भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

कायदा या कल्पनेवर भारताचा विश्वास नाही. कायद्याला अनेक पर्याय भारतीय जनतेनं शोधले आहेत. कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.
सलमान खान खटल्याची सुरवात अशी झाली.
२८ सप्टेंबर २००२ च्या  मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फूटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमधे ही घटना लोकांना पहायला मिळाली. ३० तारखेच्या पेपरात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं. 
त्या वेळी निखील वागळे महानगरचे संपादक होते आणि मी महानगरमधे स्तंभ, संपादकीय लिहित असे.  त्यामुळं दररोज आमच्या चर्चा होत असत, विषय निवडण्यासाठी. सलमान प्रकरणावर आम्ही विचार करत होतो. त्याच वेळी ऐश्वर्या राय यांच्या  वडिलांचा फोन आला. सलमान ऐश्वर्याच्या घरासमोर दारू पिऊन शिमगा करत असे. एकदा त्यानं ऐश्वर्याच्या थोबाडीत मारली होती. आम्हाला त्रास होतोय काही तरी करा असं ऐश्वर्याचे वडील म्हणत होते. 
सलमानचं हे वागणं माजाचं आहे, पैसा आणि सिनेमामुळं मिळालेली प्रतिमा या गोष्टींचा माज त्याला आला आहे, त्याच्यासमोर सरकारही वाकतंय, त्याला अटक करत नाहीये असं आमच्या चर्चेत निघालं. आपण काही तरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आमचे वकील मित्र नितीन प्रधान यांना आम्ही फोन केला. लगोलग त्यांच्या घरी पोचलो. आमचा निर्णय झाला की आपण एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करावं. सलमानला पकडावं, त्याच्यावर सदोष मनुष्यखुनाचा खटला भरावा, या घटनेचा त्रास झालेल्याना भरघोस भरपाई मिळावी अशा मागण्या आम्ही तयार केल्या. 
ऐश्वर्या राय यांना होणारा त्रास हाही एक मोठ्ठा भाग होता.  नट मंडळी स्त्रियांच्या बाबतीत अतीच अरेरावी करत असतात असं आम्ही ऐकून होतो. म्हणून स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून सुधा कुलकर्णी यांना खटल्यात सोबत घेतलं.  
 कोर्टात गर्दी होती. गलेलठ्ठ खिशांचे वकीलांच्या घामाघूम गराड्यात मी अंग चोरून उभा होतो. यथावकाश आमची प्रार्थना न्यायाधिशांसमोर आली. न्यायाधिशांनी पहिली ओळ वाचली, ते दाणकन सरकारवर कोसळले. सरकार काही करत नाही, पोलिस काही करत नाहीत यावर त्यांनी कडक ताशेरे मारले. कोर्टात सरकारचा माणूस कां हजर नाही असं विचारलं. ताबडतोब कारवाई केली नाहीत तर  मला मंत्री, सरकारी वकील यांच्यावर समन्स काढावं लागेल असं काहीतरी ते  म्हणाले. कायद्यात नुकसान भरपाईच्या तरतुदी काय आहेत याचा विचार न करता त्यांनी सतरा अठरा लाखाची रक्कम ताबडतोब सलमानकडून घ्यावी असा निकालही देऊन टाकला. 
सरकार कामाला लागलं. 
।।।।।
सलमानच्या खटल्याचा निकाल कसा लागेल याची चर्चा आम्ही तीन मे रोजी  शिवाजी पार्कात करत होतो त्या वेळची घटना.  
संध्याकाळची  ऐन गर्दीची वेळ. रस्त्यावर गाड्यांची गर्दी. उजव्या बाजूनं येणाऱ्या गाड्यांकडं लक्ष ठेवून एक म्हातारे गृहस्थ जीव मुठीत धरून रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत होते.   डाव्या बाजूनं म्हणजे उलट्याच बाजूनं एक मोटार सायकल वेगात या गृहस्थांना चाटून गेली. पलिकडून जाणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीनं त्या बाईकवाल्याला हटकलं. पलिकडं पैसे वसूल करण्यासाठी उभ्या असलेल्या पोलिस कॉन्सटेबलनं त्याला अडवलं. तो थांबला. त्यानं पोलिसाला सुनावलं. ‘ मी कोण आहे माहित नाही काय? तुम्ही माझं xx वाकडं करू शकत नाही. मी असाच पुढं जाणार. काय करायचं ते करून घ्या’  असं म्हणून तो निघूनही गेला. पांढरे शुभ्र कांजीचे कपडे. पांढऱ्या चपला. हँडलवरच्या हाताच्या चारही बोटात चार एक्सेल साईझच्या अंगठ्या. अष्टभुजा देव असता तर आठ गुणिले चार येवढ्या बोटात ३२ अंगठ्या असत्या.
