मुत्सद्दी मांजर
परवाच्या दिवशी प्रधान मंत्री कीर स्टार्मर प्रेसिडेंट झेलेन्सकी यांच्याबरोबर चर्चा करत होते.
पुतीन थांबायला तयार नाही, युरोपीय मदत कासवाच्या गतीनं येतेय, ट्रंप तात्यांचा काही अंदाजच लागत नाही. झेलेन्सकी असं काही तरी म्हणत होते.
ट्रंप तात्यांचं खरं नाही हेच खरं. मला म्हणतायत की होरमुझच्या सामुद्रधुनीत तुझी लढाऊ जहाजं पाठव. मी त्याला सांगितलं की मला आमच्या पार्लमेंटला विचारावं लागेल, लोक काय म्हणतात ते पहावं लागेल, मंत्रीमंडळात ठराव घ्यावा लागेल. तर ट्रंप माझंच माप काढतो, म्हणतो की मी म्हणे चर्चील नाहीये. मी चर्चील कसा असणार, मी स्टार्मर आहे. ट्रंप गल्लीतल्या दादासारखं वागतोय, त्याचं काय करायचं ते कळत नाहीये. असं काही तरी कीर स्टार्मर म्हणत असावेत.
चर्चा फक्त दोघांमधे चालली होती, त्यामुळं ते नेमकं काय बोलले ते कळत नाही.
कॅमेरा आला. काही शॉट्स घेतले.
शॉट घेत असतानाच लॅरी आला. लॅरी झेलेन्सकींच्या पायात लुडबुडला. झेलेन्सकींच्या पाटाला अंग घासून फिरला, दूर जाऊन चर्चा ऐकत बसला.
लॅरी हे एक मांजर आहे. खरोखर. ते ब्रीटीश पीएमच्या १० डाऊनिंग स्ट्रीट अधिकृत निवास स्थानात मुक्काम करून असतं.
ही कल्पित गोष्ट नाहीये.
२०११ साली प्रधान मंत्री डेविड कॅमरॉन लॅरीला एका अनाथ श्वानमार्जर घरातून घेऊन आले.
ब्रीटनच्या कागदपत्रात लॅरीची नोंद कॅबिनेट ऑफिसमधला प्रमुख उंदीरमारे (माउसर) असं आहे.
१० डाऊनिंग स्ट्रीटमधे उंदीर? कसं शक्य आहे? एकदा एका माणसानं लॅरीला उंदीर मारताना पाहिला होता. एकदा एक कबूतर लॅरीनं धरलं होतं, कबूतर पळून गेलं असं एकानं पाहिलं होतं.
लॅरीनं आतापर्यंत सहा प्रधान मंत्री पाहिलेत. १५ वर्षात सहा प्रधान मंत्री. सरासरी अडीच वर्षात एक प्रधान मंत्री. ब्रिटीशांना व्हरायटी हवी असते.
लॅरीचं अधिकृत निवासस्थान प्रधान मंत्र्यांच्या कार्यलयीन खोल्या, कार्यालयीन दालनं हेच आहे. पीएम रहातात त्या खाजगी खोल्यात लॅरी जात नाही. आपण पीएमच्या खाजगी खोल्यात जाणार नाही असं कागदावर लिहून त्यावर कॅमेरॉननी लॅरीची सही घेतली असावी.
कीर स्टार्मर १० डाऊनिंग स्ट्रीटवर रहायला आले तेव्हां त्यांची जोजो आणि प्रिन्स ही दोन मांजरं घेऊन आले. ती मांजरं स्टार्मर यांच्या खाजगी खोल्यांत असतात. लॅरी तिकडं जात नाही. लॅरी फक्त पीएमच्या ऑफिसात वावरतो.
आज कोणी तरी प्रेसिडेंट किंवा प्रम येणार आहे हे लॅरीला कळत असावं. कॅमेऱ्यांची लगबग सुरु झाली की लॅरी तयार असतो. १० डाऊनिंग स्ट्रीटचा जगाला परिचित असलेला दरवाजा उघडला की आधी लॅरी बाहेर येतो, पाहुण्यांचं स्वागत करतो. पाहुण्यांनी पीएमना मिठी मारली, कॅमेऱ्यासमोर पोज दिली की लॅरी आत सटकतो.
पाहुणे आत जातात, चर्चा करू लागतात. लॅरी त्यांच्याकडं पहातो, समोरच्या साईड कपाटावर जाऊन बसतो. चर्चा फारच लांबली तर खिडकीत जाऊन बसतो. तो धांदरट नाही. त्यानं कपाटावरचा किंवा टेबलावरचा फ्लॉवर पॉट किंवा व्हाज फोडल्याची नोंद ब्रिटीश दप्तरात नाही.
लॅरी लहरी आहे. त्याला कोण आवडेल आणि कोण आवडणार नाही ते सांगता येत नाही. लॅरी बेफिकीरच आहे. फार कमी वेळा तो पुढाऱ्यांबद्दल प्रेम दाखवतो. झेलेन्सी त्याला आवडलेले दिसतात. ओबामा आले होते तेव्हां लॅरी त्यांच्या पायात बराच काळ घोटाळत राहिला.
ब्रिटीश माणूस खडुस असतो,सांभाळून असतो, आपल्या भावना कधी व्यक्त करत नाही. ब्रिटीश व्यक्तिमत्वाचा अभ्यास करूनच देशोदेशीचे पुढारी आणि मुत्सद्दी डाऊनिंग स्ट्रीटवर येत असतात. त्यांना लॅरी थेट ब्रिटीशच वाटतो. अगदी कमी वेळा तो आपलं प्रेम व्यक्त करतो.
लॅरी प्रेमळ नाही, भांडकुदळही नाही. पाहुणे म्हणून आलेल्या किंवा दीर्घ मुक्कामासाठी आलेल्या प्राण्यांशी तो आदबीनं वागतो. ऋषी सुनाक पीएम म्हणून आले तेव्हां उत्सूकतेनं लॅरी दरवाजात गेला होता. सुनाक यांच्याकडं लॅब्रेडोर जातीचा नोवा नावाचा मोठ्ठा कुत्रा होता. लॅरी नोवाशी भांडला नाही. नोव्हा सुनाक यांच्या खोल्यातच रहात असे, तो बाहेर येत नसे. लॅरी आणि नोवानं आपापली राज्य वाटून घेतली होती. आक्रमण नाही.
अमेरिकन पुढारी येतात तेव्हां त्यांच्यासोबत अनेक भूभू असतात. अमेरिकन प्रेसिडेंट कुत्रे कां बाळगतात ते लॅरीला माहित आहे. आपण प्राण्यावर कसं प्रेम करतो हे त्यांना मतदारांच्या मनावर ठसवायचं असतं. अमेरिकेत माणसं कुत्रे बाळगतात, कुत्रे बाळगणारा प्रेसिडेंट त्यांना जवळचा वाटतो. म्हणून जगावर गंभीर चर्चा करतानाही अमेरिकन प्रेसिडेंट डाऊनिंग स्ट्रीटमधे कुत्रे आसपास ठेवतात. लॅरी त्यांच्याशी भांडत नाही. इतके वर्षं डाऊनिंग स्ट्रीटवर राहिल्यानं तो मुत्सद्दीच झालाय. अमेरिकेशी भांडायचं नसतं, नेहमी अमेरिकेच्या कलानं घ्यायचं असतं हे लॅरीला समजलंय.
सहा सात वर्षांपूर्वी डोनल्ड ट्रंप डाऊनिंग स्ट्रीटवर आले होते. दार किलकिलं झाल्यावर लॅरी सुसाट बाहेर आला. ट्रंपही क्षणभर वैतागले असणार, कारण पत्रकारांचं लक्ष ट्रंपकडून लॅरीकडं गेलं. लॅरीला जाम उत्सूकता होती. अमेरिकन प्रेसिडेंटची बीस्ट नावाची गाडी असते. लांब लचक. बाँब फुटला तरी बीस्टची चाकं फुटत नाहीत. गोळीबार, शार्पनेल, काहीही बीस्टला छेदू शकत नाही. लॅरीनं डाऊनिंग स्ट्रीटवरच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून बीस्टचं वर्णन ऐकलं होतं.
लॅरी बीस्टभोवती फिरला. एक चक्कर पूर्ण करून बीस्टच्या खाली विसावला.
१० डाऊनिंग स्ट्रीटच्या समोर फॉरिन ऑफिस आहे. तिथं एक मांजर होतं. त्याचं नाव पामरस्टन. त्याला विदेशकारण करणाऱ्या मुत्सद्द्यांबरोबर रहायची सवय होती. तिथं येणारे पाहुणे अगदी हलक्या आवाजात बोलत; न बोलता हातातल्या ग्लासमधून घुटके घेत घेत फक्त मान हलवत असत. लॅरिकडले पाहूणे म्हणजे नाटकी माणसं. लॅरीला नाटक्यांची सवय. लॅरीचं पामरस्टनशी जुळत नसे. दोघे रस्त्यावर येऊन मारामारी करत.
पामरस्टन २०२१ साली वारला. कसंही असलं तरी जातबंधूच. लॅरीला त्याची आठवण येत असणार.
लॅरी आताशा थोडा स्लो झालाय. सोळा सतरा वर्षाचं वय म्हणजे मांजरांचं म्हातारपणच.
तरीही लॅरीचं बरं चाललंय.
।।