इराण,इस्रायल,अमेरिका. जो जे वांछील तो ते लाहो
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात जुंपलीय.
इस्रायल-अमेरिका इराण खतम करायला निघालेत.
इराण जाम चिवट आहे. मरेल पण इतरांना छळेल.
अमेरिकेनं जगाला टॅरिफ लादून जगाला वेठीस धरलं.
इराण होरमुझची सामुद्रधुनी अडवून जगाला वेठीस धरतंय.
भारतानं काय करावं? भारताचं राजकीय धोरण काय असावं?
भारत आता एका अद्यात्मिक उन्नत स्थितीत पोचला आहे.
भारत राळेगण शिंदीतल्या एका विशाल वृक्षाखाली एका बाकड्यावर बसला आहे.
भारताचे डोळे उघडे आहेत. पण भारत जागा नाही. भारताचे डोळे कधी मिटलेले असतात पण भारत झोपलेला नसतो. भारत कधी चालत असतो पण त्याला कुठंही जायचं नसतं. भारत कॅमेऱ्याला पोज देत आकाशाकडं पहात असतो पण तो विचार करत नसतो. भारत कधी निवांत बसलेला असतो पण तरीही अंतर्मनात तो अनंत योजने चालत असतो.
भारताच्या सीमेच्या अगदी जवळ शत्रूचे रणगाडे पोचले होते. सेनापती अस्वस्थ झाले. काही केलं नाही तर रणगाडे भारतात घुसून नाश करणार. काही केलं तरी युद्ध सुरु होऊन पुन्हा नाशच होणार. करायचं काय? सेनापतीनं भारताला विचारलं- -मी काय करू.
भारत म्हणाला -वत्सा तुला जे योग्य वाटेल ते कर.
वत्स म्हणजे सेनापती विचारतो सर, मी तुम्हाला गेले कित्येक तास विचारतोय, तुमचं आपलं हेच उत्तर आहे. मी काहीही केलं नाही तर?
भारताचं भरत वाक्य होतं ‘वत्सा तुला योग्य वाटतं ते कर.’
रशियानं दीड लाख सैन्य युक्रेनच्या सीमेवर उभं केलं. साऱ्या जगाला ते सॅटेलाईट चित्रात दिसलं. भारतालाही ते दिसलं.
भारत झाडाखाली निवांत होता.
‘बरेच दिवस झाले. रशियन सैन्याला काही काम नव्हतं. बिच्चारं कंटाळलं होतं. पाय मोकळे करायला युक्रेनच्या हद्दीवर पाठवलं असणार. चांगलंच आहे की. रशियन सैन्याला पातंजलीची योग सुत्रं पाठवा’ भारत म्हणाला.
रशियानं पातंजली पोचायची वाट पाहिली नाही. तोफा डागल्या. ड्रोन सोडले. विमानं बाँब टाकत फिरली. अग्नीबाणांचा पाऊस पडला. युक्रेनमधली पोरंबाळं मरू लागली.
आकाशात टक लावून बसलेल्या भारताच्या डोक्यावर वरून एक कावळा शिटला. तरीही भारत शांत होता. ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
‘रशियाला गीतेच्या प्रती पाठवा. युक्रेनलाही पाठवा. त्यांना माझा निरोप द्या. दोघांनीही बंदुका खाली ठेवाव्यात, गीतेचं पारायण करावं. त्यांना मराठी कळतं की नाही याची चौकशी करा, येत असल्यास ज्ञानेश्वरी पाठवा. युद्ध थांबेल.’ भारत म्हणाला.
रशियानं भारताचे आभार मानले. रशिया म्हणाला ‘ भारतानं योग्य मार्गदर्शन केलं. भारताला शांततेचं पारितोषिक द्यायला हवं.’
भारताच्या गालावर खळी पडली. भारत मंदसं हसला.
तीन वर्ष होऊन गेली. युक्रेनचे काही लाख, रशियाचे काही लाख मेले. राजकारणाशी संबंध नसलेले म्हातारे बायकापुरुष मेले, जगणं सुरूही न झालेली मुलं मेली. भारत शांत आहे. ध्यानात मग्न आहे.
भारताच्या कामावर आलं की गाझानं अमानुष खोडी काढलीय. इस्रायलची निष्पाप माणसं मारलीत.माशी कानाशी घोंगावल्यावर जशी वारतात तशी ही बातमी भारतानं वारली.
इस्रायलनं बदल्याची कारवाई सुरु केली. गाझाच्या काही तासांच्या उद्योगाला अनंत महिन्यांचं उत्तर इस्रायलनं दिलं. गाझा पार उध्वस्थ केलं. गाझात दररोज दोनशे अशा दरानं माणसं मरत आहेत.
दोन चार माशा घोंगावल्या सारखं झालं, भारताच्या कपाळावर एक आठी पडली, अनुवठीखाली धरलेला हात काढून भारतानं त्या माशांना हाकललं. काय या माशा, त्याना कळत कसं नाही की मी ध्यानात आहे.
भारतानं समोर पाहिलं. कॅमेरामनला भारताची भाषा कळत होती. कॅमेरा ऑन झाला.
भारतानं मागं वळून पाहिलं. एक सेवक पुढं आला. ‘गीतेच्या प्रती शिल्लक आहेत ना? पाठवा गाझा आणि इस्रायलमधे’ भारतानं सेवकाला सांगितलं.
वाक्य संपल्यावर भारत दहा सेकंद थांबला.भारतानं खुणावलं. कॅमेरामननं ट्रायपॉड उचलला. बाजूला सरकला. दुसरा कॅमेरा आला. कॅमेरामननं कॅमेरा सेट करून भारताला खूण केली.
सेवकानं एक मोर आणला. भारतासमोर ठेवला. भारतानं मोराला दाणे घातले. मोर दाणे खाईच ना. त्याला कंटाळा आला होता. गेले काही तास भारत सतत मोराला दाणे भरवत होता. मोराचं पोट भरलं होतं. मोराला अजीर्ण झालं होतं. भारत थांबेना, कॅमेरा थांबेना. शेवटी कंटाळून मोरानं एकदोन दाणे टिपले. भारताच्या चेहऱ्यावर अद्यात्मिक आनंद पसरला. कॅमेऱ्यानं तो क्षण अचूक पकडला.
झाड तेच. बाकडं तेच. भारतही तोच. परिस्थिती बदलली होती.इराण युद्ध.
समोर मॉनिटर होता. अमेरिकेचे पहाटेचे अडीच वाजले होते. अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्लोरिडातल्या रिसार्टवर होते. प्रेसिडेंट म्हणाले ‘ मी इराणवर हल्ला करायची आज्ञा लष्कराला दिली आहे.
कॅमेऱ्यापाठी उभा ठाकलेल्या पत्रकारानं कारण विचारलं.
काहीशा विस्कटलेल्या प्रेसिडेंटनी एक कारण सांगितलं. टीव्हीचा माणूस कॅमेरा गुंडाळून निघाला.
प्रेसिडेंटनं त्याला थांबवलं. एक नवं कारण सांगितलं. कॅमेरामननं रेकॉर्डिंग केलं. निघाला.
प्रेसिडेंटनी पुन्हा त्याला बोलावलं. तिसरं कारण. सभोवताली बर्फ पडत असतानाही कॅमेरामनला घाम फुटला.
भारत हे सारं समोर ठेवलेल्या मॉनिटरवर पहात होता.
अनुवठीखाली हात.
भारताचा छान वेळ चालला होता. मोरांपाठोपाठ पोपट आले. भारतानं पोपटांना पेरू खायला घातले. भारत थकला. मागं उभा असलेला सेवक गोमुत्राचा ग्लास घेऊन आला. भारत विचारात पडला. त्यानं ग्लास घेऊन जा अशी खूण केली. तो सेवक गेला. दुसरा सेवक आला. त्याच्या हातात हळद घातलेलं दूध होतं. भारताच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.
मॉनिटरवर इराणवर पडणारे बाँब दिसत होते. भारतानं इस्रायलच्या पंतप्रधानांना अभिनंदनाचा संदेश पाठवला. सेवकानं विचारलं की अमेरिकेच्या प्रेसिडेंटला संदेश पाठवू कां? भारत काहीसा गोंधळला. सेवकाच्या कानात भारत म्हणाला ‘संदेश धाडू नका. फोन लावा. तिकडून फोन उचलला की मी बोलेन.’ अमेरिकन प्रेसिडेंटनी फोन उचलला नाही.
भारत ध्यानमग्न होता. सर्व पक्षांना दाणे घालून झाले होते. आता काय असा प्रश्न सेवकासमोर होता. सेवकानं दबकत दबकत भारताच्या कानाजवळ तोंड नेऊन विचारलं ‘ वनतारात नेण्यासाठी एक वाघ आणलाय. सध्या तो आपल्याच पिंजऱ्यात आहे. तसा तो माणसाळलेला आहे. आणू कां?’
तेवढ्यात सेवकानं सेल फोन आणला, भारतासमोर ठेवला.
‘सर. होरमुझची खाडी बंद झालीय. तेल येत नाहीये. तेल महागलंय. ढोकळा फाफडा खाऊ घालणारी रेस्टॉरंटही बंद पडत आहेत. हॉटेलवाले म्हणत आहेत की सिलिंडरची किमत चौपट झालीय, सिलिंडर मिळत नाहीये, मिळवण्यासाठी पैसे चारावे लागत आहेत, काय करावं?’
भारत शांत होता. भारताचा हात पुन्हा अनुवठी खाली गेला. भारतानं आकाशाकडं पाहिलं.
कॅमेरामन सरसावला.
भारतानं खुणावलं, कॅमेरा नको म्हणाला.
सेवकाला सांगितलं ‘लिहून घ्या.’
‘ जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. इस्रायलची वांछा, अमेरिकेची वांछा, उध्वस्थ इराणची वांछा, उध्वस्थ गाझाची वांछा, उध्वस्थ युक्रेनची वांछा. सर्वांच्या वांछ्या पुऱ्या होवोत.’
सेवकानं विचारलं ‘माध्यमांकडं पाठवू?’
भारतानं डोळे किलकिले केले. म्हणाले ‘आपल्या आयटी सेलकडं पाठवा’
सेवक पळाला.
भारत पुन्हा ध्यानमग्न झाला.
।।