वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीच्या पलिकडं, पाकिस्तानात, ६०० मीटरवर एका तरुणानं स्वतःच्या अंगावरच्या बाँबचा स्फोट करून साठेक माणसं मारली. खरं म्हणजे त्याला थेट हद्दीवर येऊन अधिक माणसं मारायची होती. वाघा हद्दीवर एक दार आणि दरवाजा आहे. तिथं दररोज संध्याकाळी पाक आणि भारतीय सैनिक झेंडा उतरवतात आणि मराठी नाटकात शोभावा असा मेलोड्रामा करतात. दोन्ही बाजूला हज्जारो लोक हा मेलोड्रामा पहायला जमा होतात. तेव्हां अशी काही हजार माणसं जमल्यास मारायची असा त्या आत्मघाती तरूणाचा इरादा होता. परंतू रेंजर्स या पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त असल्यानं त्याला हद्दीपर्यंत पोचता आलं नाही. परिणामी कमी माणसं मेली. भारतीय-पाक अशी दोन्ही माणसं मरण्याऐवजी निष्पाप पाकिस्तानी माणसं मारली गेली.
पाकिस्तानात आज हज्जारो मुलं अशा रीतीनं स्वतःला जीव घालवून इतरांना मारण्याला तयार आहेत. गेल्या आठवड्यात पेशावरमधे एका चर्चवर हल्ला करून दहशतवाद्यानी शंभर पेक्षा जास्त माणसं मारली आहेत. कधी कराचीत शिया माणसं मारली जातात. कधी बलोचस्तानात हजारा जमातीची माणसं मारली जातात. 
तहरीके तालिबाने पाकिस्तान या पाक तालिबान संघटनेतल्या एका फुटून निघालेल्या घटक संघटनेच्या तरूणानं हा स्फोट घडवून आणला. पाक तालिबान ही एक विस्कळित पाक दहशतवादी छत्री. या छत्रीखाली अनेक दहशतवादी संघटना वावरतात. त्यांचे आपसात संबंध वगैरे नसतात. ते एकत्रितपणेही निर्णय घेत नाहीत. दहशतवाद, इस्लामच्या हिंसक व्याख्या हा या संघटनांचा मुख्य जोडणारा धागा असतो.
बेकार, भविष्य नसलेले तरूण आणि दुसऱ्या टोकाला सुखवस्तू घरातले परंतू बेभान झालेले तरूण अलिकडं दहशतवादी संघटनांकडं वळत आहेत. सरहद्दीवरच्या विभागात त्यांना प्रशिक्षण आणि शस्त्रं मिळतात. नंतर हे तरूण संघटनेनं सांगितलेली हिंसा करत हिंडतात. हक्कानी नेटवर्कनं  उभारलेल्या हज्जारो मदरशांत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. रशियाविरोधात लढण्यासाठी या मंडळींना अमेरिकेनं, सौदी अरेबियानं पैसे आणि शस्त्रं दिली. पाकिस्तानच्या आयएसआयनं त्यांना थारा दिला. अल कायदानं त्यांना वैचारिक कुमक दिली. आयएसआय, पाकिस्तान सरकार आणि अमेरिकेनं हा भस्मासूर उभा केला.  
पाकिस्तानी तरूण अफगाणिस्तानात जाऊन लढले. रशियानं माघार घेतल्यानंतर हे तरूण दिशाहीन झाले, त्याना काम उरलं नाही. रिकामा न्हावी. अल कायदाच्या नादानं त्यांच्या डोक्यात एक चक्रम इस्लाम तयार झाला होता. अमेरिका आणि अमेरिकेच्या पैशावर जगणारं पाकिस्तान हे त्यांचे शत्रू झाले. पाकिस्तानी सरकार सही इस्लामी सरकार नाही असं ते म्हणू लागले. त्यांच्या मते खरा असलेला शरीया पाकिस्तानात लागू करावा असं ते म्हणू लागले. म्हणजे मुलीनी शिक्षण घेता कामा नये वगैरे. स्वात खोऱ्यात त्यांनी मुलींना शिक्षण देऊ पहाणाऱ्या मलालाला गोळ्या घातल्या. इस्लामाबादमधे लाल मशीद ताब्यात घेऊन शहर त्यांच्या शरीयाप्रमाणं चालावं यासाठी जबरदस्ती केली. थोडक्यात म्हणजे पाक सरकारच ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. 
अंगावर आलेल्या या दहशतवादींना पाकिस्तान-आयएसआयनं भारताकडं पाठवलं. जैशे महंमद सारख्या संघटनांत त्यांना गुंतवून मुंबईवर, भारतीय संसदेवर पाठवलं. काश्मिरात हिंसाचार करायला पाठवलं. त्या साठी अमेरिकनं दिलेला पैसा आणि शस्त्रं वापरली.
झिया उल हक यांच्या राजवटीनंतर पाकिस्तानचा   कबजा लष्कर आणि दहशतवादी-अतिरेकी संघटनांनी घेतला. संसद, न्याय व्यवस्था इत्यादी गोष्टी असतात खऱ्या. परंतू त्या कायदा  आणि लोकशाही पाळत नाहीत. नवाज शरीफही निवडणूक लढवतांना पाक तालिबानचा पैसा आणि पाठिंबा घेतात तेव्हांच त्याना प्रचार करता येतो. 
आंतरराष्ट्रीय दबाव, अमेरिकेचा पैसा आणि दबाव आणि अंतर्गत त्रास यातून वाट काढण्यासाठी पाक सरकारनं पाक तालिबानवर अफगाण सरहद्दीलगतच्या प्रांतात झर्बे अजब ही लष्करी कारवाई करून तिथले पाक तालिबान लोक मारले. नाईलाजानं. त्यामुळं स्थिती आणखीनच चिघळली. आता केवळ स्वात, बलोचस्तान, खैबर पख्तुनख्वा या विभागातच नव्हे तर थेट पंजाबातही दहशतवादी सक्रीय झाले आहेत. वाघा सरहद्दीजवळचा हल्ला हा एकीकडं पंजाबवरचा हल्ला आहे आणि त्याच बरोबर तो भारतावरचाही हल्ला आहे.
जैशे महंमदचा मसूद अझर अलीकडं सक्रीय झाला आहे. पाक व्याप्त काश्मिरमधे त्यानं नुकतीच हजारो माणसं गोळा करून भारताविरोधात जिहाद करण्याचं जाहीर केलं. त्याच मेळाव्यात त्यानं अफझल गुरुच्या पुस्तकाच प्रकाशन करून त्याला हीरो केलं होतं. 
पाकिस्तान नवाज शरीफ यांच्या हातात राहिलेला दिसत नाही. पाकिस्तानी लष्कर एक तर हतबल तरी आहे किंवा ते जैशे महंमद सारख्या संघटनाना सामिल तरी आहे.
वाघा हद्दीवरचा आत्मघाती हल्ला ही धोक्याची घंटा आहे. पाकिस्तान हा देश, पाकिस्तानी समाज आता आतिरेक्यांना, दहशतवाद्यांना शरण तरी गेला आहे किवा त्यांच्यापुढं तो असहाय्य तरी झाला आहे. तसं घडणं हे पाकिस्तानला जितकं त्रासाचं आहे तितकंच भारताच्या दृष्टीनंही ते एक संकट आहे.

बाय द वे जैशे महंमदचा पुढारी मसूद अझर म्हणजे कोण आहे लक्षात आहे ना? यालाच  १९९९ मधे भाजप सरकारनं, जसवंत सिंग यानी भारताच्या तुरुंगातून सोडवून तालिबान-पाकिस्तानकडं सोपवलं होतं. त्याच्या बरोबर आणखी दोन दहशतवादी आणि २० करोड डॉलरची रक्कमही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *