मेरिलीन मन्रो, सौंदर्य आणि अभिनय
मेरिलीन मन्रो या नटीची जन्मशताब्दी इंग्लंडमधे साजरी होतेय. ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट वर्षभर तिचे चित्रपट दाखवणार आहे, तिच्या चित्र-पोस्टर्सची प्रदर्शनं भरवणार आहे, भाषणं आणि चर्चासत्रं ठेवणार आहे.
१९७० नंतर जन्मलेल्या माणसांना मन्रो आठवणं कठीण आहे. ती १९६२ साली वारली. १९६१ साली तिचा शेवटला चित्रपट पडद्यावर आला होता. १९४७ मधे मन्रोनं पहिला चित्रपट केला. मन्रोनं ३० चित्रपट केले.
Gentlemen Prefer Blondes (1953), Niagara (1953), The Seven Year Itch (1955), Some Like It Hot (1959), The Misfits (1961) हे मन्रोचे गाजलेले चित्रपट.
तीस चित्रपट म्हणजे फार नव्हेत. तिची लोकप्रियता आणि तिच्यावर फिदा झालेल्या लोकांची संख्या पहाता तिची चित्रपट संख्या महत्वाची ठरणार नाही. तिच्या काळात तिला जेवढा मेहेनताना मिळत होता तेवढा आजही कोणाला मिळत नाही. हाऊ टु मॅरी ए मिलियोनायर या चित्रपटासाठी तिला त्या काळात १.५ कोटी डॉलर मिळाले होते. आजच्या तुलनेत ते १५ कोटी डॉलर होतात. अलीकडं सर्वात जास्त म्हणजे सुमारे १४ कोटी डॉलर मिळाले होते टॉम क्रुझला. मन्रोनं तिच्या कारकीर्दीत आजच्या हिशोबात २ अब्ज डॉलर मिळवले होते.
मन्रो हॉलिवूडमधली मादक सोदर्याचा अणुबाँब म्हणून प्रसिद्ध होती. नेटवर तिचे फोटो सापडतील; ते पाहिल्यावर तिच्या सौंदर्याची कल्पना सहज येईल. वाऱ्यानं उडणारा स्कर्ट सांभाळताना मन्रो खट्याळ आणि मादक हसताना दिसते. स्कर्ट आणखी वर गेला तर प्रेक्षकांना काय वाटेल; प्रेक्षकांना काय वाटतंय त्याचा कल्पना आल्यानं मन्रोला कशी मज्जा आली असेल; अशी जम्माड गंमत त्या फोटोमधे आहे.
मन्रोला ऑस्कर मिळालं नाही. नामांकनही मिळालं नाही. ती अमेरिकन नटी, ऑस्करवर अमेरिकन चित्रपट व्यवसायाचा पगडा असतो. ब्रिटीश बॅफ्टाचं नामांकन मात्र तिला मिळालं.
मन्रोच्या अभिनयाची भरपूर वाखाणणी समीक्षकांनी केली. पॉलीन केल या नामांकित आणि सकस समीक्षिकेनं तिच्याबद्दल लिहिलं की लोक समजतात तितकी ती केवळ मादक सौंदर्यवाली बाई नव्हती, तिचा अभिनय एक उत्तम प्रकारची कॉमेडी ( सुखांत-मिश्कील) आहे.
अभिनयाला अनेक पदर असतात. जे दिसतं त्या स्तराखाली अनेक सूक्ष्म पदर कसलेल्या अभिनेत्यात असतात. मन्रोच्या अभिनयात तसे अनेक पदर होते. मेथड ॲक्टिंगचं प्रशिक्षण तिनं घेतलं होतं. आपल्या आयुष्यातल्या प्रसंगांची आठवण करून भूमिका घडवायची हे त्या अभिनय प्रकाराचं मुख्य अंग असतं. मन्रोचं आयुष्य खूप म्हणजे खूपच खाच खळग्यांनी भरलेलं होतं. तिला बलात्कार सहन करावे लागले होते. भूमिका मिळवण्यासाठी तिला सेक्स द्यावा लागला होता. आपलं स्थान टिकवण्यासाठी तिला अनेक पलंगांवर अनेक ओझ्यांखाली झोपावं लागलं होतं. ते सारं सूक्ष्मपणे तिच्या अभिनयात येत असे. पण त्याचीही एक गंमत होती. हे सारं मी दाखवतेय, हे सारं एका परीनं कृत्रीम आहे, तरीही मी ते कलात्मक करतेय, हे मला समजतंय, तुम्हाला तसंच समजतंय; अशा भावनेनं मन्रो भूमिका वठवत असे. ती भूमिकेत असे आणि भूमिकेपासून इंचभर अंतरावरही असे. कसं फसवलं, कसं भुलवलं असा एक मिश्कील भाव तिच्या अभिनयात असे. अत्यंत सुंदर, अत्यंत मादक, समोरच्याला वेडावणारी पण आतून हळवी असं काहीसं मिश्रण तिच्या व्यक्तिमत्वात, तिच्या अभिनयात असे.
तिचं लहानपण प्रचंड तणावांनी भरलेलं होतं. तिची आई सतत मनोरोगावर उपचारांसाठी हॉस्पिटलमधे असे. मन्रोचं खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यही अनंत तणावांनी भरलेलं होतं. उत्तरोत्तर ती व्यसनी होत गेली होती. हे सारं माध्यमांतून लोकांना कळत होतं.
प्रसिद्ध व्यक्तीचे अवगुण, प्रसिद्ध व्यक्तीच्या हातून घडलेलं नीतीबाह्य वर्तन माध्यमांतून चघळायला लोकांना आवडतं.किंबहुना या कारणांसाठी कलाकार गाजला तर त्याचं बॉक्स ऑफीसवरचं त्याचं मोल वाढतं असं चित्रपट व्यवसायाला वाटतं. भुकेल्या प्राण्यासमोर भक्ष्य म्हणून टाकावं तसा चित्रपट व्यवसाय कलाकाराला प्रेक्षकासमोर टाकत असतो. मन्रो हे त्याचं ठळक उदाहरण आहे.
अमेरिकेच्या प्रेसिडेंटबरोबर मन्रोचे संबंध होते. सत्ताधारी, श्रीमंत, बलवानांना प्रसिद्ध कलाकार त्यांच्यासोबत असावेत असं वाटत असतं. जगभर तशी उदाहरणं आहेत, अमेरिकेचं कल्चर अशा संबंधांना खूप महत्व देतं. विद्यमान प्रेसिडेंट ट्रंप हे त्याचं ताजं उदाहरण आहे. करियर टिकावं यासाठी कलाकारांना राजकारणातल्या लोकांना शरण जावं लागतं. मन्रोला ते करावं लागलं.
अभिनय आणि खूप कंगोरे असलेलं खाजगी जीवन यामुळं मन्रोबद्दल जाणून घ्यायला लोकांना आवडत असे. मन्रोवर अनेक पुस्तकं लिहिली गेली. मन्रोवर चित्रपट आणि माहितीपट झाले.
२०२३ च्या ऑस्कर स्पर्धेत ब्लाँड या मन्रोवरच्या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. मुळातली नॉर्मा जीन ही मॉडेल चित्रपटात मेरिलीन मन्रो कशी झाली याचं चित्रण त्या चित्रपटात होतं. चित्रपट प्रक्षोभक होता, बराच बटबटीत होता. मन्रोच्या आयुष्यातल्या अनेक घटना कानावर येतात पण त्या आपल्याला दिसू नयेत असं वाटत असतं, अशा घटना (बलात्कार, अनेक व्यक्तीनी एकाच वेळी तिच्याशी सेक्स करणं, अनैसर्गिक सेक्स) त्या चित्रपटात दाखवल्या होत्या.
ॲना डे आर्मास या क्युबन अभिनेत्रीनं मेरिलीनची भूमिका केली. उत्तम केलीय. त्यासाठी तिला ऑस्करचं नामांकन मिळालंय. कसं असतं पहा. मन्रोला नामांकन नाही, मन्रोची भूमिका केलेल्या नटीला नामांकन. ॲना डे क्यूबन आहे. तिच्या बोलण्यात क्यूबन सूर आहे. अमेरिकन भूमिकेच्या बोलण्याला क्युबन छटा हे अमेरिकन लोकांना रुचलं नसेल. पण आपल्यासारख्या अमेरिकन नसलेल्या प्रेक्षकाला चित्रपट पहाताना तसं जाणवत नाही, पडद्यावर दिसते ती मेरिलीन प्रेक्षकाला हेलावून टाकते,झपाटून टाकते.
नॉर्माला वाटत असे की लग्न व्हावं, मुलं व्हावीत, मुलं आणि नवरा यांच्याबरोबर खेळीमेळीचा संसार व्हावा. जमलं नाही. नॉर्माची मेरिलीन झाली, व्यसनांच्या आहारी तिचा मृत्यू झाला.
तिचे सिनेमे आजही पहावेसे वाटतात.
।।