रस्त्यातली माणसं चकित झाली. काय घडतंय ते कळेपर्यंत तो माणूस पसार. नाक्यावरचा दुकानदार म्हणाला ‘ साहेब, हा नेहमीचा उच्छाद आहे. आम्ही तक्रार केली, साक्ष दिली तर आमचं दुकान फोडतील, आम्हाला कशा ना कशात तरी गुंतवतील, आमच्यावर खटले भरतील. त्यांच्या नादी लागणं म्हणजे …. ‘
।।।
१९९८ साली सलमान खाननं राजस्थानात काळवीट मारले. काळविटांचं रक्षण व्हावं यासाठी काळवीट शिकारीवर सरकारनं कायदा करून बंदी घातली होती. सलमानजवळ बंदुकीचा परवानाही नव्हता. सलमानवर खटला भरण्यात आला. खटला अजूनही चालला आहे. सलमानचे गलेलठ्ठ खिशांचे वकील ( एकदा कोर्टासमोर उभं रहाण्यासाठी पाच ते पंधरा लाख रुपये घेणारे ) सतत काही ना काही तरी खुसपटं काढत असतात. नवनवे साक्षीदार आणतात.   सरकारी माणसंही त्याच्याच दिमतीला असल्यासारखी वागत असतात. त्यांच्या बाजूनंही नवनवे साक्षीदार आणले जातात. सलमानचे वकील आक्षेप घेतात. मग सलमानचे नवे साक्षीदार. त्याला सरकारी वकील आक्षेप घेतात. सतरा वर्षं झाली, खटला चाललाच आहे.
२००२ साली वांद्र्यातली घटना. 
सलमान हा शिकला सवरलेला माणूस. त्यातून मानवी सेवा वगैरे करणारा. त्यामुळं दारू प्याल्यानंतर माणसाची विचार शक्ती नीट काम करत नाही हे त्याला कळतं. मेंदूमधे बोध घडवून आणणारी एक फॅकल्टी असते.  ती अल्कोहोलमुळं  नीट काम करत नाही हे त्याला कळतं. स्पीडोमीटर नव्वदच्या पलीकडं गेलाय हे डोळ्यांना कळतं, पण मेंदूत ते नीट घुसत नाही. रस्ता संपलाय आता गाडी पुढं गेली तर दुकानावर आदळेल हे डोळ्यांना कळतं पण त्याचं बोधन होत नाही. अर्धवट अवस्थेतलं बोधन सांगतं की ब्रेकवर पाय दाब, स्टियरिंगवर जोर देवून गाडी उजवीकडं वळव. पण हात ते काम पार पाडू शकत नाहीत. परिणामी गाडी आदळते, माणसं जखमी होतात, मरतात. सातव्या शतकात किंवा तेराव्या शतकात हे सारं माहित नव्हतं. एकविसाव्या शतकात हे सारं सलमानला माहित असतं.
तरीही जाम दारु प्यायलेला सलमान गाडी चालवतो याचा अर्थ काय घ्यायचा? यालाच ( ठरवून, प्लानिंग करून केलेला नसला तरी ) खून मानायचं की नाही?
या मुद्द्यानं सुरवात झाली. सलमानचे वकील ही बेदरकार ड्रायविंगची, अपघाताची केस ठरवून कमी गंभीर गुन्हा आहे असं म्हणत होते. माध्यमाच्या दबावामुळं, न्यायाधिशांनी दिलेल्या दणक्यामुळं सरकार हा सदोष मनुष्य खून  आहे असं म्हणत होतं. बेदरकार ड्रायविंगमधे चार सहा महिने शिक्षा आणि पाच पन्नास हजार रुपयांच्या दंडावर माणूस सुटतो. सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा होते.
