पेपरांनी बोंब केली.   गार्डियनचा वार्ताहर तिथ तडमडत  होता. त्यानं लगोलग लिहून टाकलं. ‘
‘ नाही बाबा. मी तसलं काही केलेलं नाही. तुझा सल्ला बरेच वेळा कामी येतो.  देशोदेशी संघटनांच्या माणसांच्या  खात्यांत पैसे जमा केलेत. ‘
‘ किती ? ‘
‘ कमाल तुझी. फोनवर सांगू ? ‘  फोनवरून अगदी हलक्या आवाजात पैशाचा आकडा.
‘ हां. ठीक. बरं पण फोन कशाला केलास ? ‘
‘ अरे बाबा ते अमेरिकन पाठी लागलेत. त्यांनी आमचे कंप्यूटर ताब्यात घेतलेत. आमचे ईमेल तपासत आहेत. आम्ही केलेले सगळे व्यवहार त्यांनी एकत्रित केलेत.’
‘ त्यांचं म्हणणं तरी काय आहे ? ‘
‘ म्हणणं कसलं आलंय.   म्हणे साऊथ आफ्रिका, फ्रान्स, ब्राझिल इत्यादी देशातल्या संघटनांनी  मला पैसे चारले आणि वर्ल्ड कपचं यजमानपद मिळवलं. फिफाकडं आलेल्या पैशातला काही पैसा म्हणे मी त्या त्या देशातल्या खेळपुढाऱ्यांकडं सरकवतो आणि ते मला अध्यक्षपदी नेमतात.’
श्रीनिवासन हसतात. 
‘ अरे हा उद्योग आपण सर्व कित्येक दशकं करत आहोत. जगातल्या सर्व खेळ संघटना हा खेळ करतात. त्यात कटकट करण्यासारखं काय आहे. आपण पैशाचे व्यवहार करतो ते यांना दिसतं, आपण खेळांचा विकास केला हे त्याना दिसत नाही. तू फूटबॉल जगात घेऊन गेलास, जपानसारख्या देशात एस्टाब्लिश केलास. मी भारतात क्रिकेट श्रीमंत केला. पाच दहा हजार रुपये मिळाले तरी खुष होणारे आमचे क्रिकेटर आता करोडोची बोली जिंकतात. याबद्दल जगानं कृतज्ञता व्यक्त करायची सोडून भ्रष्टाचाराचे आरोप करताहेत साले. ‘ 
‘ मी पैसे देतो आणि घेतो. मी कुठं नाकारतोय. मी स्विस आहे. स्वित्झर्लंडमधे अशा रीतीनं पैसे देणं घेणं कायदेशीर आहे. आमची सारी अर्थव्यवस्थाच अशा व्यवहारावर आधारलेली आहे. अमेरिकन लोकांना ते पटत नाहीये. ते म्हणतात की हा भ्रष्टाचार आहे. ‘ 
‘ अमेरिकन लोक चालू आहेत. तू २०18चा वर्ल्ड कप रशियाला दिलास यावर त्यांचा राग आहे. म्हणून ते तुझ्या पाठी लागलेत. अरे अमेरिकेला शांत नसतं कां करता आलं?  कोटीभर डॉलर त्यांच्यावर खर्च केले असतेस तर त्यांनी कटकट केली नसती. तुझ शहाणपण कमी पडलं की तुझा अमेरिकेवरचा राग आड आला? खेळात राजकारण आणायचं नाही. मी आमच्याकडं भाजप, एनसीपी, काँग्रेस, लालू सर्वांना सांभाळून घेतो, सर्वांची सोय होईल याची शक्यतो काळजी घेतो. आमच्याकडं  वीज प्रकल्प व्हायचा होता. अडकला होता. रेबेक्का मार्क नावाची अमेरिकन  बाई येऊन गेली. तिनं आमच्या पुढाऱ्यांना समजावलं. ठाकरे, पवार, महाजन यांच्या भेटी घेतल्या.   त्यांच्या पक्षाच्या लोकांचं प्रशिक्षण केलं. प्रकल्प पुढं सरकला. अजूनही वेळ गेलेली नाही. ‘
‘ अरे बाबा एफबीआयनं कोर्टात पुरावे सादर करून टाकलेत. ‘
‘ त्यानं काय फरक पडतो. कोर्टाच्या इमारतीला आग लागू शकत नाही? पुरावे जळू शकत नाहीत ?’  श्रीनिवासन.
‘ हं. कळलं. तुमची डोकी छान चालतात रे. ठाकरेंना भेटायला येऊ ? ‘ 
‘ मोठे ठाकरे वारलेत. आता त्यांची जागा दोन तरुण ठाकऱ्यांनी घेतलीय. त्यांचं खरं नाही. पवारांशी हवं तर बोलून घे. ‘
‘ हं SSSS. ‘ 
पलिकडून आवाज येईना. फोन ठेवलाय असं समजून श्रीनिवासन पुन्हा हॉलकडं वळले. पाठोपाठ रक्षक. हॉलच्या दारात पोचले, आतले मंत्रोच्चारणाचे आवाज मोठे होऊ लागले. पुन्हा फोन थरथरला.
श्रीनिवासन मागं वळले.
‘ आता काय ?’ 
‘ अरे अध्यक्षपद मिळेल. त्याची चिंता दिसत नाहीये. पण ते पद मिळायच्या आधीच ते सोडण्यासाठी दबाव येतोय.’
‘ कोणाचा ? ‘
‘ स्पॉन्सर लोक कटकट करायला लागलेत.  ४ अब्ज डॉलरचा मामला आहे. ‘
चार अब्जांचा आकडा ऐकल्यावर श्रीनिवासन यांचे डोळे चमकले.  
‘ तुम्ही लोक त्या थंडगार स्विस वातावरणात रहात असल्यानं तुमची डोकीही थंड पडतात. आमच्याकडून शिका. अरे मूर्खा तू फूटबॉल खेळाडू आणि स्पॉन्सरना कतारमधे घेऊन गेलास. तिथल्या पन्नास डिग्री तापमानात. वाळवंटात. ते वैतागले. कतार देश दाखवण्याची आवश्यकता होती कां? या लोकांना देश बिश कळत नाही, डॉलर समजतात. लास व्हेगासरा घेऊन जायचंस. तिथं प्रेझेंटेशन आणि एनवलप दिले असतेस तक काम भागलं असतं.  पत्रकार आणि खेळाडू कतारवरून परतले आणि तुझ्या नावानं शंख करू लागले. ‘
‘ मग मी काय करायला हवं होतं ?’ 
‘ लेका आधीपासूनच काळजी घ्यायला हवी होतीस.  आमच्या आंध्र प्रदेशातल्या एका मुख्यमंत्र्याचा मुलगा. त्याची एक केवळ कागदावरच असलेली कंपनी. मी तिच्यात माझे पैसे गुंतवले. त्यानं एक महालासारखा आलिशान बंगला बांधला. गरिबांचा विचार करून थकल्यावर तो त्या  बंगल्यात आराम करू लागला. आंध्राची क्रिकेट टीम माझ्या खिशात आली.  पोलिसांनी त्याच्या घरावर, माझ्या ऑफिसवर छापे मारले. आम्हा  दोघांवर  खटले भरले.  कोण्या वकिलाचं कोणत्या न्यायाधिशाशी गूळपीठ आहे ते आपल्याला बरोब्बर माहित. माझ्याकडं वकिलांची फौज होती. फोन केला. चार्टर विमानानं वकील हजर. खलास. सारे खटले कोर्टात रेंगाळत आहेत. मला कसलाही त्रास नाही. ‘
‘ तुझ्या देशात कोर्ट क्राफ्ट चालते, तिथं न्यायालय मॅन्युप्युलेट करता येतं.  अमेरिकन आणि स्विस वकिलांचं तसं नाही. मी एका महाग अमेरिकन वकिल नेमला. त्यानं चौकशीचा रिपोर्ट दिला. त्यात त्यानं खरंखरं लिहिलं आणि मीच गोत्यात आलो. या वकिलाला म्हणजे वकिली नीतीमत्तेशी प्रामाणिक रहायचं होतं. ‘ 
‘ अमेरिकन हवापाण्यातच काही तरी घोळ दिसतोय. भारतीय माणसं भारतात भारतीय असतात पण अमेरिकेत गेली की तिथल्यासारखी वागायला लागतात.  प्रित भरारा नावाचा पंजाबी वकील. त्यानं रजत गुप्ता या मोठ्या माणसाला तीन वर्षासाठी तुरुंगात पाठवलं. आपल्याच भारतीय बांधवाला कां नाही सांभाळून घेतलं. खाल्ले असतील चार पैसे. म्हणून काय झालं. चुका तर सर्वांच्याच होतात. खोब्रागडे नावाची आमची डिप्लॉमॅट. तिनं म्हणे तिच्या नोकरांना योग्य तो पगार दिला नव्हता. तिलाही यानं कोठडीत घातलं. बाबा रे अमेरिकनांशी सांभाळून वाग, त्यांना पटवत रहा.’
‘ अरे आणखी एक कटकट. आता माझी मुलगी मला सांगतेय की तू अध्यक्षच होऊ नकोस. वयाच्या ऐंशिव्या वयात पदार्पण करताना आराम करावा असं तिचं म्हणणं आहे. म्हणते की आता पुरे झालं. एक कोटी डॉलर पगार मिळतो. प्रवास, हॉटेल इत्यादींवर कितीही खर्च केला तरी तुला कोणी विचारत नाही. पुरे झालं ना. सोड आता अध्यक्षपद असं म्हणतेय. ‘
श्रीनिवासन जोरात हसतात. ठसका लागतो. रक्षक पाणी आणायला जातो. ठसका थांबतो. श्रीनिवासन फोनवर बोलू लागतात.
‘ अरे या मुलींना कळत नाही. माझ्या कंपनीत माझ्यापेक्षा जास्त शेअर्स  माझ्या मुलीच्याच नावावर  आहेत.  तिचा नवरा, माझा जावई. मुलीच्याच सांगण्यावरून मी त्याला माझ्याच चेन्नई टीमच्या व्यवस्थापनात घातलं.  पण हे चिरंजीव थोर निघाले. मॅच फिक्सिंग करायला लागले. लफडी करताना मला विचारायचं तरी. नीट व्यवस्था करता आली असती. गाढवासारखे उद्योग करून बसला,पोलिसांनी  धरलं. अजून ते प्रकरण मी निस्तरतोय. मुलीचं अजिबात ऐकायचं नाही. आपण खेळाचं कल्याण करायचं. त्यासाठी मरमर करायची. आपल्या स्वार्थासाठी नव्हे तर देश आणि खेळ यासाठी पैसे गोळा करायचे. आपल्या घरच्यांना हे सारं समजत नाही. त्यांना हवी असते फक्त चैन. त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं. कळलं? ‘
‘ बघतो कसं जमतंय ते. थँक्स. अटक होण्याची भीती आहे. मी नेमलेले डिटेक्टिव सांगताहेत की मला अटक होईल, अमेरिकन कोर्टासमोर उभं रहावं लागेल. त्याचं काय करू ? ‘ 
 ‘  तुला अटक बिटक होणार नाही. मी गॅरंटी देतो. मी करतो व्यवस्था. तू निश्चिंत रहा. असं कर.  भारतात ये. चार दिवस माझ्याकडं रहा. आमच्याकडं भारी वकील आणि नेते आहेत. जगभरचे लोक त्यांचा सल्ला घेऊ लागलेत.  त्या सल्ल्याचे पैसे स्विस बँकेत भरतात. आमच्याकडचा दाऊद इब्राहिम नावाचा एक कोकणातला माणूस आता मोठा झालाय, तो कराचीतून साऱ्या जगभर बिझनेस चालवतो.  भारतातलेच वकील, नोकरशहा, नेते त्याला सल्ला देतात. त्यांची गाठ घालून देतो. सेटिंग करून देतो. काळजी करू नकोस.   चल. फार वेळ झाला. तिकडं शंकराचार्य माझी वाट पहात असतील. चल. फोन कर. ‘

00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *