इराणचं आव्हान
इराणचं युद्ध एका नव्या वैश्विक व्यवस्थेची सुरवात करून देत आहे. कुठल्याही देशानं कसं वागावं याचे वैश्विक नियम इराण युद्धामुळं नव्यानं ठरवावे लागणार आहेत.
या नव्या व्यवस्थेची आवश्यकता लक्षात येतेय ती इराणनं होरमुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून फी वसूल करण्यामुळं.
इराण होरमुझमधून जाणाऱ्या जहाजाची तपासणी सरकार करेल. जहाजाचा आकार, त्यातला माल इत्यादी गोष्टींबरोबर त्या जहाजाची मालकी कोणाकडं आहे आणि ते जहाज कुठे चाललंय याची तपासणी इराण करेल. जायला योग्य वाटेल त्यालाच परवानगी दिली जाईल, फी युवान या चिनी चलनात भरावी लागेल.
इराणच्या शत्रू देशाचं असेल, शत्रू देशाकडं माल घेऊन जात असेल तर जहाजाला दिली जाणार नाही. जहाजात इराणला घातक अशा गोष्टी असतील (उदा. शस्त्रं) तर जहाजाला मनाई.
युवान हे चीनचं चलन आहे. त्यामुळं सर्व व्यवहार चीन-इराण यांच्या देखरेखीखाली होतील. अमेरिकन चलन वापरलं जाणार नाही.
इराणच्या या मागण्या अयोग्य आहेत काय?
नाही. जसं अमेरिका, इस्रायल किंवा जगातला कुठलाही देश स्वतःच्या हिताला बाधक कोणतीही गोष्ट आपल्या परिसरात घडू देत नाही तसंच इराण वागतंय. कोणत्या चलनात व्यवहार करायचा हा निर्णयही प्रत्येक देश स्वतःचाच घेत असतो.
अमेरिकेला इराणचा निर्णय जाचक वाटतोय. कारण उघड आहे. अमेरिका आणि आखाती दोस्त देशांची अर्थव्यवस्था या नियमामुळं संकटात सापडणार आहे. आखाती देशांच्या तेलावर खूप फी बसली तर तेल महाग होईल, त्याचा खप कमी होईल. दुसरं म्हणजे अमेरिकन चलनाची जगावरची एकाधिकारशाही संपेल. अमेरिका ज्यांना भित्रट म्हणतेय ते युरोपीय देशही इथून पुढं युवानमधे किंवा इतर कुठल्या तरी चलनात व्यवहार सुरु करतील, अमेरिकन डॉलर घेणं बंद करतील. अमेरिकेच्या आर्थिक वर्चस्वालाच इराणनं आव्हान दिलंय.
वरकरणी अमेरिका इराणच्या मागण्यांना विरोध करू शकत नाही. कारण जे नियम अमेरिका जगाला लावतेय तेच नियम इराणही जगाला लावू पहात आहे. अमेरिकेनं आयात होणाऱ्या मालावर जकात लावलीय. ती जकात अतर्क्य आहे. १० टक्क्यापासून २०० टक्क्यापर्यंत ट्रंप जकात लावतात, काही दिवसांनी ती कमी करतात, काही दिवसांनी ती पुन्हा वाढवतात, काही दिवस जकात स्थगित ठेवतात. का तर म्हणे त्यांना त्यांच्या देशाचं हित साधायचंय. मग तेच तर इराण आता म्हणू लागलंय.
अमेरिकेचा मुक्त बाजार व्यवस्थेवर विश्वास आहे. पण मुक्त म्हणजे अमेरिका ज्या व्यवस्थेवर शिक्का मारेल ती मुक्त असा अर्थ अमेरिका घेते.जगात इतरही देश आहेत, इतरही बाजारपेठा आहेत, त्या देशांचं आणि बाजारपेठांचंही हित असतं हे ट्रंप विसरले आहेत. ट्रंप ते ढीग विसरले असतील जगानं ते कां विसरावं? अमेरिकेला स्वतःचं हित जपायचं असेल तर इराणलाही स्वतःचं हित जपण्याचा अधिकार आहेच की. तेच इराण सांगू पहातंय.
अमेरिकेनं आपले दोस्त गोळा केले. तसे इराण गोळा करतंय. इराण नव्यानं चीनला आपल्या दोस्तीत सामिल करून घेईल.अमेरिकेनं गोळा केलेल्या दोस्तांमधले काही दोस्त आता अमेरिकेपासून दूर जात आहेत. युरोपीय देश, जपान, कोरिया इत्यादी देश आता अमेरिकेची दादागिरी नको म्हणतात.तसंच इराणनं जवळ केलेला कतार किंवा अमिराती आता इराणपासून दूर जाईल.
इराण जगाचा राजकीय तोल नव्यानं मांडत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं सारं जग एकध्रुवीय करून टाकलं होतं. इराणच्या खटपटीमुळं जगात आता एकाद दोन नवे ध्रुव तयार होतील. युरोप हा एक ध्रुव होईल.चीन हा दुसरा ध्रुव होईल. आखाती देशही अमेरिकेच्या खुराड्यातून बाहेर पडून नवा ध्रुव तयार करतील. नवा तोल आकाराला यायला सुरवात झालीच होती. इराण त्या घडणीला वेग आणतय.
प्रत्येक देश स्वतंत्र असतो तसाच तो जगाचा एक भाग असतो. प्रत्येक देशाच्या वागण्याचा कमी अधिक परिणाम इतर देशांवर आणि जगावर होत असतो. देशांनी कसं वागावं, इतर देशांशी संबंध कसे ठेवावेत हे राजकीय अंगानं, कायद्याच्या अंगानं ठरवण्याचा प्रयत्न लीग ऑफ नेशन्स, युनायटेड नेशन्स या संस्थांनी केला. तो प्रयत्न फेल गेला कारण बड्या देशांनी ते प्रयत्न धुडकावून लावले. अमेरिका आणि रशिया जगाला काय वाटतं ते फाट्यावर मारून इतर देशांवर आक्रमण करून मोकळे होतात. एका परीनं अनधिकृत असलेल्या जागतीक न्यायालयानं दिलेले निर्णय इस्रायल, अमेरिका, रशिया बिनधास्त पायाखाली तुडवतात.
जगाचे आर्थिक व्यवहार सुकर व्हावेत यासाठी विश्वबँक, विश्व नाणेनिधी, विश्व बाजार असे प्रयत्न झाले. मुक्त बाजार हे त्या प्रयत्नांचं मुख्य सूत्र होतं. ते प्रयत्न बाजारवादी आणि सरकारवादी अशा दोन विचारांनी आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांचंही पंपाळं वाजलंय.
पुन्हा एकदा साऱ्या जगानं एकत्र येऊन साऱ्या जगाच्या हिताचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालीय. पर्यावरण हे एक वैश्विक आव्हान प्रत्येक देशासमोर उभं आहे. मी मनास वाट्टेल तसं वागेन असं प्रत्येक देश म्हणू लागल्यानं पर्यावरणाचे तीन तेरा वाजलेत. मी वाट्टेल तसं वागेन, त्यातून माझ्या देशाची वाट लागेल, मग माझ्या देशातले लोक इतर देशात जाऊन त्या देशांचा बोजा बनतील. मला काय करायचंय त्याचं असं देश मानू लागलेत.निर्वासीत, स्थलांतरीत, बेकारी आणि त्यातून निर्माण होणारी विषमता हे प्रश्न आता एका देशाचे राहिलेले नाहीत, साऱ्या जगाचे होऊन राहिलेत.
जगा आणि जगू द्या. हा अगदी साधा विचार साकार करण्याची वेळ आलीय. इराण युद्ध आणि इराणची भूमिका हे निमित्त आहे.