कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराचीमधे बसमधून चाललेल्या इस्माइली पंथाच्या लोकांवर सहा जणांनी गोळीबार केला. त्यात ४९ व्यक्ती मारल्या गेल्या, वीसपेक्षा जास्त जखमी झाल्या. मृतांत स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं होती. हल्ला नियोजित होता. इस्माइली माणसं अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी बसमधून अमूक वेळी जाणार आहेत हे हल्लेखोरांना माहित होतं. हल्लेखोर तीन बाईक्सवरून आले आणि बसवर दोन बाजूंनी हल्ला केला. काही मिनिटं ही घटना घडली. हल्लेखोर पळून गेले. 
सुरवातीला जुंदाल्ला या संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्विकारली. जुंदाल्ला ही संघटना तहरिके तालिबान या पाकिस्तानी तालिबान या छत्री संघटनेचा एक घटक आहे. ही सुन्नी संघटना आहे. शियांचा नायनाट करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट. नंतर खुद्द तालिबाननंच जबाबदारी घेतली. त्यानंतर इस्लामिक स्टेट ( इस्टेट ) या संघटनेनं आपणच ही घटना घडवली असं जाहीर केलं. 
जुंदाल्ला आणि तालिबान या संघटनांच्या प्रतिनिधींची नावं पेपरात सतत प्रसिद्ध होत आली आहेत, मतलब ही माणसं माहित आहेत. या वर्षी असे किमान तीन हल्ले या लोकांनी केले. कराची आणि पेशावरमधे. तरीही ही माणसं पकडली जात नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही.
 कराची आणि पेशावरमधे या जिहादी संघटनांचं राज्य चालतं. या संघटनांचे अड्डे शहरभर पसरले आहेत. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अचानक बाईक किंवा जीपवर सवार झालेले जिहादी उगवतात. आधीच गजबजलेल्या  वस्तीत बाईक- जिपांचे आवाज, घोषणा. कोलाहल वाढतो. पळापळ होते. किंचाळ्या.   जिहादी एखाद्या  इमारतीत घुसतात, एकाद्या मशिदीत घुसतात, एकाद्या मॉलमधे घुसतात. गोळीबार. आधीच ठरवून ठेवलेली   माणसं मारतात. चार दोन जणांना अंगावर बुरखा टाकून  पळवून नेतात. प्रचंड गोंधळ माजतो. रक्त आणि आवाज. जिपा आणि बाईक्स. वाऱ्यासारखे येतात, निघून जातात. मग कधी तरी काही वेळानं पोलिस येतात. जागेची मापं घेतात, जबान्या घेतात. पुढं काही होत नाही.
।।।
गोळ्यांनी शरिराची चाळण झालेली माणसं इस्माइली पंथाची होती. मुस्लीम समाजात दोन प्रमुख पंथ, शिया आणि सुन्नी. शियांमधे अनेक उपपंथ. त्यापैकी इस्माइली हा एक. एकूण मुस्लिमांची संख्या १.५२ अब्ज. त्यात इस्माइली आहेत १.५ कोटी. त्यातले पाच लाख पाकिस्तानात रहातात. 
इस्माइल या इमामाच्या वंशज-वारसांपासून सुरु होतो तो इस्माइली पंथ. या पंथाचे आजचे प्रमुख आहेत आगा खान. ते स्वित्झर्लंडमधे रहातात. त्यांची पत्नी स्विस आहे. त्यांच्याकडं गडगंज संपत्ती आहेत. त्यांच्याकडं अनंत विमानं, याट, गढ्या, इमारती, जमीन जुमला, शेअर्स इत्यादी आहेत. ते घोड्यांची पैदास करतात. जातीवंत घोडे ही त्यांची एक मोठी संपत्ती आहे. युरोपातला कोणीही माणूस जगतो तसे ते जगतात. म्हणजे दारू, संपत्ती, आर्थिक व्यवहार वगैरे. या तीनही गोष्टी इस्लामला वर्ज्य आहे. गैरइस्लामी, ख्रिस्ती स्त्रीशी लग्न म्हणजे तर तोबा तोबा. आगाखान यांनी अनेक ट्रस्ट स्थापले आहेत. प्रामुख्यानं शिक्षण आणि आरोग्य संवर्धनासाठी. स्त्रियांच्या शिक्षणावर त्यांच्या ट्रस्टचा भर असतो. पाकिस्तानात त्यांनी अब्जावधी रुपये गुंतवून शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं उभारली आहेत. आगा खान यांचे ट्रस्ट जगभर काम करतात, त्यांच्या जमातीच्या लोकांना सर्व प्रकारची सढळ मदत ते ट्रस्ट करतात. विशेषतः इस्माइली लोकांना आर्थिक विकासाची सर्वतोपरी मदत ते करतात. १९७२ मधे इडी अमीननं लाखभर इस्माइलींना युगांडातून अंगावरच्या कपड्यांनिशी हाकलून लावलं. आगाखान ट्रस्टनं त्या सर्व माणसांची सोय कॅनडा या देशात केली. आज ती माणसं कॅनडात उत्तम रीत्या स्थायिक झाली आहेत, कॅनडासारखीच श्रीमंत झाली आहेत.
 तर अशा या इस्माइलीना खतम करणं हे सुन्नी मुस्लीम धर्मकर्तव्य मानतात. म्हणूनच जगभर जिथं जिथं ते आहेत तिथल्या तिथल्या सुन्नी राजवटी त्यांना या ना त्या मार्गानं संपवण्याच्या बेतात असतात. नोकऱ्या देत नाहीत, शिक्षणात स्थान देत नाहीत, रहायला जागा देत नाहीत इ. पाकिस्तानात तर वेळोवेळी त्यांच्यावर हल्ले करून त्यांना मारूनच टाकतात. याचं कारण त्यांच्या मते इस्माइली हे मुसलमानच नाहीत, ते काफिर आहेत, ते जगण्याच्या लायकीचे नाहीत.
अल्ला, महंमद, कुराण, जकात, उपास, हाज, नमाज या इस्लाममधल्या मुख्य गोष्टी इस्माइली समाज मानतोच. परंतू कुराणाचे अर्थ शब्दशः न लावता ते काळानुसार लावावेत असं या पंथाच्या लोकांना वाटतं. आता एकविसावं शतक आहे. जग कायच्या कायच बदललं आहे. तेव्हां कुराणाला, इस्लामला जे काही म्हणायचं आहे ते आजच्या काळाच्या संदर्भातच म्हटलं पाहिजे असं या पंथाचं मत आहे. 
उदा. उपास. रमझानला उपास करतात. अंतःकरण शुद्धीसाठी उपास सांगितलेला आहे. अन्न वर्ज्य करणं हा त्याचा तात्कालिक अर्थ झाला. अन्न खाऊनही विचारपूर्वक अंतःकरण शुद्ध ठेवता येतं. तेव्हां एकाद्यानं रमझानमधे उपास केला नाही पण तो सभ्यपणानं वागला, त्यानं देशाचे कायदे पाळले, तो मानवतेनं वागला की झालं. उपास करायला हरकत नाही पण न केला तरी तो माणूस काफिर झाला असा अर्थ होत नाही.
उदा. सेक्स. रमझानच्या काळात सेक्स नाही. या पंथाचं म्हणणं असं की सेक्स आणि अंतःकरण शुद्धी याचा संबंध नाही. रमझानच्या काळात सेक्स करायला हरकत नाही.
उदा. दारू. दारु प्याल्यामुळं माणसाचं अंतःकरण अशुद्ध होत नाही. दारु पिणाऱ्याचं अंतःकरण शुद्ध असू शकतं आणि दारू न पिणाऱ्याचं अंतःकरण अशुद्ध असू शकतं. 
तेव्हां दारू, व्यापार, तंत्रज्ञान, सेक्स, मार्केट इत्यादी गोष्टी आल्यानंतर त्यांच्याशी धर्माला जुळवून घेता आलं पाहिजे असं या पंथाचं मत. हे जुळवून घेणं नावाचं प्रकरण कोण हाताळणार?  तर त्याला एक नेता लागतो. तो नेता म्हणजे आगाखान. ते ठरवतील, ते सांगतील ते ऐकायचं.
सुन्नी किंवा एकूणच मुसलमानांची इथे गोची होते. एक तर कुराणात ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितलंय त्या गोष्टी हा पंथ धर्माच्या नावानं करा असं म्हणतो. म्हणजे इस्लामच धोक्यात. दुसरं म्हणजे इमाम, मुल्ला, मुफ्ती वगैरे लोक इस्लामचा अर्थ सांगतात आणि तो पाळणं इस्लामी माणसावर बंधनकारक असतं.  आजवर राजांनी तलवारीच्या धाकानं मुल्लांना फतवे काढायला लावलं. एकाद दोन शतकं सोडली तर धर्म आणि राज्यव्यवहार यातल्या संबंधांवर, ऐहिक आणि पारमार्थिक यातील संबंधांवर इस्लाममधे विचार झाला नाही. जग काबीज करणं, जगावर इस्लामचं राज्य वसवणं या एकाच गोष्टीवर इस्लामी राजवटींचा भर राहिला. मुल्ला मंडळीही राजाच्या तलवारीला घाबरून त्याच्या बाजून निर्णय देत. न दिल्यास त्याची मुंडी छाटली जाई. एखादा माणूस इस्लामी नाही असं कोणी तरी जाहीर करायचं की मामला संपला. इस्लामी नाही म्हणजे जगण्याचा अधिकार नाही किंवा त्यानं दुय्यम नागरिकाचं जीवन जगायचं येवढेच पर्याय इस्लामी परंपरेनं निर्माण केले. आजही इस्लामी जगात तीच परंपरा चालू आहे.
सातव्या शतकात जे काही सांगितलं त्याचे अर्थ तलवारीच्या जोरावर कोणी तरी ठरवायचे आणि ते इस्लामी जनतेवर लादायचे. सौदी अरेबिया तेच करतं. इराण तेच करतं. पाकिस्तान तेच करतं. ओसामा बिन लादेन तेच करत होता. आता इस्टेट, तालिबानही तेच करत आहे. इस्लामला काळाशी जोडायचं नाही, काळाबरोबर जाणाऱ्या इस्लामेतर समाजांशी फटकून वागायचं, त्यांना कमी प्रतीचं मानून त्यांना मारून तरी टाकायचं किवा त्याना इस्लामी करायचं. जगात इस्लामेतर धर्म, संस्कृती, विचार असतात  हेच इस्लामच्या डोक्यात अजून नीटसं बसलेलं नाही. आपल्यापेक्षा जे काही वेगळं आहे ते कमी प्रतीचंच आहे असं मानणारे प्रवाह इस्लामचे अधिकृत प्रवाह झाले आहेत.
इस्माइलींनी केलेली गोची तिथंच आहे. मशिदीतून किवा राजसिंहासनावरून दिले जाणारे आदेश न पाळता एक इस्लामी पंथ एका आधुनिक सूटबूट घालणाऱ्या, चैनीचं आयुष्य जगणाऱ्या माणसाचं ऐकतो ही मोठीच पंचाईत.  बरं या माणसाशी झगडायच तर आधुनिक लोकशाही, बाजार, तंत्रज्ञान, सहजीवन इत्यादी कसोट्यांवर झगडावं लागतं. तसं करायला गेलं की इस्लामचे वांधे होणार. तसलिमा नसरीन आणि अयान हिरसी अली तर तेच सांगत आहेत. कुराण, शरिया इत्यादी गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत, त्या बदला, काळाशी जुळवून घ्या असं त्या म्हणतात. पण ती पडली लेखक मंडळी. ती बोंबलण्याशिवाय काय करणार. आगाखान हा बाजारात यशस्वी झालेला माणूस. दीड कोटी लोकांचा संसार तो सुखानं चालवतो.
म्हणूनच पाकिस्तानातल्या स्त्रियांना शिक्षण देणारा आगाखान आणि त्याचा इस्माइली पंथ पाकिस्तानी सुन्नींना नको आहे. आम्ही बदलणार नाही, बदलू पहाणाऱ्यांना आम्ही मारून टाकणार असा हा हट्ट आहे. तालिबानकडं हत्यारं आहेत, इस्माइली लोकांकडं हत्यारं नाहीत. त्यामुळं त्यांना एक तरफी मार खावा लागत आहे.
म्हणूनच कराचीतल्या हत्याकांडानंतर आगाखान यांनी एक पत्रक काढून जगभरच्या लोकांना या प्रश्नी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी पश्चिमी देशांना साकडं घातलं आहे. 
इथंच अडचण आणि पंचाईत उभी रहाते. इस्लामी संघटना किंवा देश अमानवी रीतीनं वागणार असतील तर त्यांच्यावर कारवाई कशी करायची? पाकिस्तान किंवा सौदी अरेबिया इस्माइली लोकांना जगू देत नाहीत, त्रास देतात, मारून टाकतात. ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे. परंतू सौदी आणि पाकिस्तान ती मानवी हक्काची पायमल्ली मानत नाहीत. हा त्यांचा अंतर्गत धर्माचा प्रश्न आहे असं ते म्हणतात. परिणामी आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार इतर धर्मियांना नाही अशी त्यांची भूमिका असते. अशी भूमिका आली रे आली की उदारमतवादी आणि डाव्यांची पंचाईत होते. सर्वधर्म समभाव किंवा सेक्युलरिझमचा त्यांनी स्वीकारलेला सोयिस्कर अर्थ धर्माच्या अंतर्गत अमानवी वागणुकीकडं दुर्लक्ष करायला सांगतो. सौदी किंवा पाकिस्तानला शस्त्र पुरवतांना किंवा पैसे देताना अमेरिका आपला भौगोलिक-राजकीय स्वार्थ पहातं परंतू त्यामधे आपण अमानवी कारवायाना खतपाणी घालतोय हे मानायला तयार अमेरिका होत नाही. हिटलरनं ज्यूंना मारणं आणि सुन्नींनी इस्माइली-अहमदियांना मारणं यात काय फरक आहे? इस्टेटनं सीरियामधे शिया आणि झोरोस्ट्रियन धर्मियांना मारणं आणि हिटलरनं ज्यूंचं हत्याकांड करणं यात काय फरक आहे? 
इस्माइलींच्या हत्या ही सामान्य गोष्ट नव्हे. ती एका पंथाच्या माणसांना कोणी चक्रमांनी मारलं अशा स्वरूपाची घटना नाहिये. धर्माचे अर्थ फक्त आम्हीच लावणार असं म्हणत धर्माचे बुरखे घेऊन वावरणाऱ्यांचं वागणं, धर्म ही आमचीच एकतरफी देवदत्त मालमत्ता आहे असं मानणाऱ्यांचं वागणं यात गुंतलेलं आहे. कित्येक शतकांपासून ते चालत आलेलं आहे. लोकशाही आणि आधुनिकता या दोन घटकांनी जगात अनेक ठिकाणी धर्म या संस्थेला-विचाराला आवरलं, या संस्थेचं काही एक स्थान ठरवून तिथं ही संस्था खिळवून ठेवली. इस्लाम या धर्माला आवरणं मात्र आधुनिकतेला जमलेलं नाही. ते जमवण्याची वेळ आता आली आहे.
आगाखान यांनी जगाला इस्माइली हत्याकांडात लक्ष घालायला सांगितलं याचा अर्थ असा की आता पुन्हा एकदा कालबाह्य कल्पना, धर्म, इत्यादी गोष्टींचा पुनर्विचार करण्याची, इस्लामी विचार आणि आचाराला वळण लावण्याची वेळ आली आहे.

।।

One thought on “कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

  1. नवीन व अतिशय उपयुक्त माहीती. पाकीस्तानातील उलेमांनी याच प्रकारे अहमदिया पंथास देखील गैरमुस्लीम जाहीर केले आहे. त्याचे लोण भारतात देखील पसरत आहे. परवा एका पान स्टॉल मधे गेल्यावर एक स्टिकर पाहीले " कादीयानी अहमदिया मुसलमान नही है ". यावर विचारसे असता त्यांनी अहमदिया ही फिरका परस्त जमात असल्याचे सांगीतले. असा वेगऴा आणि आधुनिक विचार करणारावरचे हल्ले हे चिंताजनक आहेत. खरे जगातील सर्वच धर्मियांनी धर्मग्रंथाचा अर्थ नव्याने लावावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *