इराण युद्ध स्थगिती, एक नाटक?

इराण युद्ध स्थगिती, एक नाटक?

 डोनल्ड ट्रंप यांनी इराणी सिविलायझेशन नष्ट करण्याचा कार्यक्रम दोन आठवड्यासाठी स्थगित केला आहे. जगानं सध्या तरी हुश्श केलं आहे.

७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजता ट्रंप यांनी इराणला अंतिम इशारा दिला होता. २४ तासाची मुदत देतो, होरमुझ सामुद्रधुनी मोकळी करा, नाही मान्य केलंत तर चोविस तासात इराण नष्ट करेन, इराण पुन्हा अश्मयुगात जाईल.

पाठोपाठ तिकडं इस्लामाबादमधे प्रधान मंत्री  शहाबाज खान त्यांचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या सोबत चर्चा करू लागले. 

२८ फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवर हल्ला सुरु केला त्यानंतर   खान यानी सौदी,इजिप्त, तुर्किये, कतार यांच्या परराष्ट्र मंत्र्याशी युद्द कसं थांबवता येईल याची चर्चा सुरु केली. चर्चा एक तरफी होती. या पैकी कोणाशीही अमेरिका अधिकृतरीत्या बोलत नव्हतं. ट्रंप यांच्या डोक्यात काय आहे ते कोणालाच कळत नव्हतं. नंतर नंतर इराणनं कतार, कुवैत,सौदीवर रॉकेटं सोडायला सुरवात केल्यानंतर स्थिती अधिक बिकट  झाली, वरील मंडळी बुचकळ्यात पडली होती. ट्रंप काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

३० मार्चला वरील सर्व परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमधे जमले. या बैठकीत चीनचा प्रतिनिधी नव्हता. पण चीनचे परराष्ट्रमंत्री सतत शहाबाज खान यांच्या संपर्कात होते. चीननं स्वतंत्रपणे इराणशी संपर्क केला होता आणि युद्ध थांबवण्यासाठी चांगली संधी शोधा असं इराणला सांगितलं होतं. चीनचा दबाव अमेरिकेपेक्षा इराणवर अधिक होता.आखाती देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या होत्या. चर्चेमधे अमेरिकेबद्दलचा राग व्यक्त होत होता. लढाई मुळात इस्रायलची आहे, अमेरिका ती खेळतंय आणि त्यात आपल्याला विनाकारण ओढतंय याचा राग परराष्ट्र मंत्री व्यक्त करत होते. अमेरिकेनं आपल्याला दिलेलं संरक्षण इराणी हल्ल्यामुळं कुचकामी ठरतय, मग अमेरिकेच्या नादी आपण कशाला लागायचं असा सूर त्या बैठकीमधे उमटत होता.पण कोणतीही ठाम भूमिका घ्यायची हिमत कोणी करत नव्हतं.

शहाबाज खान यांचे अमेरिका आणि इराण दोघांशीही संबंध होते. त्यांच्या पातळीवर त्यांनी अमेरिकेच्या मागण्या आणि इराणच्या मागण्या मिळवल्या. या मागण्या ते त्या त्या देशांकडं पाठवत होते. पण दोन्ही देश आपल्या भूमिकेवरून ढिम्म हलत नव्हते. इराण किती ताठर आहे याची चांगलीच कल्पना पाकिस्तानला होती पण ट्रंप यांच्या डोक्यात काय आहे ते कळत नव्हतं, ट्रंप थेट कोणाशीही बोलायला तयार नव्हते. 

सात तारखेला ट्रंप यांची घोषणा शहाबाज खानना अपेक्षीत नव्हती. ट्रंप चाचपडत आहेत, मागंही फिरता येत नाही आणि पुढंही जाता येत नाही या स्थितीत ते काय करतील याचा अंदाज शहाबाज खान, सोबतचे आखाती परराष्ट्र मंत्री यांना येत नव्हता. पण तरीही शहाबाज खान अमेरिकी लष्कर आणि इराणी आरजीसी या संघटनेशी संबंध ठेवून होते. लोचा असा की त्या लष्करी संघटनांनाही काही सांगता येत नव्हतं. लष्करांकडं काही योजनाच नाहीये की योजना आहे पण ते सांगत नाहीयेत याचा उलगडा शहाबाज खान यांना होत नव्हता.

सातच्या सकाळच्या घोषणेनंतर शहाबाज खानांची धावपळ सुरु झाली. घोषणा करण्याआधी ट्रंप यांनी आखाती देश, इजिप्त, तुर्किये यापैकी कोणाशीही संपर्क केलेला नव्हता. शहाबाज खानांनी दुपारनंतर अमेरिकन लष्कराशी संपर्क केला. अमेरिकन सेनापती गप्प. 

ट्रंप त्यांच्या टीमशी बोलत होते, परिस्थितीचा अभ्यास करत होते. या धमकीनंतर इराण शरण येईल, युद्ध थांबवण्याची विनंती करेल अशी ट्रंपची अपेक्षा होती काय? सीआयएचा इंटेलिजन्स काय सांगत होता? इराण कायमच्या,दीर्घ लढाईची आखणी करत होतं हे सीआयएनं ट्रंपना सांगितलं नाही? इराण अत्यंत कडवट आहे, कितीही विध्वंस सहन करायला तयार आहे याची कल्पना ट्रंपना आली होती की नाही? कल्पना आली असूनही देऊन पाहूया एकादी धमकी असा हिशोब ट्रंपनी केला होता काय?

काहीच कळायला मार्ग नव्हता.

शहाबाज खानांकडून आलेला मसुदा नवा नव्हता. ट्रंप यांचा १५ कलमी प्रस्ताव आणि इराणचा १० कलमी प्रस्ताव  कित्येक दिवसांपासून अमेरिकेकडं पडून होता, त्यावर एक इंचही हालचाल झाली नव्हती. दुपारनंतर कधी तरी ट्रंपनी पलटी मारायचं ठरवलं. याआधी तीन वेळा तरी ट्रंपनी पलटी मारलीच होती, त्यामुळं पलटी मारणं ट्रंपना नवं नव्हतं, त्यात आपली टिंगल होतेय असं ट्रंपना वाटणार नव्हतं. शहाबाज खानांनी केलेली विनंती ट्रंपना तराफा म्हणून उपयोगी पडली.

  शहाबाद खान, असीम मुनीर आणि नेतान्याहू यांच्याशी अमेरिकेची खुमखुमी संपली आहे. अमेरिकन लोकमत आणि सेनेचं मत ट्रंपच्या विरोधात आहे. अमेरिकेला युद्ध आवरतं घेणं मस्ट आहे. संध्याकाळी पाचनंतर फोनवर बोलले. 

नेतान्याहू काय म्हणाले असतील? आठवडाभर नेतान्याहू यांच्याशी बोलणी, वाद झाले होते आणि नेतान्याहू ट्रंपना सांगत होते की काहीही करा युद्ध थांबवू नका. लेबनॉन, गाझा आणि इराणशी ते देश पूर्ण संपेपर्यंत लढायचं असं नेतान्याहूंच्या डोक्यात आहे. त्यामुळं युनो, युरोपीय देश, जगातले अन्य देश यांनी कितीही विनंत्या केल्या तरी नेतान्याहू थांबत नाहीत. गाझात अधिकृत युद्ध स्थगिती झाली असूनही नेतान्याहू दररोज गाझातल्या इमारती,शाळा, हॉस्पिटलं उडवत आहेत, माणसाना मारत आहेत. त्यामुळं नेतान्याहूनी स्थगितीला विरोधच केला असणार. 

अमेरिकेची खुमखुमी संपली आहे. अमेरिकन लोकमत आणि सेनेचं मत ट्रंपच्या विरोधात आहे. अमेरिकेला युद्ध आवरतं घेणं मस्ट आहे.

नेतान्याहू स्थगितीला मनापासून तयार नाहीत. ते हल्ले करतच रहातील. त्यामुळं स्थगिती कधी मोडेल सांगता येत नाही.

अमेरिका आणि इस्रायल हल्ले करणार असेल तर इराण प्रत्युत्तर देतच राहील. 

स्थगिती किती टिकेल ते कसं सांगावं? 

गाझात ट्रंपनी युद्ध स्थगिती केली, गाजावाजा करून. प्रत्यक्षात गाझातलं युद्ध सुरुच आहे.

इराणमधे काही वेगळं होईल?

।।

Comments are closed.