माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

नऊ  मे या दिवशी जगभर अनेक संघटना आणि माणसं  मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाच्या रोगाशी झुंज देण्याचा निर्धार करत असतात. 
मल्टिपल स्क्लेरॉसिस. माणसाच्या मज्जातंतूवरचं आवरण नष्ट होण्यानं निर्माण होणारी व्याधी.
माणसाच्या शरिरातील मज्जातंतू शरीरभर संदेश वहन करत असतात. मेंदूपासून विविध स्नायूंपर्यंत. स्नायूंपासून मेंदूपर्यंत. 
माणसाच्या डोळ्याला टेबलावरचा चहाचा कप दिसतो. त्याच्या नाकाला चहाचा वास येतो. नाक आणि डोळे त्यांची संवेदना मेंदूला कळवतात. माणसानं आधी कित्येक वेळा चहा प्यालेला असल्यानं चहाची चव आणि वास मेंदूनं साठवलेला असतो.  आवडीचा आणि परिचयाचा असल्यानं  हा चहा प्यायला हरकत नाही असा एक सावध संदेश मेंदू देतो किंवा दाणकन पुढं मागं पाहू नकोस पी  असा संदेश मेंदू हाताला देतो. हात पुढं सरकतो. कप उचलतो, कप ओठापर्यंत नेतो. हाताच्या स्नायूंना चहाचा कप उचलण्यासाठी किती शक्ती लावायची याची माहिती आणि सवय असते. त्यामुळं संदेश आला रे आला की माणसाचा हात चहाचा कप उचलतो. 
हाताचे स्नायू आणि मेंदूतली माहिती साठवणारी ठिकाणं यात संवाद झालेला असतो. चहाचा कप उचलायला किती ताकद लागते ते स्नायूंनी अनुभवलेलं असतं. कधी तरी कलिंगड उचलताना कप उचलायला लागते तेवढी ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न स्नायूनी केलेला असतो, त्याचा त्रास झालेला असतो. हे झालं ताकदीचं. वस्तू उचलण्यासाठी बोटांची जुळणी कशी करायची हेही मेंदूच्या साठवणीत नोंदवलेलं असतं. टाचणी उचलण्यासाठी, कपाचा कान धरण्यासाठी, कलिंगड उचलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे बोटांची जुळणी होते. ही माहिती मेंदूनं साचवलेली असते. या माहितीचं रूपांतर ज्ञानात आणि नंतर आज्ञेत केलं जातं, आज्ञा हाताच्या स्नायूंकडं पोचते. हात चहाचा कप उचलतात.
 संदेशांचं वहन वीज प्रवाहाच्या  रुपातल्या प्रेरणेतून होतं. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडं प्रेरणा वेगानं सरकतात. सेकंदाच्या शंभराव्या भागात. दोन पेशींना जोडणाऱ्या तंतूमधून प्रेरणांचं वहन होतं. विजेच्या रुपातल्या या प्रेरणांची तुलना आपल्या घरातल्या विजेच्या वायरींमधून होणाऱ्या विजेशी करता येते. घरातल्या विजेचा जेवढा दाब असतो त्याच्या किती तरी पटीनं कमी दाबानं शरिरातलं वीजप्रेरणा वहन होतं, त्यामुळं झटका वगैरे बसत नाही.  घरातल्या विजेच्या वायरीतली वीज अखंड वाहत रहावी यासाठी वायरीवर रबराचं आवरण असतं. त्यामुळं एकमेकाच्या शेजारी असणाऱ्या दोन वायरीमधील वीज प्रवाह एकमेकापासून दूर रहातात. वायरीवरचं रबरी आवरण नाहिसं होतं तेव्हां आतील धातूच्या तारा एकमेकाला भिडतात.  शॉर्ट सर्किट होतं. वीज खंडित होते. आगही लागते. मुख्य म्हणजे विजेचं वहन बंद होतं. 
मज्तातंतूवर मायलीन या पदार्थाचं आवरण असतं. मायलीन आवरण म्हणजे विजेच्या वायरीचं रबराचं आवरण.   माणूस जन्मल्यापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत मायलीनचं आवरण मज्जातंतूवर पसरत रहातं. निरोगी   माणसाच्या तंतूंवर हे आवरण कायम शिल्लक राहतं. काही कारणानं हे मायलीनचं आवरण काही ठिकाणी नष्ट होतं. मायलीन नष्ट झाल्यावर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं, संदेश वहन थांबतं. हाच मल्टिपल स्क्लेरॉसिस हा रोग. 
हा रोग वयाच्या आठव्या वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत केव्हाही होऊ शकतो. रोग केव्हां होतो ते कळत नाही. रोग होतो तेव्हां माणसाला अचानक दिसेनासं होतं. त्याच्या हातापायाची शक्ती नाहिशी होते. हालचाल बंद होते.  आवरण नष्ट झालेला स्नायू ज्या अवयवांना जोडत असतो ते अवयव काम करणं थांबतात.  रोगाचा अटॅक होतो तेव्हां अपार वेदना होतात, माणूस हतबल होतो. हतबल.  बळ नष्ट होतं. तो काहीही करू शकत नाही.
रोगाचं कारण अजून समजलेलं नाही. विषुववृत्तापासून समाज जितका दूर तितकं या रोगाचं प्रमाण जास्त. भारतात दर लाख लोकांमधे दोन अडीच माणसांना हा रोग होतो. उत्तर अमेरिकेत लाखात आठ माणसांना. कॅनडात आणखी जास्त.
हा रोग झालाय हे समजण्यात अडचणी येतात कारण या रोगाची लक्षणं इतर अनेक रोगांच्या लक्षणांसारखी असतात. मधुमेहामुळही दृष्टिदोष होऊ शकतो. विविध जंतुंमुळं ताप येतो, आकड्या येतात. ही लक्षण निर्माण झाल्यावर चिकित्सक डॉक्टर बुचकळ्यात पडतात. १८५४ मधे मायलीनचे गुणधर्म आणि अस्तित्व कळल्यानंतर या रोगाकडं चिकित्सकांचं लक्ष वळलं. भारतात तर असा काही रोग आहे हे १९६०-७० पर्यंत कोणाच्या ध्यानात आलं नव्हतं.
रोग कशामुळं होतो ते कळलेलं नसल्यानं अजून पर्यंत निश्चितपणे उपयोगी पडणारी औषधं तयार झालेली नाहीत. रोगाचा प्रभाव आणि त्रास कमी करणारी काही औषधं उपलब्ध आहेत. प्रभावी औषध आणि रोगाची पूर्वकल्पना देणारी चिकित्सा अजून हाताशी आलेली नाही. त्यावर संशोधन चाललेलं आहे. स्टेम सेल चिकित्सेचे प्रयोग चालू आहेत. रोगाला पूर्ण आटोक्यात आणणारी, रोग टाळणारी औषधं केव्हां तयार होतील ते सांगता येत नाही. तंत्रज्ञानातल्या प्रगतीकडं जग आशेनं पहात आहे. 
परंतू उपलब्ध औषधं आणि उपचार यामुळं तीव्रता कमी होऊ शकते.
निदान, उपचार, औषधं खूप महाग असतात.मुंबईत मल्टिपल स्क्लेरॉसिस सोसायटी ही संस्था या रोगानं ग्रस्त झालेल्या रोग्यांना मदत करत असते.  न परवडणाऱ्यांना या बाबतीत सोसायटी मदत करते. रोगाबद्दलची माहिती देऊन रोग्याचा आत्मविश्वास ही संस्था वाढवतो. हा रोग म्हणजे पूर्णविराम नसून स्वल्प विराम आहे, आयुष्य पुढे आनंदात जगायचं असतं हे ही संस्था रोग्यांना सांगते. रोग्यांच्या नातेवाईकांची मानसिक तयारी करणं हे महत्वाचं काम ही संस्था करते. व्यायाम,योगासनं या वाटांनी स्नायूंची शक्ती वाढते आणि त्याचं मनोधैर्यही वाढतं. संस्था या बद्दल माहिती देते, कार्यशाळा घेते, आवश्यक असल्यास या सेवा रोग्याच्या घरीही पोचवते.
शीला चिटणीस यांनी ही संघटना उभी केली, त्यांचे पती या रोगानं ग्रासले होते.
हा रोग झाल्यानंतर माणसाला कोणत्या त्रासाला तोंड द्यावं लागतं त्याचा अंदाज लक्ष्मी नावाच्या छोट्या मुलीला आलेल्या अनुभवांवरून येतो. तिची मुलाखत आणि या रोगांशी तिनं केलेला झगडा एका छोट्या क्लिपमधे यु ट्यूबवर ठेवला आहे.  चिटणीस यांच्या पतीना लग्नानंतर काही दिवसातच या रोगाची लागण झाली, तेव्हां  हा रोग भारतात परिचित नव्हता. काय घडतंय ते पती आणि शीला चिटणीस कोणालाही कळत नव्हतं. त्यांचं नव्यानं सुरु झालेलं आयुष्य उध्वस्थ होऊ पहात होतं. त्यांना कोणत्या त्रासातून जावं लागलं त्याची कहाणी शीला चिटणीस यांनी सांगितलीय. ती यू ट्यूबवर ठेवली आहे. 

https://youtu.be/UH9v256e_W0
https://youtu.be/hdi46ztxBR4
रोग आणि रोग्याचे हाल ही एक स्वतंत्र गोष्ट. समाजातलं अज्ञान आणि समाजाची व्याधीग्रस्त माणसाकडं पहायची दृष्टी ही एक वेगळीच समस्या. विकलांगांना मदत करायची, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना उभं करायचं  माणसाच्या डोक्यात येत नाही. उलट विकलांगांची चेष्टा केली जाते. विकलांगांना मानवी मदतही   माणसं आणि संस्था मोठ्या उत्साहानं नाकारतात. भारतात किती इमारतींत, घरांत, संस्थांमधे विकलागांना सुखकारक सोयी असतात? तपासून पहावं. लाज वाटावं अशी अवस्था आहे. कुष्टरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी दिलेला लढा एकीकडं आमटेंच्या कामाचं महत्व दाखवतो आणि दुसरीकडं भारतीय समाजाच्या असंवेदनशीलतेवरही बोट ठेवतो. लक्ष्मी या छोट्या मुलीला एका कारखान्यात अत्यंत वाईट वातावरणात तासनतास काम करावं लागतं, तिलाच नव्हे तर तिथं काम करणाऱ्या सगळ्याच मुलीना बाथरूमचीही सोय नसते. काय म्हणावं या कारखानादारांना. संबंधित खात्यांचे तपासनीस कारखान्यांना भेट देतात, पैशाचं पाकिट घेतात आणि सारं काही आलबेल असल्याचा शेरा बुकात मारून कलटी मारतात. सरकारी यंत्रणाही या कारखानदारांवर कारवाई करत नाही. लक्ष्मीची शाळा लक्ष्मीच्या गरजा पाहून सवलती द्यायला तयार होत नाही. शीलाताईंच्या पतीला प्रवास करणं जड जातंय हे कळल्यावर प्रवासाच्या सोयी, कामाचं ठिकाण बदलणं इत्यादी गोष्टी करायला त्यांची कंपनी नकार देतं. काय म्हणावं या उद्योगांना.
रोग परवडला, मानसिक रोग असणारी सभोवतालची माणसं नकोत असंच उद्वेगानं म्हणावं लागतं. मल्टिपल स्क्लेरॉसिस सोसायटी ही संस्था रोगी आणि समाज दोघांनाही मदत करण्याची खटपट करत असते. या संस्थेला मदत केली पाहिजे. या निमित्तानं विकलांगांकडं आपण कसं पहातो हे सर्व अंगं शाबूत असणाऱ्या लोकांनी पहायला हवं. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *