इराण झोल

इराण झोल

इराण झोल

अमेरिकेनं इराणशी युद्ध पुकारलं. ती नुसती कारवाई नव्हती, ते युद्ध होतं. वुई आर ॲट व वॉर असं डोनल्ड ट्रंप म्हणाले.

इराणशी कां युद्ध पुकारलं?

एक कारण इराणकडली अण्वस्त्रं नष्ट करणं, अण्वस्त्रं तयार करण्याची इराणची क्षमता नष्ट करणं.

इराणकडं अण्वस्त्रं आहेत काय? कोणतीच विश्वास ठेवण्यालायक माहिती उपलब्ध नाही. इतके किलो इतके टक्के विकसित युरेनियम इराणकडं आहे असं म्हणतात. किती आणि किती टक्के हे माहित नाही. इराणनं तयार झालेली स्फोटकं (बाँब) डब्यांत भरून ठिकठिकाणी नेऊन ठेवली आहेत. ती कुठं आहेत आणि किती खोलवर आहेत ते माहित नाही. ती अस्त्रं किती दूरवरच्या ठिकाणांवर इराण टाकू शकतं, त्यासाठी आवश्यक वाहनं (रॉकेट, विमान) इराणकडं आहेत की नाहीत ते माहित नाही.

गेल्या वर्षी जूनमधे अमेरिकेनं (इस्रायलनंही) इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता. अमेरिकेनं जाहीर केलं होतं की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम दुरुस्त होऊ शकणार नाही इतपत त्यांनी नष्ट केला आहे.

अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत माहिती नाही, तो नष्टही केला आहे तर अमेरिकेला इराणवर हल्ला करण्याची काय आवश्यकता होती?

मध्य आशियातली अण्वस्त्रं शोधून ती ताब्यात घेण्याचा, ती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी अमेरिकेनं करून पाहिला होता.त्या प्रयत्नात वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि सैन्य गुंतलेलं होतं. त्या प्रयत्नांचा अहवाल उपलब्ध आहे.

अहवाल सांगतो की अण्वस्त्राला हात लावणंही परम धोक्याचं असतं. ती हलवणं तर आणखीनच धोक्याचं असतं. अपघात झाला, एकादी मानवी चूक घडली तर होणारा घोटाळा महामहान असतो. किरणोत्सर्जनानं काय होईल ते सांगता येत नसतं. त्यासाठी फार काळजी घ्यावी लागते. सैनिकांची आणि वैज्ञानिकांची फौज या कामी योजावी लागते. शिवाय वाहनं आणि विमानंही लागतात. एकूणात सुमारे ७५ हजार माणसं आणि काही शेकडा वहानं लागतात असं तो अहवाल सांगतो. तितकी तजवीज करणं अशक्य आहे हे लक्षात घेऊन अमेरिकेनं तो प्रयत्न तडीस नेला नव्हता.

अशा स्थितीत अमेरिकेचे हल्ले कशासाठी आणि कशा प्रकारचे आहेत ते कळायला हवं. ट्रंप ते काहीच सांगत नाहीत. जगाला आणि अमेरिकन जनतेला ट्रंप काहीच सांगत नाहीत. काही लोच्या झाला तर?

आज अमेरिका, रशिया,फ्रान्स,युके, चीन, उत्तर कोरिया, इस्रायल, पाकिस्तान आणि भारत यांच्याकडं अण्वस्त्रं तयार आहेत. त्याची एकूण संख्या अंदाजे १२,३०० आहे.

अणुस्फोट ही किती भयंकर गोष्ट आहे हे जगानं हिरोशिमा-नागासाकीत अनुभवलं आहे. अण्वस्त्र व्यवस्थेत अपघात झाला तर काय होतं त्याचा अनुभव चेर्नोबिल आणि फुकुशिमामधे जगानं घेतला आहे. अण्वस्त्रं हे प्रकरण वापरलं तर पृथ्वीचा नाश संभवतो. हे जगाला माहीत आहे. तरीही ती अस्त्रं करण्यावर जग कायच्या काय पैसे खर्च करतंय. ती म्हणे वापरण्यासाठी नाहीयत, ती शत्रूला धाक म्हणून ठेवलेली आहेत. धाक ठेवायचा आणि धाक नष्ट करण्यासाठी युद्ध करायची असा धंदा चाललाय.

अणुस्फोटकं टप्प्याटप्प्यानं कमी करत करत पूर्ण नष्ट करावीत असं एका करारानं ठरवलं. या करारावर पाकिस्तान, भारत आणि इस्रायलनं सही केली नाही. त्यांचं म्हणणं असं की शेजारचे देश अणुसज्ज आहेत, शेजारचे देश आपल्याला नष्ट करायला टपून आहेत, त्यामुळं आपण अणुबाँबचा धाक नष्ट करायला तयार नाही.

इस्रायलकडं १० ते ४० अणुबाँब आहेत असं म्हणतात. इस्रायल कोणतीही अधिकृत माहिती द्यायला तयार नाही, मामला गुप्त आहे. शेजारचे अरब-मुस्लीम देश आपल्याला नष्ट करायला टपले आहेत असं म्हणत इस्रायलनं १९५० च्या आसपासच अणुबाँबची तयारी केली. त्याच वेळी तिकडं इराणमधे अमेरिकेचे हस्तक राजे पहेलवी राज्य करत होते. अमेरिकेच्या मदतीनं त्यावेळी अणुशुद्धीकरण करण्याला इराणनं सुरवात केली होती. इस्रायलची तयारी फ्रान्स करून देत होतं आणि अमेरिका तिकडं दुर्लक्ष करत होती. तिकडं खुद्द इराणमधे अमेरिकाच अणुकार्यक्रमाला मदत करत होती. गंमत म्हणजे फ्रान्स आणि अमेरिका हे दोघेही लंगोटीयार.

इस्रायल आपल्याला नष्ट करायला टपला आहे असं म्हणत इराण अणुबाँब तयार करतोय. इस्रायलला ती अणुतयारी नष्ट करायचीय.

अमेरिकेचं म्हणणं आहे की इराण दहशतवादी आहे. इराणमधली सत्ता दहशतवादी, क्रूर, माथेफिरू आहे.

इराणमधे निवडणुका होतात. तिथं निवडून आलेली सरकारं बहुसंख्य जनतेला मान्य नसतात. तिथली सरकारं लष्कर आणि पोलिसांचा वापर करून लोकांचा विरोध दडपत असतात. धर्म आणि प्राचीन संस्कृती हा मुद्दा इराणमधे सर्वाधिक प्रभावशाली आहे.

इस्रायलमधे निवडणुका होतात. तिथली जनता मतांच्या हिशोबात आठ दहा वेगवेगळ्या पक्षांत विभागलेली आहे. त्यामुळं तिथं काम करणाऱ्या सरकारांच्या बाबतीत विरोधकांची संख्या सरकारी संख्येइतकीच असते. विरोधकांना दडपण्याचे इराणच्या तुलनेत अधीक गोड मार्ग इस्रायल वापरत असतं. प्राचीन संस्कृती आणि धर्म वाचवण्यासाठीच त्यांची खटपट चालली असं ते म्हणतात. इराण आपल्याच देशातली माणसं मारतं, इस्रायल शेजारच्या देशातली (पॅलेस्टाईनमधलीही) माणसं मारतं.

अमेरिकेत निवडणुका होतात. ताजा अनुभव असा की तिथली जनता अर्धीअर्धी विभागलेली आहे. विरोधी जनतेला दंडेली करून दडपण्याचा प्रयत्न तिथलं सरकार करत आहे. तिथलं प्रस्थापित सरकारही गोरी-ख्रिस्ती-अमेरिकन संस्कृती जपण्यासाठीच इतर देशांवर हल्ले करते. उदा इराक, सीरिया,अफगाणिस्तान,इराण.

अर्धे अमेरिकन म्हणतात की ट्रंप अतिरेकी आणि युद्धखोर आहेत. अर्धे इस्रायली ज्यू म्हणतात की नेतान्याहू अतिरेकी आणि युद्ध खोर आहेत. इराणमधलीही बहुसंख्य जनता म्हणत असते की त्यांचे नेते अतिरेकी आणि युद्धखोर आहेत.

झोल आहे खरा.

।।

Comments are closed.