चित्रपट. गाझात मुलीचा मृत्यू
हिंद रजबच्या विनवण्या
‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ या चित्रपटाला २०२६ च्या ऑस्करला नामांकन मिळालं होतं.
हिंद रजब नावाची एक सहा वर्षाची मुलगी आहे. रामल्ला या वेस्ट बँकमधल्या गावात ती कारमधे अडकून पडलीय. तिच्या सोबत तिचे चुलतेचुलती आहेत. दोघंही रक्तबंबाळ होऊन मेलेत. तिच्या सोबत तिची चार भावंडं आहेत. पैकी तिघं मेलेत, एकच जिवंत आहे. इस्रायली सैन्यानं तिचं गाव उध्वस्थ केलंय. सारं कुटुंब चंबुगवाळं आटोपून दुसऱ्या जागी आसरा घ्यायला निघालं असताना इस्रायली सैन्यानं त्यांच्या कारवर गोळीबार केलाय. हिंद जखमी आहे.
हिंदजवळ फोन आहे. पॅलेस्टिनी मदत केंद्राशी तिचा संपर्क झालाय. ती फोनवरून मदत केंद्राला विनंती करतेय की अँब्युलन्स पाठवा, डॉक्टर पाठवा. मदत केंद्र अँब्युलन्स मिळवायच्या प्रयत्नात आहे. केंद्रात अँब्युलन्स, त्यात पॅरामेडिक, नर्स, औषधं तयार आहेत. अँब्युलन्स हिंद पर्यंत पोचू शकत नाहीये. कारण हिंद होती ते ठिकाण जमीनदोस्त आहे, तिची कार सैनिकांनी वेढलीय. तिथपर्यंत अँब्युलन्स पोचायची तर इस्रायली सैन्याची परवानगी हवी, इस्रायली सैन्यानं वाटेतल्या सैनिकांना सांगायला हवं की अँब्युलन्सला हिंद पर्यंत जाऊ द्या.
मदत केंद्राची खटपट चाललेली असते. पॅलेस्टाईन उध्वस्त करणाऱ्या सैनिकांनाच विनंती करावी लागतेय की अँब्युलन्सला परवानगी द्या. मारणाऱ्यालाच सांगायचं की त्यानं जखमीला वाचवावं.
हिंद फोनवर बोलत असते, मदत केंद्रावरचे कर्मचारी तिला सतत बोलतं ठेवून धीर देत असतात, मदत पोचतेय, दम धर असं तिला सांगत असतात.
हिंद दिसत नाही. तिची कार दिसत नाही. सभोवतालची जमीनदोस्त स्थिती दिसत नाही. फक्त हिंदचा आवाज ऐकायला येतो. हिरव्या स्क्रीनवर तिच्या आवाजाचे चढउतार, वेव्हज दिसत असतात. हिंदची स्थिती काय असेल याची कल्पनाच फक्त आपण करायची.
हा सिनेमा आहे आणि हिंद मेलीय हे आपल्याला आधी माहित असतं. हिंद वाचावी असं आपल्याला वाटत असतं. तरीही मृत्यूपर्यंतच काय घडतंय ते आपल्याला पहायचं असतं. हिंदचा शेवटी मृत्यू होतो. अँब्युलन्स निघालेली असते. अँब्युलन्स हिंदपासून काही फूट अंतरावर असते. इस्रायली तोफेचा एक गोळा अँब्युलन्नसवर आदळतो. त्यातले आरोग्य कर्मचारी आणि अँब्युलन्स नष्ट होते. हिंदच्या गाडीवर गोळीबार होतो. हिंद मरते.
लष्कराच्या एका शाखेनं अँब्युलन्सला जायला परवानगी दिली असते, लष्कराची दुसरी शाखा अँब्युलन्स खलास करते.
चित्रपट काहीसा माहितीपटासारखा आहे. त्यातला हिंदचा आवाज खरा आहे. चित्रपटात दिसणारे कार्यकर्ते कल्पिलेले आहेत. त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची कल्पना करून पटकथा लिहिलेली आहे. त्यामुळं बहुतांशी चित्रपट माहितीपट न होता, फीचरपट होतो, डॉक्युड्रामा होतो.
स्फोट दिसत नाहीत, तोफा दिसत नाहीत, रणगाडे दिसत नाहीत, नष्ट घरं दिसत नाही, गोळ्यांनी चाळण केलेली कार दिसत नाही, रक्तबंबाळ हिंद दिसत नाही. त्या साऱ्याची कल्पना आपण करायची, आपण गुंतून रहातो ते धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यामधे.
चित्रपटात न दिसणारी गोष्ट म्हणजे पॅलेस्टाईन संघर्ष. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केला. दुसऱ्या दिवसापासून इस्रायलनं गाझावर आक्रमण केलं, गाझा जमीनदोस्त करायला सुरवात केली. हिंदचं मरण ही त्या काळातली घटना आहे.
एक जीव तडफडतोय. तो वाचवू शकेल अशी व्यवस्था समोर दिसतेय. उपाशी माणूस आहे. समोर अन्न आहे. अन्न उपाशी माणसाच्या तोंडात पडत नाही. सारं जग असहाय्य, हतबल, काही करू शकत नाही.
अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. जेरुसलेममधल्या लष्करी अधिकाऱ्याला फोन करा. तो गाझातल्या अधिकाऱ्याशी बोलणार. गाझातला अधिकारी रामल्लातल्या अधिकाऱ्याशी बोलणार. रामल्लातला अधिकारी, गाझातला अधिकारी, जेरुसलेममधला अधिकारी आपसात चर्चा करणार. ते सर्व मिळून अँब्युलन्सला परवानगी देणार. ती परवानगी मिळून अँब्युलन्स निघाली की वाटेत जागोजागी ती अडवणार, इतर अधिकाऱ्यांकडून कन्फर्म करून घेणार. तरीही स्थानिक सेनाधिकारी अँब्युलन्स उडवणार. कां? त्याची मनमर्जी? संवादाचा अभाव? लालफीतशाही? की डोकं बंद करून फक्त विध्वंस करा अशी आज्ञा?
गाझामधे युद्ध स्थगित करण्याचे प्रयत्न कित्येक महिने चालले होते. त्रयस्थाला वाटतं की इतका वेळ कशाला लागतो? ट्रंप, नेतान्याहू आणि इस्रायलचा सेनापती यांनी फोनवर बोलावं, पाच मिनिटात मामला संपावावा. तसं कां घडत नसेल याची कल्पना प्रस्तुत चित्रपट पहाताना येते.
हिंद मरते. इलाज नाही. हिंदचे कुटुंबीय मरतात. त्याला इलाज नाही. हिंदला वाचवायला गेलेले डॉक्टर आणि नर्सेस मरतात. त्याला इलाज नाही. यम एकदा निघाला की तो असा सहजा सहजी थांबत नसतो.
प्रस्तुत सिनेमा अमेरिकेत, इस्रायलमधे दाखवला अगदीच कमी सिनेघरात दिसला. सिनेमात करमणूक नाही त्याला वितरक काय करणार? त्याला पैसे वसुल करायचे असतात.
भारतातल्या चित्रपट महोत्सवात हा सिनेमा यायचा होता. भारत सरकारनं परवानगी नाकारली. कां? मुसलमानांची बाजू मांडायची नाही? इस्रायल-अमेरिकेचीच बाजू मांडायची?
हिंदचा मृत्यू झाल्यानंतर आठवडाभरानं ही घटना पत्रकारांनी प्रसिद्ध केली. जगभर ओरडा झाला. प्रस्तुत चित्रपट सोडता आणखी दोन चित्रपट या विषयावर झाले. चित्रपटाचं चित्रीकरण गाझात शक्य नव्हतं. ट्युनिशियनात चित्रीकरण झालं. ट्युनिशियन आणि फ्रेंच माणसांना हा चित्रपट करावासा वाटला, करणं जमलं. समजण्यासारखं आहे.
ऑस्करमधे प्रेक्षक हा चित्रपट पाहून खूप हळहळले. चित्रपट निर्मितीच्या तंत्राच्या हिशोबात हा चित्रपट तसा साधाच आहे. विषय सरळ रेषेत मांडला गेल्यानं प्रभावी ठरला.
चित्रपटाला बक्षीस मिळालं नाही.
।।