घोळ सुरू झाला. खालचं कोर्ट, त्या वरचं कोर्ट, त्यावरचं कोर्ट त्यावरचं कोर्ट असा कायद्याचा खेळ सुरु झाला. हा खेळ फार महाग असतो.  कोर्टही मजेशीर असतं. समोरचा वकील कोण आहे याचाही विचार कोर्ट अनेक वेळा करतं.  कोर्टात उभं रहायला काही लाख ते कोटी रुपये घेणारे वकील समोर आलं की नाही म्हटलं  हादरतंच. याला कोर्ट क्राफ्ट असं नाव आहे. कोणा जजसमोर कोणा वकिलाचा दबदबा आहे याचा विचार करून त्या त्या वकिलांकडं माणसं जातात. तर असं हे कायच्या कायच महागडं प्रकरण. वर्षाला शेदोनशे कोटींची उलाढाल करणाऱ्या सलमानला कोर्ट क्राफ्टची काहीच अडचण नसते.
२००२ साली घटना घडली आणि २०१५ साली एक अशोक सिंग अचानक उपटतो आणि म्हणतो की सलमान नव्हे तर तोच गाडी चालवत होता. तेरा वर्षं तो कोर्टासमोर येत नाही. कोर्टानं त्याची दखल घेतली नाही हे नशीब. नाही तर खटला आणखी लांबला असता आणि सलमान चक्क निर्दोष सुटला असता. 
खटला उभा राहण्यात दिरंगाई.  पुराव्यातली भोकं शोधून काढून पुराव्याचं वस्त्रं फाडण्याच्या वकिलांच्या खटाटोपानं दिरंगाई. सलमानच्या रक्तात अल्कोहोल सापडला होता. तरीही त्याला दारू देणारा बार टेंडर सांगतो की त्याच्या ग्लासात पाण्यासारखा द्रव दिसला, तो द्रव बकार्डी नावाची व्होडका होती की नाही ते बार टेडर सांगू शकत नाही. काय मजा आहे. तो पांढरा द्रव न्यायाधिश आणि बचाव पक्षाचे वकील यांना कोर्टात प्यायला द्यायला हवा होता आणि त्याचे परिणाम स्वतःच अनुभवायला सांगायला हवं होतं. 
सलमानच्या रक्तातलं दारूचं प्रमाण घातक होतं. सलमानचा पोलिस कॉन्स्टेबल अंगरक्षक रविंद्र पाटील यानं  मॅजिस्ट्रेटसमोर साक्ष दिली की ‘ सलमानला मी सांगितलं होतं की तू दारू प्याला आहेस, गाडी चालवू नकोस. तरीही त्यानं गाडी चालवली. ‘ या दोन पुराव्यामुळं सलमान खरं म्हणजे संपला होता. पण सलमानकडं पैसे होते.   गलेलठ्ठ वकील त्याच्याकडं पोचले. काही मिनिटांत निर्णय करून एक वकील विमानाचं तिकीट मिळवून दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. 
मेलेला माणूस गाडीखाली मेला नसून त्या ठिकाणी आणलेल्या क्रेनखाली मेला असं कोर्टाला सांगण्यात आलं. अपघात झाला तो टायर फुटल्या मुळं असं सांगण्यात आलं. ( टायरनं दारू प्याली असावी ). इतके वर्षं कुठंच पत्ता नसलेल्या ड्रायव्हरनं गाडी चालवली होती. काफ्काच्या कथेत घडतात तशा  चमत्कारीक गोष्टी कोर्टात येत होत्या. आपल्या पक्षकाराला वाचवणं हे वकिलांचं कर्तव्यच असतं. ते खरं आहे आणि कायद्यात बसणारंही आहे. पण बचाव करणं म्हणजे काफ्कासारख्या गोष्टी लिहिणं हे नव्यानं समजलं. 
अशा नाना गोष्टी घडवून आणल्या की खटला लांबत जातो. अजूनही तो लांबणारच आहे. कारण अजून ऊच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे आणि पंधरा ते पन्नास लाख रुपयेवाले वकीलही ढीगभरानं मुंबई दिल्लीत पडले आहेत. त्यामुळं पाच दहा वर्षं तर कुठंच गेली नाहीत. 
माणूस मेला तर खरा. दारू पिऊन गाडी चालवण्यामुळं मेला हेही खरं. पण न्यायालयातली कबड्डी तर खेळायलाच हवी. २०३० साल उजाडेल. सलमानचे वकील सांगतील की २००२ ते २०३० येवढा २८ वर्षाचा काळ अशिलानं खूप मानसिक त्रास सोसलाच आहे, करोडो रुपयांचा दानधर्म केला आहे, तेव्हां झालं येवढं खूप झालं, कोटीभर रुपये दंड घेऊन सलमानला सोडा. काय माहित. सुटेलही.
।।।
देशात कायदा आहे की नाही? 
मिहीर शर्मा नावाच्या लेखकाचं एक नवं पुस्तक प्रसिद्ध झालंय. भारतीय अर्थव्यवस्था हा पुस्तकाचा विषय आहे. त्यात लेखक म्हणतो की भारतीय माणसाला कायदा मोडण्यासाठी हवा असतो.
१९९८ पासून २०१५ पर्यंत सलमानन त्याच्याकडं असलेल्या पैशाच्या जोरावर कायदा झुलवत ठेवला. 
 पैसा हा कायद्याला पर्याय, सबस्टिट्टयूट. पैसा खर्च करा, कायदा त्रास देत नाही.
सलमाननं कॅन्सर रोग्यांना मदत केली. गरीबांना मदत केली. सिने सृष्टीतल्या लोकांना मदत केली. सलमान हा संत आहे, थोर माणूस आहे. तेव्हां त्याला शिक्षा न झालेली बरी.
सदाचार हा कायद्याला पर्याय. सदाचार करणाऱ्याला कायद्याचं बंधन नाही.
मुंबई, वाराणसी, लखनऊ इत्यादी ठिकाणी मुसलमानांनी कटोरा टोप्या घालून मशिदीत प्रार्थना केल्या. सलमान सुटावा यासाठी देवाला मधे घातलं.
धर्म-देव हा कायद्याला पर्याय. देवाशी संधान ठेवा, कायद्याची चिंता करू नका.
सलमान खाननं काँग्रेसच्या पुढाऱ्यांसाठी प्रचार केला. सलमान श्रीलंकेतही प्रचाराला गेला होता. मोदींच्या शपथ ग्रहणाला सलमान हजर होता. मोदींसाठी त्यानं गुजरातेत पतंगही उडवले. तमाम राजकीय लोकांना सलमानला शिक्षा झाल्याचं वाईट वाटलं. सलमानचं राजकारणातलं वजन कळत असल्यानंच पोलिसही दमानं घेत असतात. सलमान पोलिस स्टेशनात पोचला तेव्हां त्याची सही घ्यायला पोलिस सरसावले.
राजकारण हा कायद्याला पर्याय आहे.   सत्तेचा नीट वापर करा, कायदा पाळण्याची आवश्यकता नाही.
आमची प्रार्थना ऐकून ऊच्च न्यायालयानं सलमानवरच्या कारवाईला गती दिली. ते सारं पेपरात आलं. त्यानंतर एके दिवशी मी एका कॉलेजात व्याख्यान द्यायला गेलो होतो.  तरूण मुलींनी मला गराडा घातला. त्या माझ्यावर चिडल्या होत्या. सलमान हा त्यांच्या हृदयाचा तुकडा होता. त्याला  तुरुंगात पाठवल्याबद्दल त्यांचा माझ्यावर राग होता. सलमानचं नाव घेऊन त्या किंचाळत होत्या, संधी मिळती तर त्यांनी माझ्या झिंज्या (त्या वेळी माझ्या डोक्यावर केस होते ) उपटल्या असत्या.
लोकप्रियता हा कायद्याला पर्याय असतो. लोकप्रिय व्हा, कायदा पाळायची आवश्यकता नाही.
(दै.लोकमतसाठी लिहिलेला लेख)

००

3 thoughts on “भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

  1. व्हाईट कॉलर गुंडांशी चिकाटीनं लढत राहिल्याबद्दल अभिनंदन! (वकील न परवडणाऱ्या जेलमधे सडणाऱ्या इतर लाखो कच्च्या कैद्यांचा प्रश्न या केसमुळं समोर आला, हाही आणखी एक मोठा फायदा.

  2. खरच… भारतात कधी कधी अगदी अपरिहार्य असेल तरच कायदा पाळला जातो…
    आपल्या कार्यास सलाम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *