इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

 पाकिस्ताननं इराण युद्धाला स्थगिती देण्यासाठी मध्यस्थी केली. अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमधे भेटले. एकमेकांची तोंड पहायला तयार नसलेली माणसं समोरासमोर कशी काय बसली? हे कसं घडलं?

पाकिस्तानचे सरसेनापती असीम मुनीर यांनी वरील घटना घडवून आणली.

असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याशी फोनवर थेट बोलले. 

ट्रंपच्या मते असीम मुनीर हा त्यांचा ग्रेट फ्रेंड आहे. मुनीर यांचा फोन ट्रंप पटकन घेतात. मुनीरनी भेट मागितली तर ट्रंप पटकन तयार होतात.

मुनीरना चमकोगिरीसाठी काही तरी हवं होतं, इराण युद्ध कामी आलं.

पाकिस्तानची राजवट लष्कर चालवत असतं. अगदी पहिल्या दिवसापासून. पाकिस्तान निर्माण झालं तेव्हां जिना यांना न विचारताच तत्कालीन सेनापतीनी काश्मिरमधे फौजा पाठवल्या होत्या. पाकिस्तान केवळ आपल्या मुळंच टिकून आहे, नाही तर भारतानं केव्हां पाकिस्तानची शकलं करून काश्मिर ताब्यात घेतला असता असं लष्कराला वाटतं.

 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत कारण लष्कराला ते नको होते. सध्याचे पंतप्रधान शहाबाज शरीफ पंतप्रधान पदी टिकून आहेत ते लष्कराच्या बळावर. पाकिस्तानच्या अर्थव्यवहारात लष्करानं स्थापन केलेल्या आणि चालवलेल्या संस्थांचा  मोठ्ठा वाटा असतो. या कंपन्या बिझनेस कंपन्या या रुपात काम करत असतात. अलीकडं लष्करानं खाणीतून मौल्यवान खनीजं उकरायला सुरवात केलीय, ही खनीजं विकण्यासाठी एक बिझनेस कंपनी तयार केलीय. 

खनीजं उकरणं आणि विकणं यासाठी मार्केटिंग करण्याच्या खटपटीत सध्या सरसेनापती मुनीर आहेत. त्यासाठी ते अमेरिकेत गेले होते. ओबामा आणि बायडन यांच्या काळात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध दुरावले होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानातून (म्हणजे पर्यायानं पाकिस्तानातून) काढता पाय घेतल्यावर अमेरिकेला पाकिस्तानात  रस उरला नव्हता. अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन देशांच्या मेहेरबानीवर पाकिस्तान चालतो. त्यातला अमेरिका दूर झाल्यावर पाकिस्तानचे वांधे झाले होते. 

ट्रंप मुनीरच्या हाती सापडले. बायडन जे जे करतील त्याच्या विरोधात उद्योग करायचे असं ट्रंप यांचा फंडा होता. मुनीरच्या ते पथ्थ्यावर पडलं. 

अमेरिकेतल्या उद्योगांना मौल्यवान धातूंची आवश्यकता असते, ती अमेरिकेला बाहेरून आणावी लागतात. चीननं मौल्यवान धातूची साठवण करून तो बाजार ताब्यात घेतलाय. अमेरिका डेस्परेटली धातू मिळवायच्या खटपटीत आहे. झेलेन्सकीला मौल्यवान खनीजांच्या बदल्यात शस्त्रं द्यायला ट्रंप तयार झाले होते.

मुनीरनी ट्रंपना सांगितलं की पाकिस्तानात मौल्यवान खनीजं आहेत. ट्रंप आणि वास्तव याचा संबंध नसतो. पाकिस्तानात किती खनीजं आहेत याचा तपास करावा असं ट्रंपना वाटलं नाही. ट्रंप मुनीरच्या प्रेमात. 

मुनीर एके दिवशी खनीज माती बटव्यांत भरून ट्रंपना भेटायला व्हाईट हाऊसमधे गेले. त्यांना थेट प्रवेश. लोक खनीजांबद्दलची माहिती व पुरावे कागदोपत्री नेतात, डिजिटल स्वरूपात नेतात. कोणी कुदळ फावडं आणि घमेली घेऊन फिरत नाही.  ट्रंप यांची रीतच न्यारी. 

ट्रंप मुनीरवर खुष. मुनीर ग्रेट आहेत, पाकिस्तान खनीज श्रीमंत आहे असं ट्रंप म्हणू लागले.

पहेलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला पाक लष्कराला महागात पडला होता. पाकिस्तानच्या हवाई तळांचं खूप नुकसान झालं होतं. पाकिस्तानच्या नौदलावर हल्ला होण्याची शक्यता होती. जैशे महंमदच्या तळांचं, म्हणजेच पाकिस्तानच्या आयएसआयच्या तळांचंही खूप नुकसान झालं होतं. भारताचा हल्ला थांबण्याची शक्यता नव्हती. 

 भारत हल्ला तीव्र करण्याची शक्यता होती. भारताशी संपर्क होऊ शकत नव्हता, भारत दाद देत नव्हता.

मुनीरनी डोनाल्ड ट्रंपशी संपर्क साधला. ट्रंपनी आधीची युद्धे थांबवून (?)शांतता प्रस्थापित केली याबद्दल त्यांनी ट्रंपचं भरमसाठ कौतुक केलं. 

ट्रंप खुष. 

मुनीरनी भारताचा हल्ला थांबवा, जगात फक्त तुम्हीच  युद्ध थांबवू शकतात असं म्हणाले,गळ घातली.

  ट्रंपच्या टॅरीफच्या धमक्या. मोदी गळपटले. सिंगूर कारवाई थांबली. 

या खटाटोपात मुनीरनी पाकिस्तानी माध्यमं वापरली. भारताचे नुकसान केल्याच्या बातम्या पसरवल्या. ट्रंपच्या सांगण्यावरून थांबलो असं सांगितलं. आपली अब्रू वाचवलीच नव्हे तर वाढवली. 

मुनीरना फील्ड मार्शल किताब मिळाला.

पाकिस्ताननं ट्रंपना शांततेचं नोबेल द्यावं अशी मागणी केली.

ट्रंप अती खुष.

मुनीर काही ना काही निमित्तानं ट्रंपना फोन करून भरमसाठ स्तुती करतात.

तसाच एक खुशामदी फोन मुनीरनी ट्रंपना केला. आपण इराण युद्ध थांबण्यासाठी मध्यस्थी करायला तयार आहोत असं सांगितलं.

ट्रंप त्यांनीच तयार केलेल्या कोंडीत अडकले होते. हज्जारो हल्ले करूनही इराण शरण येत नव्हतं. येवढंच नव्हे तर आपल्याला गरज नाहीये, गरज असल्यास अमेरिकेनंच बोलायला यावं असं इराण म्हणत होतं. युद्ध अमेरिकेनं सुरु केलंय, ते अमेरिकेनंच एक तरफी पद्धतीनं थांबवावं असं इराणचं म्हणणं होतं. इराणनं होरमुझ सामुद्रधुनीची अशी गोची करून ठेवली होती की अमेरिका काहीही करू शकत नव्हतं. कोणतंही निश्चित उद्दिष्ट नसतांना चक्रमसारखे ट्रंप नेतान्याहूच्या आहारी जाऊन युद्धात पडले होते. युद्ध सुरु करण्याच्या आधी ट्रंप, नेतान्याहू, अमेरिकन सेनापती यांची बैठक झाली होती. सेनापती आणि ट्रंप यांचे सहकारी युद्धाच्या विरोधात होते. व्हान्स आणि रुबियोंनी तर युद्धाला कडक विरोध केला होता. तरीही ट्रंप युद्धात पडले.

ट्रंपना पळवाट हवी होती. आता पाकिस्तानंच आग्रह करतंय तर करूया स्थगिती असा ट्रंपचा पवित्रा होता.

पाकिस्तानात लष्कर आणि शरीफ यांची पार्टी बदनाम आहे. अफगाणिस्ताननं संघर्ष उकरून काढलाय, तो पाकिस्तानला महागात पडतोय. तहरीके तालिबान पाकिस्ताननं लष्कराच्या नाकात दम आणलाय. अशा स्थितीत एकादं नाटक करून लोकमत थंड करण्यासाठी मुनीरनाही एकाद्या नाटकाची आवश्यकता होती.

नाटक तीन अंकी नव्हतं. फक्त एक प्रवेश होता. तेवढा पार पडला.

।।

Comments are closed.