महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

सत्तेच्या खेळातली खडाखडी
सेना महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसणार आहे.
अगदी पहिल्या दिवसापासून मोदी आणि शहा यांची व्यूह रचना पक्की होती. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेत घेऊन किंवा सत्तेच्या बाहेर ठेवून खतम करायचं. 
निवडणुकीच्या आधी जागावाटपाचा घोळ चालू असताना भाजपची भूमिका पक्की होती. किती आणि कुठल्या जागा ही चर्चा केवळ एक खेळ होता.सेनेनं दुय्यम स्थान स्वीकारावं आणि न स्वीकारल्यास युती तुटावी असं ठरलेलं होतं. फक्त युती तुटल्याचं खापर सेनेच्या माथ्यावर फुटावं अशी व्यूहरचना अगदी पहिल्या दिवसापासून होती.निर्णायक बहुमताला लागतील तेवढ्या जागा भाजपला मिळाव्यात, त्यानंतर दुसरा नंबर सेनेचा असावा. तसं घडलं की स्वतंत्रपणे भाजपचं सरकार होईल. त्यानंतर सेनेचं अस्तित्व दुय्यम राहील.
भाजपनं स्वतःची यादी आधीच तयार करून ठेवली होती. अगदी मतदान केंद्रापर्यंतचा हिशोब तयार होता.  काँग्रेसमधून कुठले लोक येणार आहेत, मनसेमधून कोण फुटणार आहे इत्यादी बारीक सारीक तपशील भाजपनं ठरवले होते. कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या आधीच वाटून दिलेल्या होत्या. अगदी याच रीतीनं लोकसभेच्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या हालचाली भाजपनं केल्या होत्या. 
लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन, हिंदुत्ववाद, भ्रष्टाचार, सबके साथ विकास इत्यादी मोदींची भाषणं हा खेळातला एक भाग होता, तळामधे मतदान केंद्रापर्यंतची मतविभागणी आणि मतं गोळा करून मतपेटीत पडणं याचे निर्णय मोदींचा प्रचार  सुरु होण्याआधीच झाला होता. तेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही झालं.
 वरून एक आतून दुसरं या चलाख वागण्याच्या भाजपच्या पद्धतीला बळी पडता पडता सेना वाचली. 
युती तुटली. मतदान पार पडलं. भाजप उमेदवारांच्या विरोधात सेनेचे उमेदवार उभे ठाकले होते. इतर लोक जरी मैदानात असले तरी भाजप-सेना अशी लढाई झाली आणि त्यात सेनेचे ६७ लोक निवडून आले.   मोदींना आव्हान देऊन, मोदींना विरोध करून सेनेचे ६७ लोक निवडून आले, भाजपच्या उमेदवारांना पाडून निवडून आले. हा भाजपचा मोठ्ठा अपमान, पराभव होता. भाजपला तो झोंबला.  
मतदान पार पडल्यावर सरकार स्थापताना  भाजपनं  सेनेची अडवाअडवी केली. राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळवून घेतला. नंतर सेनेला सांगण्यात आलं की निमूट पाठिंबा द्या नंतरच किती मंत्रीपदं आणि कुठली खाती ते ठरवू.   भाजपनं मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि मंत्रीपदंही एकतरफी ठरवून टाकली. सर्व महत्वाची खाती भाजपनं आपल्याकडं ठेवली. सेनेचे सुधीर देसाई यांना हरवून निवडून आलेल्या ठाकूर यांना मंत्रीपद दिलं. दोन स्त्रिया आधीच मंत्री म्हणून नेमल्या. सेनेच्या सुधीर देसाई आणि नीलम गोऱ्हे या सीनियर माणसांना मंत्रीपदाची वाट अशा रीतीनं बंद केली.
भाजपचे डावपेच. एकतरफी.
केंद्रात मंत्रीमंडळात विस्तार करतांना सुरेश प्रभूंना  भाजपमधे  प्रवेश देऊन मंत्रीपद देऊन टाकलं. एनडीएचा घटक पक्ष असूनही सेनेला विश्वासात न घेता मंत्रीमंडळाचा विस्तार मोदींनी करून टाकला.
इतके अपमान झाल्यावर सेना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कशी जाणार?    समजा मंत्री समाविष्ट झाले तरी त्यांची अवस्था केंद्रातल्या अनंत गीतेंसारखी होणार.  कोणत्याही महत्वाच्या सल्ला मसलतीत सेनेचे मंत्री कटाप. तुम्ही कमी प्रतीचे आहात, आमच्या लेखी तुम्हाला किमत नाही असं सतत दाखवलं जाणार. 
सेना विरोधी बाकांवर बसणार, त्यामुळं  सेनेतले दहा बारा आमदार फुटणार. कोण फुटणार याची यादीही भाजपकडं तयार. फुटलेले आमदार सेनेच्या बाहेर पडणार. त्या जागी पुन्हा निवडणुक होणार.  ते आमदार स्वतंत्र किंवा भाजपच्या तिकिटावर लढणार. मोदी लाट त्याना निवडून आणणार. तेवढं पार पडलं की बहुमताला कमी पडणारे आमदार हाताशी येतील. मग काम झालं. 
सगळं आखून तयार आहे.
सेनेचं चाक पंक्चर झालं तर राष्ट्रवादीची स्टेप्नी तयार आहे.
मोदी यांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्या वक्तव्यातून नव्हे त्यांच्या कृतीतून दिसतात.  स्वतःच्या हाती त्यानी सारी सत्ता केंद्रित केली. देशात आणि महाराष्ट्रात भाजपच्या हाती पूर्ण सत्ता आली पाहिजे असं त्यांना वाटतं. भाजपच्या हाती म्हणजेच मोदींच्या हाती.
राष्ट्रवादी केव्हाही दगा देऊ शकतं. भ्रष्ट प्रकरणांचे फास लोंबकळत आहेत. त्यातून राष्ट्रवादींना आपापल्या मानगुटी सोडवायच्या आहेत. मानगुटी सुटल्या  तर भाजपची पंचाईत, न सुटल्या तर राष्ट्रवादीची पंचाईत असा एक पेच आहे. राष्ट्रवादी आणि सेना, कोणाचीही खात्री नाही त्यामुळं  महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका शक्य आहेत.
तेही भाजच्या अजेंड्यावर आहे. 
 पहा. कुबड्या घेउन काहीही करता येत नाही,  भाजपला निरंकुष सत्ता द्या असं म्हणत मोदी मैदानात उतरतील. मतदार त्यांना पाठिंबाही देतील, कदाचित. 
भाजपमधे गोंधळ नाही. त्यांची रणनीती स्पष्ट आहे. ठरलेल्या धोरणाला कोणी फाटे फोडू शकत नाही, कोणी त्यावर जाहीर बोलूही शकत नाही अशी एक चकडबंद चौकट भाजपमधे तयार झालेली आहे.
सेना हा एक अस्थिर असा घटक यात गुंतलेला आहे. तो दोन नंबरचा पक्षा आहे. तोच भाजपच्या डावामधे अडथळे आणू शकतो. आता पर्यंत उद्धव ठाकरे यांनी चलाखीनं डाव टाकले आहेत. सेनेचा कोणीही माणूस जाहीर बोलत नाही, उद्धव निर्णय घेतात, जाहीर करतात. भाजप प्रमाणेच ते घोळ घालू लागले आहेत. मंत्रीपदाची बात टाळून त्यांनी भाजपचा राष्ट्रवादीचा पाठिंबा हा तत्वाचा घोळ काढला आहे. तो घोळ समजा सुटला तर ते विदर्भाचा घोळ घालतील. भाजपला लोंबकळत ठेवतील. ते भाजप सारखाच डाव खेळत आहेत.
भाजपनं महाराष्ट्रात जाती, मतं, विविध पक्षांतले मातबर लोक यांना एकत्र केलं, चलाखीनं, शांतपणे. आपल्याला किती जागा हव्यात, त्यातल्या पक्क्या किती, कच्च्या किती, कच्च्या जागांवर इतर कोणाला घेता येईल याचा कॉर्पोरेट अभ्यास भाजपनं केला.  काँग्रेसला तो जमला नाही, सेनाही कमी पडली. भाजपची चलाखी त्याना समजली नाही, उमगली नाही. सत्ता हाती लागावी यासाठी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीही त्यानी हाताशी धऱले. त्यात चूक काहीच नाही. राजकारणात तत्वं ही गोष्ट डिझायनर पोषाखासारखी असते. कापड, रंग, शिवण्याची पद्धत, बटणं साऱ्या गोष्टी हव्या तशा बेतता येतात. राजकारणात मतं मिळणं महत्वाचं असतं. मोदी-शहा ते नेमकेपणानं करत आहेत. एके काळी काँग्रेसला ते साधलं होतं परंतू काँग्रेस अगदीच मोडकळीला आलेली चाळ असल्यानं लाटेपुढं काँग्रेस तग धरू शकली नाही. 
पुढल्या काळात दोन नंबरचा पक्ष म्हणून सेनेला आता खेळी करायची आहे. मतदार गोळा करणं, योग्य उमेदवार गोळा करणं इत्यादी चलाखी सेनेनं साधली तर ‘ अफझलखानाला ‘ रोखणं त्यांना जमेल.
सेना आणि भाजपमधे सत्तेसाठी स्पर्धा चालली आहे. सेनेला महत्वाची आणि बरीच मंत्रीपदं हवीत. भाजप त्याला तयार नाही. भाजपला स्वतःचं वर्चस्व करून टप्प्याटप्प्यानं सेनेला संपवायचं आहे. सेना संपवायची ही मोदी-शहांची रणनीती आहे. पहिल्या दिवसापासून. युती तोडणं, मंत्रीमंडळात फक्त आपलीच माणसं घेणं हे पहिल्यापासून ठरलेलं होतं फक्त त्या पापाचं खापर सेनेच्या माथ्यावर फोडायचं होतं. सतत काही ना काही तरी सबबी काढून. या रणनीतीची कल्पना प्रथम सेनेला आली नाही. पण नंतर सेनेनंही तोच डाव टाकला. कधी विदर्भाचा मुद्दा, कधी हिंदुत्वाचा मुद्दा, कधी सुरेश प्रभूना परस्पर मंत्रीपद देणं, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अशा सबबी काढून सेनेनं भाजपला खेळवलं. भाजपकडं पूर्ण बहुमत आणण्यायेवढे उमेदवारच नव्हते. म्हणून काँग्रेस व इतर ठिकाणहून उमेदवार आयात केले. तरीही बहुमत मिळालं नाही. असं लंगडं सरकार चालवण्यापेक्षा सेनेवर खापर फोडून पुन्हा मतदारांकडं जायचं आणि पूर्ण बहुमत मागायचं अशी भाजपची रणनीती आहे. म्हणूनच हे सरकार पडणं हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. सेनेमुळं, राष्ट्रवादीमुळं भाजपचं सरकार पडलंय असं भाजपला दाखवायचं आहे. तसं घडलं की महाराष्ट्रातली जनता अनेक पक्षांना विटून भाजपला बहुमत देईल असा मोदींचा होरा आहे. त्या दिशेनंच त्यांची वाटचाल आहे. हे सरकार चालवायची भाजपचीच इच्छा नाहीये.
दिवस बिकट आहेत. सरकार स्थापन होणं कठीण, स्थापन झालं तर चालणं कठीण, चाललं तरी सरकारच्या हातून काय घडेल ते सांगणं कठीण.

एक तर खरंच आहे. महाराष्ट्रातल्या माणसांशी कोणाला देणं घेणं आहे. दुष्काळ, सिंचन-वीज तुटवडा, शहरांची  हेळसांड, कामं पार पाडण्याची इच्छा शक्ती गमावलेली नोकरशाही इत्यादी गोष्टींची चिंता कोणाला आहे? प्रत्येक जण म्हणतो की आधी सत्ता द्या, मग पुढलं पुढं पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *