थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

Henry David Thoreu, A life. Laura Walls.  

हेन्री डेविड थोरो १८१७ ते १८६१ अशी ४४ वर्षं थोरो जगले. त्या काळात औद्योगीकरणानं जोर धरला होता आणि उद्योग शहरं उभारण्याच्या नादात जंगलं नाहिशी होई लागली होती. वर्णद्वेष आणि गुलामी हे अमेरिकन जीवनाला लागलेले रोग उफाळून आले होते, राज्यांतली आपसातली मारामारी सुरु झाली होती. एका मध्यम वर्गी कुटुंबात वाढलेल्या थोरो यांनी प्राप्त परिस्थिती नाकारून एक नवी वाट जगाला दाखवली.  निसर्गस्नेही जीवन, साधं जीवन, सार्वजनिक नैतिकता, सत्याग्रह, सविनय कायदे भंग या गोष्टी सांगितल्या, स्वतः आचरणात आणल्या. महात्मा गांधी आणि मार्टीन लूथर किंग यांनी  थोरो यांना जाहीररीत्या आपलं गुरु मानलं.

थोरो आणि गांधी यांनी एक व्यापक जीवनदृष्टी सांगितली. किंग यांचं जीवन आणि  विचार वर्णद्वेष आणि शांततामय संघर्ष या विषयांभोवती फिरले. भारतात गांधींना संदर्भहीन-कालबाह्य मानणं आणि भविष्यवेधी आणि कालसुसंगत ठरवणं असे परस्पर विसंगत विचार वारंवार उफाळून येत असतात. अमेरिकेत थोरो यांच्या जन्मद्वीशताब्दीच्या निमित्तानं आणि अमेरिकेतल्या सांप्रतच्या परिस्थीतीमुळं थोरोंची आठवण पुन्हा काढली जातेय. स्पेनपासून फुटून निघण्याची भाषा करणाऱ्या कॅटलोनियन आंदोलकांनी आपण गांधींच्या मार्गानं आंदोलन करणार आहोत असं वारंवार म्हटलं हेही लक्षात घेण्यासारखं आहे.

Henry David Thoreu, A life हे लॉरा वॉल्स यांचं ताजं पुस्तक वाचतांना पटकन मनात येतं की आज थोरो जिवंत असते तर त्यांनी पर्यावरणाचा नाश करणाऱ्या, वंशद्वेष्ट्या ट्रंप यांच्या विरोधात सत्याग्रहाचं अस्त्र उगारलं असतं, चळवळ सुरु केली असती.

निसर्गप्रेम, साधी रहाणी, कर द्यायला नकार देणं, सविनय कायदेभंग हे थोरोंचे विचार त्यांच्या काळातही वादग्रस्त ठरले होते. जेम्स रसेल, जॉन अपडाईक, कॅथ्रीन शुल्झ यांनी  थोरोंना अव्यवहारी, गर्विष्ठ, अहंमन्य, उद्धट, ठरवलं.थोरोंनी  अमेरिकेत प्रस्थापित असलेल्या व्यवस्थेवरच जगायचं आणि त्याच व्यवस्थेचा विरोधात आपण आहोत असं म्हणायचं यात दुटप्पीपणा आहे असं तत्कालीन टीकाकार म्हणत.

थोरोंचा जीवनपट वॉल्स यांनी पुस्तकात मांडला आहे. थोरोंचं बालपण. हार्वर्डमधे जाणं.इंजिनियर होणं. काही काळ इंजिनियर म्हणून काम करणं. इमर्सनच्या विचारांनी प्रभावित होऊन कॉनकॉर्ड या आपल्या गावाच्या वेशीवर असलेल्या वॉल्डन या ठिकाणी एका जलाशयाच्या काठावर, जंगलात जाऊन रहाणं. तिथं निसर्गाचा अभ्यास करणं. सरकारच्या अनैतिक वागण्याविरोधात सत्याग्रह करून एक दिवस तुरुंगात काढणं. निसर्गप्रेमी जीवनशैलीचा आग्रह सांगणारी भाषणं करणं आणि चळवळ चालवणं. टीबीची बाधा होऊन वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मरणं.

थोरोनी लिहिलेल्या  जर्नलमधील नोंदी (निसर्ग, जगण्याविषयीचे विचार आणि प्रतिक्रिया)  खूप तपशिलासह लेखिकेनं लिहिल्या आहेत. दिवसभरात मनात आलेले विचार, केलेली कामं, केलेली निरीक्षणं इत्यादी गोष्टी थोरो कागदावर पेन्सिलीनं लिहीत. नंतर त्या टिपणावरच्या प्रतिक्रिया  मार्जिनमधे लिहून काढत. नंतर शाईनं या नोंदी पक्क्या करत. वनस्पतींची वाढ, फुलांचा जन्म आणि फळणं यांच्या दररोज घेतलेल्या नोंदीवर आधारीत पुस्तकं थोरोंनी लिहिली.

थोरोंचे टीकाकार म्हणत की थोरो वेळोवेळी गावातल्या आपल्या घरी जात, तिथं जेवण करत, तिथं त्यांचे कपडे त्यांची आई धुवून देत असे. लेखिका अशा नोंदींची दखल घेते, नर्म विनोदातून. ” कोणाही अमेरिकन पुरुष लेखकाच्या वाट्याला  आपल्या प्रिय माणसांसोबत जेवण घेण्याबद्दल किंवा आपले कपडे स्वच्छ करून घेण्याबद्दल इतकी अपकीर्ती सहन करावी लागली नसेल.”

थोरो साध्या रहाणीचे पुरस्कर्ते होते. घरं बांधण्याचा उद्योग अमेरिकेत सुरु झाला होता यावर थोरोंचा राग होता. माणसाला झोपायला एका शवपेटीयेवढीच जागा लागत असताना माणूस विनाकारण घर नामक मोठा खोका कां बांधतो असा प्रश्ण त्यांनी विचारला. घराला पडदे इत्यादी लावणं म्हणजे चैन आहे असं त्यांना वाटे. जंगल हेच घर, त्या  घराला ना खिडक्या, ना दारं.  स्वस्त आणि मोकळा ढाकळा मामला असं ते जंगल ऊर्फ घराचं वर्णन करत. अशा थोरोंनी लहान कां होईना पण घर कां बाधलं या टीकाकारांच्या प्रश्णाला उत्तर म्हणून ”  लेखक-विचारवंताला  चिंतन करण्यासाठी, लिहिण्यासाठी एकांत लागतो, स्वतंत्र  घर लागतं ” हा इमर्सननं दिलेला सल्ला वाचकांसमोर ठेवतात.

अनेक ठिकाणी विसंगती मांडल्यावर  लेखिका ” अरे, हे तर मला माहितच नव्हतं.. अरेच्चा मी तर अशा रीतीनं विचारही केला नव्हता..” अशा प्रतिक्रिया नोंदतात.

निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनाचा आग्रह थोरोंनी धरला. ते शाकाहारी व निर्व्यसनी होते. सरकारच्या अनैतिक वागण्याचा निषेध म्हणून त्यांनी कर भरायला नकार दिला, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सविनय कायदेभंग, सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला.

जगाला चिंतित करणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आज अमेरिकेत आहेत. प्रदूषण करणारा वायू सर्वात जास्त मात्रेनं अमेरिका पर्यावरणात लोटत आहे.धनाढ्य अमेरिकेत विषमता आहे. भरपूर अन्न उपलब्ध असूनही अमेरिकेत अतीपोषण आणि कुपोषणानं फार लोक रोगी झालेत. खूप माणसं औषधोपचारापासून वंचित आहेत. बाजारात अमाप वस्तू असूनही दुःखी आणि हताश असलेली माणसं आत्महत्या करत आहेत.उत्तम शिक्षण व्यवस्था आहे तरीही शिक्षण न घेता येणारे आणि पोकळ शिक्षण देणाऱ्या संस्थांचे बळी  झालेले खूप लोक आहेत.

मार्क ग्रीफ या निबंधकाराचं अगेन्स्ट एवरीथिंग हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. ग्रीफ यांनी या पुस्तकात अमेरिकेच्या सध्याच्या अवस्थेबद्दल निबंध लिहिले आहेत. बाजारव्यवस्थेनं अमेरिकेचा ताबा कशा रीतीनं घेतला आहे याची चर्चा या पुस्तकात आहे. माणसानं काय खावं, कसा व्यायाम करावा, कोणतं संगित ऐकावं, सेक्सविषयक माणसाचं जगणं इत्यादी गोष्टी माणूस स्वतः ठरवू शकत नाही, बाजार वरील गोष्टी ठरवतो याकडं ग्रीफ लक्ष वेधतात. सभोवतालच्या वस्तुमय जगण्यानं चक्रावलेले ग्रीफ पुस्तकाच्या शेवटच्या निबंधात थोरोची आठवण काढतात. ग्रीफ १९७५ साली जन्मले आणि थोरो ज्या विश्वशाळेत शिकले त्याच हारवर्डमधून ग्रीफ यांनी पीएचडी घेतली.

गेल्या पाचेक वर्षाच्या काळात ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आणि ब्लॅक लाईव्ज मॅटर ही मोठ्ठी आंदोलनं अमेरिकेत होऊन गेली. ब्लॅक लाईव्ज मॅटर या आंदोलनात काळ्यांनी  अमेरिका अजूनही वर्षद्वेष्टी आहे हे वास्तव चव्हाट्यावर आणलं. बहुदा त्या आंदोलनाला आलेली गोऱ्या वर्णवादींची प्रतिक्रिया म्हणूनच वर्णद्वेष करणारेही रस्त्यावर आले आणि त्यांनी संघटितरीत्या ट्रंप यांना निवडून दिलं. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या आंदोलनात अमेरिकेची अर्थव्यवस्था समाजातल्या एक टक्के लोकांनी बळकावली आहे असं सांगितलं. २००७ सालची मंदी ही एक टक्का लोकांनी ९९ टक्के लोकांवर लादलेली गरीबी आणि विषमता आहे असं या आंदोलनाच्या निमित्तानं अमेरिकेतल्या विचारी लोकांनी लिहिलं.

वरील दोन आंदोलनांचा अनुभव घेतलेल्या मार्क ग्रीफना २०११ साली सध्याच्या चिंताजनक परिस्थितीत थोरोची आठवण काढावी असं वाटतं. अगेन्स्ट एवरीथिंग या पुस्तकातला वर उल्लेख केलेला निबंध त्यांनी २०११ साली लिहिला आणि २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात गुंफला.

औद्योगीक क्रांती, बाजारव्यवस्था, कंप्यूटर आणि इंटरनेट, जागतिकीकरण या घटनांनी २१व्या शतकातला समाज कायच्या कायच बदलला आहे. पर्यावरणचा नाश आणि नैसर्गिक ऊर्जा नाहिशी होणं या दोन गोष्टी माणसाला भयभीत करून टाकत आहेत. मानवी समाजाचं अस्तित्वच नाहिसं होणार की काय अशी भीती भेडसावू लागली आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि ज्ञान उपलब्ध होणं आणि वापरता येणं यामुळं माणसाचं जीवन अधिक सुखकर होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण नाशाचे तोटे लक्षात आल्यानंतर माणूस रिसायकलिंग, नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्याकडं वळला आहे. अतिरेकाचे तोटेही माणसाच्या लक्षात आले आहेत.

वस्तूच वापरू नका, उद्योगच बंद करा, निसर्गाला पूर्णपणे शरण जा असा विचार असं आज कोणी म्हणत नाही. परंतू उपभोगाचा नव्यानं विचार करावा असं माणसाला वाटू लागलं आहे. हव्यास आणि गरजा यातली सीमारेषा ठरवणं कठीण आहे. प्रत्येक काळात ही रेषा पुढं मागं होत असते, व्हायला हवी. थोरो आणि गांधीजी गरज-हव्यास रेषेचा विचार करा असं सांगतात.

थोरोंच्या विचारांना आचाराचा पाया होता.  स्वतः साधे राहून ते समाजाला साधेपणाचा संदेश देत होते. स्वतः निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहून त्यांनी पर्यावरण सांभाळायचा संदेश दिला. बोलणं तसंच चालणं.

समाजाचा तोल गेलाय असं थोरो सांगतात. प्रत्येक काळात माणसानं आपापल्या काळाची तपासणी करावी असं त्यांचं म्हणणं असतं. वस्तूंचा वापर जरूर करा पण वस्तूरूप जगू नका असा थोरोच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आपण दररोज उठून जे जे करतो ते ते नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे याचा विचार करायला थोरो प्रवृत्त करतात.

म्हणूनच वॉल्सना त्यांचं चरित्र पुन्हा एकदा लिहावंसं वाटतं.

।।

 

 

 

 

3 thoughts on “थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

  1. The ideals of Thoro and MG are both attractivefor all those with heart in the right place. However, to assume that these tools will work in all situations is naive. Thee only work when the legal system is also humane/liberal.

  2. निळू दामले,

    थोरो आणि गांधी असे शीर्षक दिल्यावर गान्धीन्बध्दल काही लिहिणे आणि दोघांची तुलना करणे अपेक्षित होते.

    अ.पां.देशपांडे

  3. अ.पां.देशपांडे: …….. निळूभाऊ लिहितात की थोरो यांनी निसर्गस्नेही जीवन, साधं जीवन, सार्वजनिक नैतिकता, सत्याग्रह, सविनय कायदे भंग या गोष्टी सांगितल्या, स्वतः आचरणात आणल्या. महात्मा गांधी आणि मार्टीन लूथर किंग यांनी  थोरो यांना (म्हणूनच) जाहीररीत्या आपलं गुरु मानलं. ते शाकाहारी व निर्व्यसनी होते. सरकारच्या अनैतिक वागण्याचा निषेध म्हणून त्यांनी कर भरायला नकार दिला, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सविनय कायदेभंग, सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला. स्वतः साधे राहून ते समाजाला साधेपणाचा संदेश देत होते. स्वतः निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहून त्यांनी पर्यावरण सांभाळायचा संदेश दिला. बोलणं तसंच चालणं आपण दररोज उठून जे जे करतो ते ते नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे याचा विचार करायला थोरो प्रवृत्त करतात. …. हे सर्वच गांधीजींचे वर्णन वाचत असल्याचा भास आपल्याला झाला नाही कां?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *