खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

  नितीन गडकरी हे भाजपचे वाहतुक मंत्री मानवी मूत्र या विषयावर बोलले. ते म्हणाले की शहरातल्या मॉलमधे गोळा होणारं मूत्र गोळा करून त्याचा उपयोग खतं तयार करण्यासाठी करता येईल, तसा विचार सरकार करत आहे. गडकरी नागपुरच्या आपल्या रहात्या घरात मूत्र गोळा करतात आणि झाडांना घालतात. महाराष्ट्रातले भाजपचे मंत्री एकनाथ खडसेंनी गडकरींना दुजोरा दिला, अहमदनगरच्या कृषी विद्यापीठामधे या विषयावर संशोधन केलं आहे असं त्यांनी सांगितलं. ( असं संशोधन झालेलं नाही असं कृषी विद्यापीठाच्या जबाबदार अधिकाऱ्यानं सांगितलं.) 
दोघांच्या या विधानांवर माध्यमात धमाल चर्चा झाली. खूप टिंगल झाली. 
मानवी मूत्राचा वापर शेतीमधे करणं आणि त्या संबंधात सेंद्रिय शेती हे दोन प्रश्न चर्चिले गेले. मूत्र म्हणजे नेमकं काय आहे याचा वैज्ञानिक विचार दूर ठेवून बहुतेक चर्चा झाली. एका माणसानं फेसबुकवर पोस्ट टाकली आणि त्यात इस्लाममधे झाडाखाली मूत्र विसर्जन करण्याला परवानगी नसल्याचं नबीचा हवाला देऊन सांगितलं. नबी म्हणजे अल्लाचा प्रतिनिधी. अरुण डिके नावाच्या एका माणसानं लोकसत्ता दैनिकाच्या ३ मे २०१५ च्या लेखात सेंद्रीय शेतीची भलामण करणारा लेख लिहिला आहे. मूत्र हे वाईट असं एक टोक आणि मृत्रादि  सेंद्रिय गोष्टी हा रामबाण असं दुसरं टोक.
माणसाच्या मुत्राचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. केलाही जातो. त्या अर्थानं नबी म्हणतो ते खरं नाही. मूत्र ( अधिक वनस्पतीचा कुजवून वगैरे वापर करून ) वापरून सेंद्रिय शेती केली की अन्न प्रश्न सुटेल, तीच खरी आणि पर्यावरणस्नेही शेती हे दुसरं टोक, तेही खरं नाही.
वास्तव या दोन्हींच्या मधे आहे.
एक लीटर मुत्रात ९५ टक्के पाणी, ९.३ ग्रॅ. युरिया, १.८ ग्रॅ.क्लोराईड, १.१७ ग्रॅ. सोडियम, ०.६७ ग्रॅ. पोटॅशियम आणि ०.६७ ग्रॅ. क्रिअॅटिनिन असतं. सूक्ष्म प्रमाणात फॉस्फेटही ( हार्मोन्स ) असतं. पैकी युरिया, पोटॅशियम आणि फॉस्फेट्स ( रासायनिक भाषेत एनपीके ) ही द्रव्यं वनस्पतीचा घटक असल्यानं वनस्पतीच्या निर्मितीच्या उपयोगी पडत असतात. प्रत्येक वनस्पतीला नत्-एन  (नायट्रोजन), पी ( फॉस्फरस ), के ( पोटॅशियम ) वेगवेगळ्या प्रमाणात लागतात. ज्वारी, ऊस, गहू, तांदूळ, द्राक्षं, कलिंगड, आंबा इत्यादि प्रत्येक पिकाला वरील घटक वेगवेगळ्या प्रमाणात लागत असतात. हे घटक वनस्पती मातीतून घेतं. मुत्रामधूनही ते घटक मिळू शकतात, मिळतात. परंतू पिकाच्या गरजेच्या हिशोबात मूत्रामधून मिळणारं एनपीके अपुरं असतं. केवळ मुत्रातलंच एनपीके वापरायचं झालं तर शेकडो लीटर मुत्र शेतात घालावं लागेल. केवळ मुत्र घालून पिकाची वाढ होत नाही. त्यासाठी इतर वाटांनी वरील घटक, विशेषतः नत्र, पुरवावं लागत असतं. वनस्पती कुजवली तर त्यातूनही नत्र मिळतं. मातीमधे असलेले ( आणि भुईमुगासारख्या पिकाच्या मुळावर असलेले ) विविध बॅक्टेरिया नत्र गोळा करून जमिनीत स्थिर करतात, मुळं तो शोषून घेतात. इतक्या सगळ्या मार्गानी जेव्हां घटक पिकाला मिळतात तेव्हांच पीक नीट वाढतं. 
पिकं घेतल्यामुळं व इतर कारणांमुळं वरील घटक जमिनीतून वजा होतात. ते जेवढे वजा होतात तेवढे जमिनीला परत द्यावे लागतात, तरच पिकांची वाढ होते. जेवढी पिकं जास्त घेतली जातात तेवढे वरील घटक जास्त प्रमाणावर जमिनीला परत द्यावे लागतात. शंभर ते हजार वर्षांपाठी जगात माणसंच कमी होती, त्यामुळं पिकंही कमी घेतली जात त्यामुळं जमिनीतली वरील घटकांची वजावट कमी होती. त्यामुळं काहीही न करता निसर्गाच्या चक्रामधे पिकं निघत असत.
जगाची लोकसंख्या वाढली. केवळ अन्नच नव्हे तर इतर बाबींसाठीही जमिनीतून वनस्पती उगवाव्या लागतात.तेवढ्या उत्पादनासाठी आवश्यक घटक नैसर्गिकरित्या जमिनीत तयार होत नाहीत.त्यामुळं वरील घटकांची भरती जमिनीत करावी लागते. केवळ मूत्र आणि सेंद्रिय खतांनी ही भरती होत नाही. सेंद्रिय शेती करून जगाच्या गरजा भागतील हे सांगणं अतिशय  खोटं, चूक आणि अवैज्ञानिक आहे. साऱ्या जगातलं मूत्र आणि वनस्रती गोळा करून पुन्हा जमिनीला परत केल्या ( फुकुओका यांची पद्दत ) तरिही जमिनीतली अन्नाची वजावट भरून निघत नाही. फुकुओका यांनी कोणतंही औद्योगिक खत न घालता शेती करून दाखवली खरी. परंतू ती एक हौस होती. जगाच्या अन्न प्रश्नाला ते उत्तर नव्हतं. अनेक माणसं भाबडेपणानं लिहून जातात की जगभर माणसं आता शहरं सोडून शेतीत जात आहेत आणि शेतीतही माणसं औद्योगिक खतं वापरणं सोडून पूर्णपणे शेती करू लागली आहेत. हजारात एकाद दोन माणसं हा उद्योग करत आहेत. हौस आणि प्रयोग म्हणून. कुणाला सेंद्रिय शेतीवर आधारित समाज हवा असेल तर माणसांची संख्या कमी करावी लागेल आणि जमिनीत काढल्या जाणाऱ्या वनस्पतींचं प्रमाण कमी करावं लागेल.
 वनस्पतीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ही रासायनिक द्रव्यं समजतात.  शिवाय मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक सूक्ष्म घटकही विविध द्रव्यांच्या रुपात वनस्पती ओळखते. मग ती द्रव्यं सेंद्रिय असोत की कारखान्यात तयार झालेली रासायनिक खतं असोत. हे घटक, सूर्यप्रकाश, हवेतला कार्बन डाय ऑक्साईड आमि पाणी यांचा वापर करून वनस्पती पानामधे साखर तयार करते. ही साखर पानं, फांद्या, खोडं, बिया, फळं, फुलं इत्यादी रुपं धारण करतात. पानांमधे तयार होणारी साखर विविध रुपात तयार होणं ही पूर्णपणे रासायनिक क्रिया आहे. या क्रियेसाठी लागणारा नायट्रोजन माणसाच्या मुत्रातला आहे की बैलाच्या वा उंटाच्या मुत्रातला आहे की कारखान्यात तयार झालेला आहे यात वनस्पती फरक करत नाही. माणसं आपल्या समजुतीसाठी, समाधानासाठी वरील रसायनं आणि क्रियांना भावना आणि रुपकं जोडतो.  
फुकुओका आणि श्री.अ. दाभोलकर ( प्रयोग परिवार ) या दोन वैज्ञानिकांच्या नावांचा गैरवापर सेंद्रिय शेतीवाले आणि राजकारणी शेतीवाले फार करतात. डिके यांनी लिहिलेला लेख त्या अर्थानं प्रातिनिधिक आहे.
 फुकुओका निसर्गाचं चक्र कसं आहे ते सांगत होते. वनस्पती कधी तरी मरते आणि मातीत मिसळते. प्राणी वनस्पती खातात आणि मलमूत्रावाटे वनस्पती जमिनीला  परत देतात. अख्खा माणूसच ( आणि प्राणीही ) नत्र, कार्बन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी द्रव्यांनी तयार झालेला असतो. ही द्रव्यं त्याचा शरिरात जन्माबरोबर आणि वनस्पतींमुळं येत असतात.माणसं-प्राणी मेले की त्यांची कातडी, हाडं, केस, दात इत्यादी गोष्टी जमिनीत जातात. म्हणजे वर उल्लेख केलेली द्रव्यं जमिनीत जातात. असं हे निसर्गाचं अविरत चक्र. फुकुओका हे चक्र मजेत पहात होते आणि ते तसंच चालू ठेवा असं म्हणत होते. बस. ती त्यांची मौज होती. ते त्यांचं जगातल्या अन्न प्रश्नावरचं उत्तर नव्हतं. जगभरची माणसं फुकुओकांचा आदर करतात, त्यांचं कौतुक करतात पण शेती करताना रासायनिक खतं, जंतुनाशकं, जैवतंत्रानं वाढवलेल्या बिया इत्यादी वापरतात. तसं जगानं केलं नसतं तर उपासमार झाली असती. 
दाभोलकरांनी सेंद्रिय शेती करा असं कधीही सांगितलं नाही. वनस्पती कशी वाढते याचा अभ्यास त्यांनी केला. वनस्पतीची वाढ गणिताच्या नियमांनी होते हे त्यांनी सिद्ध केलं. बी अंकुरण्यापासून तर कणीस तयार होईपर्यंत किंवा शेंग वेलावर वाढेपर्यंत किंवा द्राक्ष तयार होईपर्यंतचे टप्पे कोणते आणि प्रत्येक टप्प्यावर कोणकोणती रासानिक द्रव्यं लागतात त्याचं गणित दाभोलकरांनी सांगितलं. द्रव्यं लागतात तीही एका विशिष्ट प्रमाणात आणि मात्रेत. आकाशात ढग असतील तर जमिनीत नत्र देणं घातक ठरत असतं कारण नत्राची उचल करण्यासाठी पानाला सूर्यप्रकाश लागतो, तो जर नसेल तर नत्राचं खत न होता घातक विष तयार होतं. मुळाची वाढ पहिल्या काही दिवसांतच होते. त्याच काळात ठराविक रसायनं लागतात, ते दिवस गेल्यानंतर कितीही रसायन दिली तरी वनस्पती ती शोषून घेत नाही. शेती करणं म्हणजे केवळ या ना त्या स्वरूपात खतं देणं नव्हे तर वनस्पतीची वाढ प्रत्येक टप्प्यावर तपासून योग्य पद्धतीनं करावी लागते म्हणजे शेती.  
वयात आलेली हिरवी पानं ( एक चौरस फूट ) दिवसाचा सूर्यप्रकाश घेऊन ( मुळावाटे घेतलेल्या द्रव्यांच्या मदतीनं ) दिवसाला चार ग्राम साखर तयार करतात आणि त्यातली एक ग्राम साखर आपल्याला फळं, बिया इत्यादी रुपात मिळते हे गणित दाभोलकरांनी शेतकऱ्यांसमोर ठेवलं. त्यांनी सेंद्रिय पद्धतीनंही पिकं घेतली आणि रासायनिक पद्धतीनही. त्यांच्या प्रयोग परिवारातले शेतकरी आंबा आणि द्राक्षं ही पिकं घेताना रासानिक खतांचा वापर करत असत.  दाभोलकरांनी प्रयोग करत असताना शेणमूत्र, कुजवलेल्या वनस्रती यांचाही वापर केला आणि रासायनिक खतंही वापरली. 
वनस्पतीला लागणारे घटक योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पुरवणं म्हणजे शेती. प्रमाण कमी झालं तरी उत्पादनावर परिणाम होतो आणि जास्त झालं तरीही. आज रासायनिक खतांचा अवैज्ञानिक, प्रमाणाबाहेर, अवेळी पद्धतीनं वापर झाल्यानं जमिनीचं आणि शेतीचं नुकसान झालं आहे. सेंद्रिय पदार्थांचा वापरही प्रमाण आणि वेळेच्या हिशोबात अयोग्य झाला तरीही जमिन आणि शेतीचं नुकसानच होतं. शेण, पाला पाचोळा नीट कुजवला गेला नाही तर विषार होतो ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 
तेव्हां मुद्दा सेंद्रिय की रासायनीक असा नाही. मुद्दा आहे वैज्ञानिक विचारांचा. 
नबी काय म्हणतात आणि ऋषीमुनी काय म्हणतात यावर जाण्यात अर्थ नाही. विज्ञान सिद्ध झालेलं नव्हतं त्या काळात त्यांनी काहीबाही प्रयत्न केले.  नबी आणि ऋषीमुनींच्या काळात लोकसंख्या अगदीच कमी होती. माणसाच्या गरजा अगदीच प्राथमिक होत्या. माणसं फार जगतही नव्हती. जंतूंचा प्रादुर्भावही खूप होता.कसं कां होईना पण त्या काळातल्या लोकांनी निभावून नेलं. किंवा निभावण्याचा प्रयत्न केला असं म्हणूया.  आता काळ बदलला आहे. माणूस पूर्णपणे ज्ञानी झाला नसला तरी कित्येक गोष्टीमधलं अज्ञान कमी झालं आहे. शेतीतलं विज्ञान माणसाला समजलं आहे.  काळानं नव्या गरजाही  निर्माण केल्या आहेत. ते लक्षात घेऊन समाजाला धोरणं ठरवावी लागत आहेत. मागं जाणं शक्य नाही. 
एकनाथ खडसे आणि नितीन गडकरींनी घरातलं आणि मॉलमधलं मुत्र गोळा करायला काहीच हरकत नाही. कुंडीतल्या वनस्पतीसाठी ते वापरायचं असेल तर एक ग्लास मुत्रात पाच ग्लास पाणी घालून ते मातीत मिसळावं. अर्थात कुंडीतलं झाड कोणतं आहे यावरही मुत्राची योग्य मात्र ठरेल. समजा त्यांना ते शेतात पसरायचं असेल तर एक ग्लास मुत्राला आठ ग्लास पाणी या प्रमाणात पातळ करून ते द्यावं. काहीच बिघडत नाही. पालघरला सावे यांनी त्यांची शेती पहायला येणाऱ्यांचं मुत्र गोळा करून शेताला द्यायची सोय केली होती. त्यांनी एक फलकच लिहून ठेवला होता,’  जाण्यापूर्वी तुमचं मुत्र अवश्य इथे ठेवून जा. आमच्याकडं प्यालेलं पाणी आमच्याकडंच  अर्पण करून जा ‘. कुंडीतल्या किंवा शेतातल्या वनस्पतींना त्यातून पुरेसं अन्न मिळतं की नाही याची चौकशी केली की झालं.
शेतीचं एक अर्थशास्त्र आहे. मूत्र फुकट मिळतं पण ते गोळा करणं, वाहून नेणं, योग्य प्रमाणात पातळ करून झाडांना घालणं याला एक व्यवस्था लागते, श्रम लागतात, पैसे लागतात. एक चिमूट रासायनिक खत घालण्याला येणारा खर्च आणि शंभर लीटर मूत्र गोळा करून शेतात पसरायला येणारा खर्च याचा हिशोब शेतकऱ्याला मांडावा लागतो. एकनाथ खडसे काय किंवा नितीन गडकरी काय. ते शेतीवर जगत नाहीत. मुंबईतल्या बंगल्यावरचं मूत्र गोळा करून टँकरनं जळगावला नेऊन शेतात पसरणं हा त्यांच्या दृष्टीनं एक मौजेचा भाग आहे. जळगावच्या त्यांच्या शेताला लागून असलेल्या शेतकऱ्याला असं काही करणं आवडेल का, शक्य होईल का याची चौकशी त्यांनी करून पहावी.
खडसे आणि गडकरी हे दोन नागरीक आहे. त्यांनी नागरीक म्हणून मूत्रविचारांची  मौज मजा करायला हरकत नाही. मंत्री म्हणून ते देशाची शेती व्यवस्था उभारणार असतील तर मात्रं त्यांना अधिक विचार करावा लागेल.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *