आरक्षणाचा बीजबिंदू हार्दिक पटेल.

आरक्षणाचा बीजबिंदू हार्दिक पटेल.

हार्दिक पटेल.
वय २२.
२६ ऑगस्ट २०१५ या दिवशी जगाला माहित झाले. त्या दिवशी पाच सात लाखापेक्षा जास्त माणसं त्यानं अहमदाबादेत भरवलेल्या सभेत सामिल झाली. त्या आधी एक महिना,  आणखी आधी सहा महिने, आणखी आधी वर्षभर हार्दिक पटेल अनामत आंदोलन चालवत होते, गावोगाव सभा घेत होते. आठवडाभर आधी सुरतेत घेतलेल्या सभेला दोनेक लाख माणसं गोळा झाली तिथून हार्दिक पटेल फॉर्मात आले. अहमदाबादेतली सभा म्हणजे सर्वोच्च बिंदू. 
(  अनामत हा आरक्षण या शब्दाला गुजराती प्रतिशब्द. गुजरातीत नेता या शब्दाला आगेवान असा प्रतिशब्द आहे. नगर पालिका या शब्दाला सुदराई असा प्रतिशब्द. गुजरातीत विधीमंडळात निवडून गेलेल्या माणसाला धारा’सभ्य’ असं म्हणतात.) 
अहमदाबादच्या सभेत  त्यांनी सविस्तर भाषण केलं. त्यातले मुद्दे असे. ” पटेल ( पाटीदार ) समाजात श्रीमंत माणसं आहेत पण कमी. बहुतांश शेतकरी  गरीब स्थितीत आहेत. त्याना नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षणसंस्थात प्रवेश मिळत नाही. पटेल समाजाला इतर मागासवर्गियात सामिल करून राखीव जागा द्या. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र इत्यादी भागात पटेल समाजाच्या समकक्ष समाज आहेत. त्यांचीही स्थिती वाईटच आहे. अशा २७ कोटी लोकांना आरक्षण हवं. सरकार आरक्षण देणार नसेल तर एकूणच आरक्षण जावं,  समाज मोकळा व्हावा, कोणालाच आरक्षण असू नये. … “
” … महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग, बाळ ठाकरे, राज ठाकरे इत्यादी माणसांपासून आपण प्रेरणा घेतो. गांधींचा मार्ग पाहू. तो उपयोगी नसेल तर भगतसिंगांच्या वाटेनं जाऊ….”
“….हार घातले की हार पत्करावी लागते. हार सोडा, तलवार हाती घ्या. …”
” ….आपण पाटीदार एक आहोत. लेवा पाटीदार आणि कडवा पाटीदार अशा दोन शाखा असल्या तरी त्या लव आणि कुश या जुळ्या रामपुत्रांचे वंशज आहेत. त्या जुळ्यांना जसं कोणी वेगळं करू शकत नाही तसं पाटीदारांनाही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही… आपल्या बहिणींवर कोणी हात टाकला तर तो हात तोडून टाका….एकी महत्वाची. आपल्यातलं कोणी वेगळं मत पसरवू लागला, वेगळं मांडू लागला तर त्याला हाकलून द्या,   कापा. ….”
अहमदाबादमधे या सभेनंतर आंदोलन झालं. आठ माणसं मेली. एका पोलिसाला जमावानं बदडून काढलं, त्यात तो मेला. पोलिसांनी अहमदाबाद शहरात फिरून पाटीदार वस्तीतल्या लोकांना घराबाहेर काढून बदडून काढलं. अनेक पाटीदार मुलांना पकडून कोठडीत घातलं. त्यातला एक मुलगा कोठडीत मेला. त्यानंतर हार्दिक पटेलनं दिल्लीत सभा घेतली. नंतर सुरत मधे सभा घेतली. आंदोलन देशभर पसरवायचं जाहीर केलं. 
एक सप्टेंबर २०१५ रोजी हार्दिक पटेलनी सुरतेत जाहीर केलं की ते उलटी दांडी यात्रा करणार आहेत. गांधीजींनी साबरमती ते दांडी अशी यात्रा काढली. पटेल दांडी ते साबरमती यात्रा काढणार आहेत. गांधीजी सर्व देशाशी बोलले. पटेल यात्रेत पाटीदार समाजाच्या लोकांच्या बैठका घेणार आहेत. पुढल्या काळात आपण गांधीगिरी करणार आहोत असं ते म्हणाले.
तर असे हे हार्दिक पटेल.
हार्दिक पटेल यांनी वारंवार ज्यांचं नाव घेतलं ते सरदार पटेल आणि महात्मा गांधी. दोघांनीही गुजरातच्या खेड्याखेड्यात जाऊन पाटीदार म्हणजे शेतकऱ्यांची समस्या समजून घेतली. कित्येक महिने रीतसर अभ्यास करून शेतसाऱ्याची ब्रिटिशांची व्यवस्था अन्यायकारक आहे हे सिद्ध केलं. ब्रिटिशांना निवेदनं दिली. ब्रिटीश ऐकत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन उभारलं. भारताची स्वातंत्र्य चळवळ उभारताना दोघांनी गुजरात आणि साऱ्या भारतभर कित्येक वर्षं घास घास घासली, बैठका घेतल्या, अभ्यास केला, वर्तमानत्रांतून विचार मांडले, सभा घेतल्या. कोणतंही आंदोलन उभारण्याआधी कार्यकर्ते आणि अभ्यासकांच्या टीम गांधीजी ठिकठिकाणी पाठवत, प्रश्नाचा अभ्यास करत आणि सर्वानुमते मंजूर असलेली मागणी आंदोलनात मांडत. 
हार्दिक पटेल हे कोण आहेत असा साहजिक प्रश्न पडतो.
हार्दिक पटेल विरमगामपासून दहा किमीवरच्या चंदन  नगर गावात १९९३ साली जन्मले. त्यांचं शाळेतलं शिक्षण विरमगाम या गावात झालं. त्यानंतर त्यांनी अहमदाबादेत बीकॉम केलं. 
हार्दिक पटेल धडपड्या स्वभावाचे. काही तरी करत रहायचं.
 त्यानी एक क्रिकेट टीम उभारली होती. तेव्हां सचिन तेंडुलकर हे त्यांचे आयडॉल होते. टीम केली. मुलं गोळा केली. त्याना शिकवायला एक कोच आणला. मग स्वतः मुलांचं कोचिंग करू  लागले. त्यातून चार पैसेही मिळवू लागले.
एकदा त्यांनी विरमगाम एस टी स्टॅँडबाहेर मोफत पाणी देण्याची व्यवस्था केली.
कॉलेजात असताना २०११ साली ( वय १८ ) त्यांचा संबंध लालजीभाई पटेल यांच्या सरदार पटेल सेवादल या संघटनेशी आला. या संघटनेची कामं अशी. पाटीदार तरुणांची  घुटका, तंबाखू इत्यादी व्यसनांपासून सुटका. पाटीदार समाजात स्त्री पुरुष प्रमाण व्यस्त असतं. पाटीदार मुलाना मुली मिळत नाहीत, पाटीदार मुली पैसेवाल्या पाटीदारांशीच लग्न करतात. तेव्हां पाटीदारांनी त्यांच्यातल्याच उपजातीतल्या ( म्हणजे लेवा-कडवा या जातींपेक्षा खालच्या थरातल्या पाटीदार जाती ) मुलींची लग्न घडवून आणणं. संस्था काढून पाटीदार मुलामुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणं. इत्यादी.
हार्दिक उत्साही आहे असं पाहिल्यावर लालजीनी त्याला संघटनेत सामिल केलं आणि वर्षभरात विरमगाम शाखेचं अध्यक्षही करून टाकलं.
याच काळात बाबू बजरंगी यांच्याशी हार्दिकचा संबंध आला. बाबू बजरंगी हे बजरंग दलाचे सक्रीय सदस्य. मुसलमानांशी मैत्री संबंध किंवा नाते संबंध आलेल्या हिंदू स्त्रियांना मुसलमानांपासून दूर करणं हे बाबू बजरंगी यांचं कार्य. त्यासाठी बळजोरी केली जात असे.२००२ साली झालेल्या दंगलीत मुसलमानांवर अत्याचार करण्याचे गुन्हे सिद्ध होऊन बाबू बजरंगी यांना शिक्षाही झाली होती. हार्दिकला हे सारं माहित होतं. याच काळात डॉ. तोगडिया यांच्याशीही हार्दिकचा संबंध होता.
हार्दिकचं गाव विरमगाम मतदारसंघातलं. विरमगाम मतदार संघात लागोपाठ दोन वेळा भाजपचा आमदार निवडून आला होता. हार्दिकचे आई वडील स्वतःचा व्यवसाय सांभाळून भाजपचे कार्यकर्ते होते. भाजपच्या राज्यात विरमगामचा विकास झाला नाही म्हणून हार्दिकचं गाव व इतरांनी भाजपवर राग धरला आणि काँग्रेसच्या तेजश्रीबेन पटेल यांना निवडून दिलं. टाटाचा नॅनो प्रकल्प बंगालातून बाहेर पडल्यावर नरेंद्र मोदी यांनी पटापट त्या प्रकल्पाला गुजरातेत विरमगामच्या परिसरात जागा दिली. शेतकऱ्यांची जमीन गेली, त्यांना नीट मोबदला मिळाला नाही या बद्दल शेतकरी म्हणजे पाटीदार नाराज होते. त्यामुळंही विरमागाम मतदार संघात भाजपचा पराभव झाला, काँग्रेसला जास्त मतं पडली.
ही माहिती देण्याचं कारण असं की हार्दिक पटेलचा परिसर, त्याच्या सभोवतालची माणसं, त्याचे नातेवाईक यांची राजकीय मतं कळायला मदत व्हावी.
हार्दिक पटेलना पत्रकारांनी बाबू बजरंगी, तोगडिया यांच्याबद्दल विचारलं तेव्हां हार्दिक म्हणाले की आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. आपण भाजपबरोबरच काँग्रेसच्याही लोकांसोबत काम केलेलं आहे. आपल्याला राजकारण नव्हे पटेल समाजाचं हित साधायचं आहे.
२०१२ साली हार्दिक पटेल सरदार पटेल सेवा दलाचे स्थानिक अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सेवा दलाच्या वेबसाईट्सचा ताबा घेतला. त्यावरून ते प्रचार करत.
२०१५ च्या जुलैमधे हार्दिक पटेलनी मेहसाणा विभागात पटेल समाजाच्या बैठका घेतल्या. मेहसाणा विभागातले पाटीदार हे मुख्यतः शेतकरी आहेत. बैठकात इतर विषयांबरोबरच पटेल समाजाच्या आर्थिक स्थितीवरही हार्दिक पटेल बोलत असत. ते आरक्षण या मुद्द्यावर जोर देत आहेत असं कोणाला वाटलं नाही. मेहसाणातल्या लोकाना  कदाचित शिक्षण, नोकऱ्यातलं आरक्षण या बद्दल आत्मियता वाटली नसावी. हार्दिक पटेल यांना थंड प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या बैठकांना शेदोनशे माणसांची उपस्थिती असे. एक दोन वेळा मात्र सभेममधे वातावरण तापलं होतं, तणाव निर्माण झाला होता, गडबड झाली होती, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.
२०१५ च्या ऑगस्ट महिन्यात सुरत विभागात झालेल्या सभांना वाढती उपस्थिती होती. त्यात तरुणांचा मोठ्ठा भरणा होता. प्रत्येक सभेमधे उपस्थित तरूण भडकलेले असत, काही तरी घडायला पाहिजे असं ते म्हणत. तरूण हिंसेच्या उंबरठ्यावर असत. सुरतेतली नव्वद टक्के तरूण मुलं कापड आणि हिरे उद्योगात काम करतात.  मालक पटेल आणि नोकरही पटेल. या उद्योगात आता नवं तंत्रज्ञान आलंय, यंत्रं आलीयत. यंत्रांमुळं अनेक माणसं बेकार झालीत. त्यामुळं सुरतेत तरूणांमधे चलबिचल आहे. तीच स्थिती अहमदाबादेत. अहमदाबादेत अनेक तरूणांचे आईबाप डॉक्टर, वकील इत्यादी आहेत, नोकरी करणारे आहेत. या पटेलांच्या  मुलांना मात्र कॉलेजात प्रवेश मिळत नाही, नोकरीत प्रवेश मिळत नाही. खुद्द हार्दिक पटेलच्या सख्ख्या बहिणाला पदवी परिक्षेत पहिला वर्ग मिळाला तरीही पुढल्या अभ्यासक्रमासाठी ती पटेल असल्यानं प्रवेश मिळाला नव्हता.
सुरतेतल्या सभांना मिळालेल्या प्रतिसादामुळं  हार्दिक पटेल यांना जोर आला. त्यांनी   दोन सोशल मीडिया कंपन्यांची मदत घेतली.  मोहिम चालवली. ट्विटर, फेसबुक अकाउंटवर मेसेजेस फिरू लागले. फेसबुकवर फ्रेंड्सची संख्या ५ च्या पलिकडं जाऊ शकत नाही. हार्दिकच्या व्यावसायिक मित्रांनी वेबसाईट्स तयार केले. त्यावरून हार्दिकच्या आंदोलनाची खबर जाऊ लागली. या साईटला एके दिवशी ५७ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली.
सोशल मीडिया. एकदा हार्दिक पटेल आणि त्यांचे मित्र एका तरूण स्त्रीसोबत सामुहिक सेक्स करतांना दाखवणारी क्लिप प्रसारित झाली. लाखोंनी ती पाहिली. सोशल मिडियात बनवाबनवीला प्रचंड वाव असतो, त्यात क्षणिक भावना चेतवल्या जातात त्यामुळं सोशल मिडियातल्या संदेशांकडं दुर्लक्ष करा असं हार्दिक पटेल यांच्या सोशल मिडिया कंपनीनं लोकांना सांगितलं.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हार्दिक पटेल यांचं अनामत आंदोलन लोकांच्या लक्षात आलं. सरदार पटेल सेवादलाचे लालजीभाई यांच्याही ते लक्षात आलं. आधी हार्दिकनं लालजीभाईंशी कधीच या मुद्द्याची चर्चा केली नव्हती. लालजीभाई आश्चर्य चकित झाले. ते हार्दिक पटेल यांच्या विरोधात वगैरे असल्यासारखं वाटत नाही. पण पटेल समाजाच्या विकासानं राजकीय वळण घेतलं हे लालजीभाईना आवडलं नाही.
राजस्थान, हरयाणातल्या गुजर आणि जाट लोकांची आरक्षणाची मागणी आहे. त्यांनी अनेक वेळा रास्ता रोको केले. पण राज्य-केंद्र सरकारनं त्यांना रोखून ठेवलं. दोन्ही ठिकाणी त्या जातींना आरक्षण द्यायची तयारी सरकारांनी दाखवलेली नाही. आता गुज्जर, जाट लोकांनी हार्दिक पटेलला आमंत्रण देऊन आपल्या जातीही आंदोलनात सामिल करून घ्या अशी विनंती केली आहे. 
महाराष्ट्रात पुरुषोत्तम खेडेकर या मराठा समाजासाठी आरक्षण मागणाऱ्या नेत्यानं हार्दिक पटेलांचं नेतृत्व मान्य केलं आहे. 
मात्र जितेंद्र आव्हाडांनी   हार्दिक पटेल यांचं आंदोलन भाजपनंच भडकवलं आहे असा आरोप केला आहे. 
भाजप आणि रास्व संघानं आपला या आंदोलनाशी संबंध नाही असं जाहीर केलं आहे. 

।।

4 thoughts on “आरक्षणाचा बीजबिंदू हार्दिक पटेल.

  1. patel community is rich and and due recession they might be facing some crunch but OBC and SC s are first to enjoy benefits or reservation.In community, it is possible one leads and one lags but does not mean to take law in hands and opt for violence , i found that this agitation is congress plot .

  2. १९८६ ते २००३ या सतरा वर्षात मी गुजरात च्या अनेक भागात फिरलो आहे, राह्यलो आहे. जवळ जवळ २०/२५ गुजराती कुटुंबांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. त्यात लेवा कडवा पटेल आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत (सौराष्ट्रात यांना "दरबार" म्हणतात.), कोळी आहेत, अहिर आहेत. हार्दिक पटेल आणि त्याच आंदोलन याबद्दल माझ्या परिचयाच्या लोकांपैकी बर्याच जणांना खूप आश्चर्य वाटत आहे. काही पटेल मित्रांचा म्हणन असा आहे कि आंदोलन "आरक्षण अजिबात काढून टाका" अशीच भूमिका घेऊन सुरु झाला होता. मग मधेच हे पटेल आरक्षणच कसा काय सुरु झाल हे काळात नाही.

  3. ब्रिगेडींनो…महाराजांनी महाराष्ट्राला नेतृत्व करण्याचे धडे दिले होते. पण तुमच्या " खेडेकरांनी " हार्दिक पटेलच नेतृत्व स्विकारून पुन्हा एकदा सिद्ध केल की त्यांना अजुन महाराज नीट कळलेच नाहित. त्यांना ते नीट कळले नाहित म्हणुनच तुमचीहि दिशाभुल होत आहे…अजुनहि वेळ गेलेली नाहि…भानावर या…सांभाळा स्वत:ला, निदान कणा तरी ताठ राहिल…

  4. What I like about this whole agitation is" Remove reservations for certain communities or include us in reserved category". Brahmin community is also suffering the same problems in open category.They are approx 4% of population. So can they not claim reservations for being a Minority group?Since reservations were meant only for 50 years there is a serious need to reconsider the issue.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *