कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

 एका लोकशाहिराचा सरकारनं केलेला छळ ही कोर्ट सिनेमाची गोष्ट आहे.  आंबेडकरवादी कार्यकर्ता गरीब-कामगारांचं प्रबोधन करत असतो. शाहिरीतून. सरकार त्याच्यावर खटला भरतं. एक गटारात काम करणारा कामगार मरण पावलेला असतो. ते मरण नैसर्गिक नसून ती लोकशाहिराच्या चिथावणीमुळं केलेली आत्महत्या होती असं सरकार ठरवतं. लोकशाहिरावर खटला भरतं. खिशात पैसे नसलेल्या लोकशाहिराचे सरकार आणि न्यायव्यवस्था कसे हाल करते याचं कथन या सिनेमात आहे.
देशातली न्यायव्यवस्था आणि राज्यव्यवस्था येव्हांना समजलेली आहे. न्याय व्यवस्थेत न्याय मिळणं हा केवळ एक अपघात असतो, एक चान्स असतो हेही आता लोकांनाच नव्हे तर न्याय व्यवस्थेलाही माहित आहे. ज्याच्याकडं सत्ता आहे, ज्याच्याकडं दीर्घ काळ समोरच्या माणसाला झुंजत ठेवायचं आर्थिक सामर्थ्य आहे अशी माणसं जिंकतात, ज्यांच्याकडला पैसा अपुरा पडतो ती माणसं हरतात.  यात न्याय कुठंच उद्भवत नाही. हा चित्रपटाचा आशय आहे. 
हा आशय माणसं अनेक पद्धतीनं मांडतात. वर्तमानपत्रात एकाद्या घटनेची, त्या घटनेवरच्या न्यायालयीन घटनांची दखल घेऊन त्यावर लिहितात. यातल्या घटना कॅमेऱ्याचा वापर करून माहिती पटात मांडतात. वर्तमान पत्रं आणि माहितीपटात माहिती, तपशीलाला महत्व असतं. वाचक, प्रेक्षकांना एका पद्धतीनं त्या प्रांतात फिरवायचं आणि त्यानी नंतर त्यांच्या पद्दतीनं निर्णय घ्यायचा अशी ही रीत. कधी कधी वर्तमानपत्रं आणि माहितीपट माहितीची रचना एका विशिष्ट ध्येयासाठी करतात, काही निश्चित मत व्यक्त करतात.  त्यातही माहितीचा तपशील असतो, असायला हवा.
वरील आशय कधी कवितेच्या रुपात येतो, कधी कथेच्या रुपात. कधी चित्रपटाच्या रुपात. या रुपात तपशील महत्वाचे असले तरी त्यात वास्तवाचं कलाकाराला समजलेलं रुप समोर येतं. घटनेतली खरी पात्रं, घटना इत्यादी गोष्टीवर कलाकाराच्या कल्पना, त्याची प्रतिभा यांचा प्रभाव पडलेला असतो. कलाकार तटस्थ नसतो, तो त्याचं मत मांडत असतो. माहितीपटात मत येतं पण ते खूप सांभाळून, प्रेक्षकाच्या कलानं घेत घेत कलाकार माहितीची मांडणी करतो.
स्वतःचं मत अधिक गडद रुपात मांडलं जातं ते लेखात, एकाद्या तात्विक मांडणीमधे. तिथं  लेखक-कलाकार त्याची मतं, वास्तवाचं त्याचं आकलन इत्यादी गोष्टी ढळढळीतपणे, ठासून मांडतो. दोन किंवा इतर बाजू त्यात कधी कधी जरूर येतात पण त्याचं खंडनही त्या निर्मितीत ठासून केलेलं असतं.
कोर्ट या सिनेमातला विषय सामाजिक-राजकीय आहे. त्यात कामगारांना दिली जाणारी वागणूक, कामगार-गरीब-शोषित यांच्यासाठी दिला जाणारा लढा आहे. या लढ्यातली काही ठळक पात्रं ( गटारात मरण पावलेला कामगार, गरीबांची बाजू मांडणारा राजकीय लोकशाहीर, सरकार, न्यायाधीश, दोन्ही बाजूचे वकील ) आहेत. चित्रपट हे माध्यम कलाकारानं निवडलेलं आहे.
चित्रपट या माध्यमाबद्दल काही ठोकताळे आहेत. चित्रपट समजून घेण्यासाठी ते ठोकताळे उपयोगी पडतात.  ते ठोकताळे वगळून स्वतंत्रपणे स्वतःच्या कसोट्या निर्माण करण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला असतं. प्रस्थापित ठोकताळे दूर सारून नव्या कसोट्या अनेक कलाकारांनी वेळोवेळी सिद्द केल्या आहेत. प्रस्तुत चित्रपटाला काही स्वतंत्र, चाकोरीसोडून काही तरी करायचं आहे असं चित्रपट नव्हे तर चित्रपटाबद्दल बोलणारी माणसं म्हणत आहेत.
चित्रपटाचा रुपबंध माहिती पटासारखा आहे. पण त्यात माहिती नाही. तपशील नाहीत. माहितीपट दाखवत असताना तपशील उपयोगी पडतात आणि ते माहितीपटाला प्रभावी करतात. गटारात उतरणं, गटार साफ करणं ही प्रक्रिया दाखवली असती तर चित्रपट अंगावर आला असता. कामगार गटारात उतरतो त्या आधी पालिकेचे अधिकारी त्याला कसे वागवतात ते दाखवायला हवं होतं. तो पगार घ्यायला जातो तेव्हां अकाऊंटंट कसं वागवतात ते दाखवायला हवं होतं. गटारात काम करणाऱ्या माणसाच्या अंगाला वास येतो. कामगार स्वतः दारू पिऊन हा वास मारण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बायकोनं काय करायचं? गटारात उतरणाऱ्या कामगाराच्याच जातीत जन्मलेल्या मुलीला दुसरा नवरा मिळत नसल्यानं गटारात उतरणाऱ्याबरोबर लग्न करावं लागलेलं असतं. ती शिकलेली असते. एमए झालेली असते. स्वच्छ कपडे घालून शाळेत शिकवायला जाण्याचा प्रयत्न करत असते. घरी परतल्यावर तिला गटारात उतरणाऱ्या माणसाबरोबरच जगावं लागतं, वास येणारा सेक्स अनुभवावा लागतो. माहितीपटात असले तपशील यावे लागतात. किवा हेच तपशील पटकथेत बदलून एक उत्तम फीचर फिल्म तयार होते. गटारात उतरणारी माणसं, बैंगनवाडीत कचरा नेणारी पालिकेतली माणसं हे वास्तव झोप उडवणारं असतं. या वास्तवात जीव जात असतो म्हणून माणसं बंड करतात, आत्महत्याही करतात.
कोर्ट या निर्मितीत यातलं काहीही नाही. एका अत्यंत भरड पद्धतीनं, एकादा पत्रकारीही धड न समजेला पत्रकार जसा फीचर लिहितो तशी दृश्य या चित्रपटात आहेत. दुसऱ्या महायुद्धावर, अफगाणिस्तानवर, इराकवर, ज्यूंच्या हत्याकांडावर झालेले माहितीपट या दृष्टीनं पहावेत.  
तपशील कोणते आहेत? माहिती कोणती आहे? गटारात उतरणं वगैरेची नाही तर कोर्टात काम कसं चालतं, वकील कसे आरोपांची व कायद्यांची जंत्री वाचतात, वकीलिणबाई घरात स्वयंपाक करतात, वकील सलूनमधे जाऊन फेशियल करतो किंवा एकाद्या बारमधे जाऊन बियर घेतो. अगदीच भरड, निरर्थक.
चित्रपटाला माहितीपट म्हणणं कठीण आहे.
ही फिचर फिल्म आहे काय? मग तर अगदीच कठीण आहे. फिचर फिल्मला एक गोष्ट असते. त्यात पात्रं असतात, त्यांची गुंत्याची गुंफण असते. वेधक घटना असतात. चित्रांच्या मांडणीत मधे मधे खूप स्पेस ठेवलेली असते, प्रेक्षकाला सामावून घेणारी स्पेस. दोन दृश्यांना जोडणारी अदृश्य स्पेस असते. या चित्रपटात आगा पीछा नसणारी अनेक मिनिटांची निरर्थक दृश्यं आहेत. चित्रपटात  पात्रं विकसित होत नाहीत. पात्रांच्या जगण्यातले तपशील मिळत नाहीत.  काही सेकंदांच्या तुकड्यात नायक मुलांना शिकवताना दाखवलंय. एका ठिकाणी आपण फावल्या वेळात मुलांना शिकवतो असं शोकशाहीर म्हणतो.  बस.  चित्रपटात नायकाचे शिक्षणाबद्दलचे विचार, समजूत, चिंतन,  त्यानं केलेली खटपट, तो हे सारं कां करतो इत्यादी गोष्टी कळत नाहीत. निर्माता सांगतो, निर्माता नायकाबद्दल बोलतो म्हणून प्रेक्षकांनी नायक तसा आहे हे  मानायचं.
गटारात उतरणारा माणूस हे चित्रपटातलं कदाचित पहिलं मुख्य पात्र, कदाचित दुसरं मुख्य पात्र. त्याच्याबद्दल सिनेमा काहीच सांगत नाही.
चित्रपटाला पटकथा  दिसत नाही.
चित्रपट हे कॅमेऱ्याचं माध्यम आहे. ते नाटक नाही. नाटकात मंच असतो, मंचावरची जागा येवढीच  नटांची आणि कथानकाची जागा. मंचाबाहेर जाता येत नाही. मंचावरची पात्रंही दुरून दिसतात. काळ आणि स्पेस दोन्ही बाबतीत मंचाच्या मर्यादा असतात. कल्पनाशील नाटककार त्या मर्यादा ओलांडायचा प्रयत्न करतो. चित्रपटामधे स्पेस आणि वेळ दोन्ही ओलांडायची सोय असते, खरं म्हणजे तेच कॅमेऱ्याचं मर्म आहे. कॅमेरा हलतो, अवकाशात कुठंही जातो. तो स्पेसमधे जातो तसाच अणूच्या अंतरंगातही जातो. तो पाव इंच जवळ जातो तसंच हज्जारो मैल दूरही जातो. तो आहे ते दाखवतो आणि प्रत्यक्षात नसलेलं परंतू कलाकाराच्या डोक्यात असलेलंही दाखवतो. दहा वर्षापूर्वीचे कॅमेरे आणि आताचे नवे कॅमेरे यात कल्पनाही करणं कठीण इतका फरक आहे. गो प्रो हा छोटा कॅमेरा. मुठीत मावणारा. कुठंही चिकटवता येणारा. माशाचे डोळे या कॅमेऱ्याच्या भिंगात आहेत. अवकाशात, समुद्राच्या तळाशी असा कुठंही तो चालतो. टोपीवर बसवा, खिशात ठेवा, मनगटावर बांधा, बुटाला बांधा. ज्या अँगलची कल्पनाही कधी करता आली नव्हती असे अँगल हा कॅमेरा दाखवतो. 
सिनेमा म्हणजे कॅमेरा. समजा एकाद्यानं ठरवलं की आपण एक जुनाच कॅमेरा वापरणार, कमी स्पीडची फिल्म वापरणार, भरमसाठ लाईट्स वापरणार किंवा पुसट काळोखी चित्रण करणार, कॅमेरा एकाद्या स्टँडवर लावणार आणि अनंत सेकंदाचे स्थिर शॉटच दाखवणार. तर तो त्याचा प्रश्न आहे.  कोर्ट या सिनेमात असे कित्येक शॉट्स आहेत. कॅमेरा लावलेला असतो. कॅमेरामन चहा प्यायला गेला आहे की काय अशी शंका यावी असा  ध्रुवताऱ्यासारखा अढळ कॅमेरा. इकडं तिकडं बघायचं नाव नाही, मान वळवायची नाही, पुढं सरकायचं नाही, मागं सरकायचं नाही. आकाशात गेला तर तिथंही स्थिर. तिथून इकडं तिकडं हलायचं नाव नाही.  वकील दुकानात जाऊन काहीतरी खरेदी करतो. कॅमेरा तिथं निमूट उभा. वकील जिथं पोचले तो बार, वकीलाचं फेशियल करून घेणं. असे किती तरी शॉट्स.
बोरी बंदर स्टेशनच्या बाहेर कॅमेरा लावायचा. बस. मुंबईतलं सारं वास्तव तो चितारतो. त्यातले शॉट एकत्र करून चित्रपटात वापरायचे. कॅमेरा आणि चित्रपट याकडं पहायचा हा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन दिसतो. तो दिग्दर्शकाचा अधिकार, स्वातंत्र्य.  
माहितीपटात अभिनयाचा प्रश्न येत नाही. वास्तवातली माणसं समोर येतात. फार तर ती निवडतांना काळजी घ्यायची. फीचर फिल्ममधे पटकथा असते, अभिनेते निवडले जातात, ते विचार आणि मेहनत करून पात्रं वठवतात. कोर्टमधे अभिनयाची बोंबच आहे. फीचर फिल्ममधे एक वेगळा प्रांतही आहे. नट वगैरे वापरणं म्हणजे कृत्रीमपणा, खरा आशय दाखवायचा असेल तर खरी वास्तवातली माणसं वापरली पाहिजेत असं या प्रांताचं मत असतं. सामान्यतः फिल्म करणारा माणूस दोन गोष्टींचं मिश्रण करतो. चांगले अभिनेते घेतो आणि अभिनेते नसलेली माणसंही निवडतो. गोविंद निहलानीनी एका सिनेमात कोर्टातल्या एका दृश्यात काही सेकंदांसाठी अशोक शहाणे यांना  वकील केलंय. अगदी काही सेकंदांचं दृश्य कायम लक्षात रहावं इतकं ग्रेट आहे. अशोक शहाणे यांचं व्यक्तिमत्व दृश्य स्वरूपात समजल्यानं गोविंद निहलानीनी शहाणे निवडले.
कोर्टमधे भूमिका करणारी माणसं कोण आहेत? माझ्या माहितीप्रमाणं ही माणसं व्यावसायिक नट नाहीत. चित्रपट, नाटकं यात ती पूर्वी दिसलेली नाहीत.  हरकत नाही. अशोक शहाणेंसारखी ती लक्षात रहाण्यासारखी दिसली की झालं.  तसं घडत नाही. गटारात मरण पावलेल्या माणसाच्या पत्नी म्हणून काम केलेली स्त्रीची निवड अपवाद. ती स्त्री लक्षात रहाते.
एलिझाबेथ एकादशीतली मुलांची आई रंगमंचावर वावरलेली आहे, अभिनयाची माहिती असलेली कलाकार आहे. मुख्य सिनेमा-नाटक व्यवहारातली व्यावसायिक अभिनेत्री नाही. तिच्या आईची भूमिका केलेल्या बाईही व्यावसायिक नाहीत. पोरं तर नवी आहेत.  रंगमंच किंवा चित्रपटाला न सरावलेली, व्यावसायिक नसलेली माणसं एकादशीत वापरलीत. ती उत्तम कामगिरी बजावतात.
मुद्दा असा की अभिनेते व्यावसायिक आहेत की व्यावसायिक नाहीत हा प्रश्न नाही.  भूमिका करणारी माणसं अगदी थेट वास्तवातली आहेत की चित्रपटात दाखवलेल्या वास्तवात न जगणारी व्यावसायिक नटमंडळी आहेत हा प्रश्न नाही. ती कशी दिसतात, कशी काम करतात, ती किती प्रभावी आहेत हा प्रश्न आहे. मग ती शंभर टक्के व्यावयासिक असोत वा शंभर टक्के अव्यावसायिक असोत.   माणसं ठीक अभिनय साधत नसतील तर वास्तवतावाद वगैरे तत्व वगैरे सांगू नये.
 निर्माता दिद्गर्शकाला न्यायव्यवस्थेबद्दल, देशातल्या राजकीय सामाजिक वास्तवाबद्दल काही तरी सांगायचं होतं. त्याच्या परीनं त्यानं एक सिनेमा तयार केला. त्याच म्हणणं असं की त्यानं सिनेमा केलाय. तसं त्याला वाटतंय. त्याला निर्मीती करण्याचा आणि आपल्या निर्मितीबद्दल समजुती करून घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. पण त्याच्याशी सहमत होणं कठीण आहे.

 ।।

6 thoughts on “कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

  1. तू जे बघायला गेलास ते तुला मिळालं नाही याचा राग दिग्दर्शकावर काढतो आहेस. त्यापेक्षा जे समोर येतं आहे ते आत घेत त्याचा impact काय कसा होतो, हे तपासणं अधिक न्याय्य नाही का?

  2. आपण सर्वच विषयांवर लिहायलाच पाहिजे, असा अट्टाहास दामल्यांच्या लेखनात पूर्वीही अस्फुट स्वरूपात दिसलेला होता. हा लेख वाचून त्यावर शिक्कामोर्तब झालं. चित्रपट माध्यमांची अतिशय तोकडी समज दामल्यांना आहे, हेही यातून कळलं. कॅमेरा स्थिर का आहे, याचा शोध घ्यावासा त्यांना वाटत नाही, हे त्यांच्या अस्थिर आकलनाचं द्योतक आहे. अखेरीस गोविंद निहलानी आणि एलिझाबेथ एकादशी या संदर्भात पात्रनिवडीपासून अभिनयापर्यंत केलेली टिप्पणी म्हणजे तर अडाणीपणाचा कळस आहे. एकीकडे अव्यावसायिक लोक निवडण्याचे तथाकथित महत्त्व अधोरेखित करायचा बाळबोध प्रयत्न दामल्यांनी केला आहे. परंतु नंतर लगेच व्यावसायिक-अव्यावसायिक यानं काही फरक पडत नाही, असलीही मखलाशी केली आहे. कोर्ट या चित्रपटामधील पात्रं रंगवणाऱ्या माणसांविषयी त्यांना काडीचीही कल्पना नाही, एवढंच यातून कळतं. हे दामले मराठीतले ज्येष्ठ पत्रकार! असो.

  3. कोर्ट या फिल्मबद्दल मी लिहिलं.
    मी अनेक विषयांवर लिहितो. जगामधे अनेक गोष्टी घडतात, त्या मी पहातो, त्याबद्दल वाचतो, त्या बद्दल लोकांशी बोलतो, त्यावर काही एक विचार करतो आणि लिहितो. मी आयुष्याचा बहुतांश काळ यावरच खर्च करत असतो. लेखक, पत्रकार सामान्यपणे असं जगणं व्यतीत करत असतात. भारतातल्या, जगातल्या लेखनाकडं दृष्टीक्षेप टाकला तर ते सहज लक्षात येतं.
    ज्येष्ठ हे विशेषण फसवं आहे, ते कां वापरलं जातं ते कळत नाही. फार काळ त्या कामी खर्च झालाय येवढाच ज्येष्ठचा अर्थ असतो. माणसाचं वय वाढत गेलं की तो आपोआप ज्येष्ठ होत जातो.
    चित्रपटाकडं नाना कोनांतून पहाता येतं. चित्रपटाची फोटोग्राफी, संकलन, गोष्ट, संवाद, अभिनय, पात्रं निवड, लोकेशन्स, तंत्रज्ञान, संगित, सामाजिक, राजकीय, साहित्यीक इत्यादी नाना अंगांनी पहाता येतं. कोणी यातल्या कुठल्या तरी अंगावर भर देतो. काही लोकं या सर्वच अंगांनी चित्रपटाचा अभ्यास करून व्यक्त होतात. वरील अंगांची माहिती, अनुभव, सराव, प्रशिक्षण, व्यावसायिक असणं अशा शिदोरीनुसार लेखकाचं लेखन सिद्ध होतं.
    शामला वनारसे, जी के ऐनापुरे, अरूण खोपकर, अमोल पालेकर इत्यादी मंडळी कसं लिहितात पहा. तसं मी लिहू शकणार नाही, लिहूही नये, कारण माझा दृष्टिकोन आणि शिदोरी वेगळी आहे.
    एकाद्या अंगाच्या विशेष जाणकाराची समज आणि एकाद्या अंगाचा विशेष अभ्यास नसलेल्या माणसाची समज यात अर्थातच फरक असतो. शाम बेनेगेल, गोविंद निहलानी, इंगमार बर्गमन, सत्यजीत रे, येरी मेंजिल, स्पीलबर्ग, माजिद मजिदी इत्यादी लोकांच्या तुलनेत माझी त्या माध्यमाची समज अत्यंत म्हणजे अत्यंत तोकडी आहे. इतर अनेकांच्या तुलनेतही ती तोकडीच आहे. मला त्याची जाणीव आहे, मला वाटतं की कोणाही गंभीरपणे निर्मिती करणाऱ्या माणसाला तशी जाणीव असते.
    मी व्यावसायिक चित्रपट निर्माता, समीक्षक नाही. मी सिनेमे पहातो. मी स्थिर चित्रण माझ्या परीनं हौसेनं करत असतो. मी चित्रपटांबद्दल जाणकार माणसं काय लिहितात, बोलतात ते ऐकत वाचत असतो. चित्रपट, कला आणि संबंधित गोष्टींबद्दल कुतुहूल म्हणून मी ते करतो. एकूण जगाबद्दल असलेल्या कुतुहुलाचाच तो एक भाग आहे.
    सुझन सोंटॅग ही सक्रीय कार्यकर्ती, विचार करणारी महिला होती. तिनं फोटोही काढले आणि त्यावर लिहिलंही. तिचा फोटोग्राफीवर लिहीण्याचा अधिकार आणि कुवत यावर लोकांनी लिहिलं. जॉन बर्जर लेखक होते. त्यानी कविता लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, चित्रं काढली, फोटो काढले, निबंध लिहिले, प्रखर राजकीय भूमिका घेतल्या. त्यांचं फोटो व इतर विषयांवर लिहिणं यावर टीका झाली. विजय तेंडुलकर नाटककार होते, पत्रकार होते. त्यांनी दोन चार पटकथा लिहिल्या. स्थिर चित्रणही थोडं फार केलं. त्यांनी चित्रपटाची परीक्षण लिहीली होती. त्यांनाही लोकांनी विचारलं की त्यांना सिनेमातलं काय समजतं.
    राजकारण, अर्थकारण याहीबाबतीत असंच असतं. या विषयातले अकॅडमिक, व्यावसायिक असलेले लोक इतरांनी या विषयावर लिहिण्याबद्दल तक्रारी करत असतात.
    समीक्षण असो, लेख असो, कादंबरी असो, चित्रपट असो की नाटक. निर्मिती झाल्यावर त्या निर्मितीबद्दल अनेक मतं असतात, अनेक मतभेद असतात. ते असणारच. निर्माता त्याच्या पद्दतीनं निर्मिती करतो, आस्वाद घेणारा त्याच्या पद्धतीनं आस्वाद घेत असतो. आस्वाद व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्वतंत्र शैली असते.
    तुम्ही आस्वाद घेतलात, तुमच्या शैलीत तुमचं मत व्यक्त केलंत.
    तुम्ही व्यक्त झालात, माझ्या पद्धतीनं मी तो आस्वाद समजून घेतोय.
    कळावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *