विन्सटन चर्चिल यांच्या जीवनावरचे तीन चित्रपट

विन्सटन चर्चिल यांच्या जीवनावरचे तीन चित्रपट

२०१७ सालात विन्स्टन चर्चिल यांच्यावर तीन चित्रपट झाले.      ‘ डंकर्क ‘, ‘ चर्चिल ‘, ‘ डार्केस्ट आवर ‘. पैकी ‘ डार्केस्ट अवर ‘ला ऑस्करची सहा नामांकनं आहेत. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा इत्यादी.

Image result for darkest hour

विन्स्टन चर्चिल. यूकेचे पंतप्रधान. नोबेल पारितोषिक विजेते. चित्रकार. लेखक. नौदल अधिकारी. पत्रकार. भाषाजाणकार. इंग्रजीचा अर्धा शब्दकोष त्यांना पाठ होता असं म्हणत. डार्केस्ट आवरमधेच एक राजकारणी म्हणतो ”  “He mobilized the English language and sent it into battle.”   बीबीसीनं केलेल्या एका पहाणीत लोकांनी त्यांना ब्रीटनमधला सर्वात ग्रेट ब्रिटीश नागरीक ठरवलं.

चर्चिल  हे सरळ गृहस्थ नव्हते. त्यांनी स्वतःच्या वर्तनानं अनंत वादांना जन्म दिले. फटकळ होते, केव्हां काय बोलतील ते सांगता येत नसे. टीका आणि प्रशंसा दोन्ही बाबतीत त्यांची जीभ सैल असे. राजकारणी माणूस. सत्ता हाती रहावी, पंतप्रधानपद हाती रहावं यासाठी नाना तडजोडी, भानगडी. इंग्रजी साम्राज्याचे घट्ट पुरस्कर्ते. भारत स्वातंत्र्य मिळायच्या लायकीचा नाही असं म्हणत. गांधीजीना नंगा फकीर म्हणत.नव्वद वर्षं जगले. दोनदा पंतप्रधान झाले. दोन महायुद्ध पाहिली, अनुभवली, नेतृत्व केलं.

‘ डार्केस्ट आवर ‘ मधे डंकर्क मोहिम दाखवलीय. फ्रान्सच्या किनाऱ्यावर डंकर्कमधे साडेतीन लाख ब्रिटीश सैनिक अडकले होते. पंतप्रधान झाल्या झाल्या डंकर्क प्रकरण चर्चिलना हाताळावं लागलं. कॅले या जागी असलेल्या दीड दोन हजार ब्रिटीश सैनिकांना बळी देऊन जर्मन फौजांचं लक्ष डंकर्कपासून विचलीत करून डंकर्कमधले सैनिक वाचवायची मोहिम चर्चिलनी सेनाधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पार पाडली. तीन लाख चाळीस हजार सैनिक वाचले.

दहा दिवसांचा काळ. तीन हजारांच्या बदल्यात साडेतीन लाख वाचवायचे असा जुगार होता.प्रचंड ताण. संसद, सहकारी, राजा यांचा अविश्वास. माणसं बोलत होती की सकाळपासून दारू पिणारा हा जुगारी माणूस देशाची वाट लावणार. चर्चिल दारु तर पीतच. नशेत किंवा नशा नसतांनाही सहकारी, सेनाधिकारी यांच्यावर उद्धट तोंडपट्टा सोडत. घरात गोंधळ घालत, आदळापट करत. हे सारं चित्रपटात दाखवलंय. लोखंडाचे चणे खाणं म्हणजे काय याचा प्रत्यय चित्रपट पहाताना येतो. माणसाच्या ग्रेटपणाला अनेक काळ्या बाजूही असतात, सारं मिळून माणूस ग्रेट होत असतो. जवळचे सहकारी आणि पत्नीला फार सहन करावं लागतं. क्लेम ही त्यांची पत्नी चर्चिलना सहन करत, त्यांना सांभाळत कशी जगते याचाही प्रत्यय सिनेमात येतो.

अंधुक प्रकाशात सारा चित्रपट सरकतो, त्याला सेपिया रंगाची छटा आहे. हा इतिहास आहे, त्यात बऱ्याच अंधुक जागा आहेत, ब्रिटीश वातावरणच मुळात कोंदट असतं इत्यादी गोष्टी प्रेक्षकाला कळत जातात. चर्चिल यांच्या चेहऱ्याचे पडदा व्यापणारे क्लोजअप आहेत. माणसाला जवळून पहाणं. त्याच्या सर्व भावना दाखवणं. लो अँगलनं दाखवून ते महान आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न नाही.

चित्रपटात अनेक काल्पनिक प्रसंग घुसवलेले आहेत. डॉक्युमेंटरी करायची नाही, चित्रपट करायचा म्हटल्यावर तसं करावंच लागतं. चर्चिल लोकांचं ऐकतात हे दाखवण्यासाठी ते अंडरग्राऊंड रेलवेनं प्रवास करतात आणि लोकांशी बोलतात असं दाखवलंय. हे अगदीच सपशेल अशक्य. चर्चिल हा माणूस कधीच लोकांचं ऐकणारा वगैरे नव्हता, तो स्वमग्न माणूस होता. तो कसला लोकांमधे वगैरे जाणार? सैनिक, जनता यांच्यामधे मिसळतांनाही तो माणूस पत्रकारांना सोबत घेऊन जात असे.पक्का हुशार राजकारणी. पण चित्रपट करतांना वास्तवाला कधी कधी टांग मारतात, नाट्यमय घटना  दिसल्यानं प्रेक्षक सुखावतो.

गॅरी ओल्डमन यांची भूमिका एकदम टॉप आहे, त्यांना अभिनयाचं ऑस्कर  मिळण्याची शक्यता आहे. सडपातळ ओल्डमन यांचं रुपांतर स्थूल चर्चिलमधे करणं म्हणजे जादूच म्हणायची. चित्रीकरणाच्या आधी तीनेक तास त्यांच्या अंगावर रबरी मांस चढवलं जायचं, नंतर त्यावर बाकीचे कपडे. दररोज डोकं भादरावं लागायचं. सिगार. चर्चिल सतत सिगार प्यायचे. चित्रीकरणाच्या दरम्यान ओल्डमनना २०० सिगार ओढावे लागले, त्याचाच खर्च झाला २० हजार डॉलर. ओल्डमन हे कसलेले नट आहेत. साधारणपणे ठळक, बटबटीत भूमिका वठवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. चर्चिल वठवतांना ते कसब त्यांच्या उपयोगी पडलंय.

Image result for churchill film

‘ चर्चिल ‘ हा त्याच वेळी निघालेला दुसरा सिनेमा ऑस्करपर्यंत पोचला नाही. त्या सिनेमाबद्दल फार वाद झाले, समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्यावर खूप टीका केली. चित्रपट नाट्यमय करण्यासाठी त्यांनी फार म्हणजे फारच स्वातंत्र्य घेतलं होतं. चर्चिल सेनाधिकाऱ्यांशी भांडत हे खरं होतं. पण ते भाषण गल्लीतल्या हमरीतुमरीसारखं दाखवलं हे म्हणजे अती होतं. आयझेनहॉवर, माँटगोमेरी इत्यादी अधिकाऱ्याशी सिनेमात चर्चिलनी घातलेली हुज्जत हास्यास्पद दिसली. चर्चिल उद्धट होते, पण ते स्टेट्समनही होते. त्यांच्या जिभेला हाड नसलं तरी ते दहा एक वर्षं पंतप्रधान होते, त्यांचा साऱ्या जगात वावर होता. साऱ्या जगात त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदर होता. ‘ चर्चिल ‘ हा या चित्रपटात दिद्गर्शकाला चर्चिल यांची व्यक्तिरेखा नीट हाताळता आली नाही.

चर्चिल आणि त्यांची पत्नी यांच्यात वाद होत असत. ते स्वाभाविक आहे. कोणत्याही मनस्वी माणसाच्या पत्नीच्या नशीबी तणाव येत असतात. पण ‘ चर्चिल ‘ या चित्रपटात पत्नी चर्चिल यांच्या मुस्कटात मारते असं दाखवलंय. ते म्हणजे अतीच होतं. चर्चिल या चित्रपटातली ब्रायन कॉक्स यांची भूमिका अव्वल आहे, कित्येक ठिकाणी ती गॅरी ओल्डमन यांच्या तोडीस तोड वाटते. परंतू एकूण चित्रपटाच्या उथळ हाताळणीमुळं चित्रपट पडला.

Image result for dunkirk

‘ डंकर्क ‘ हा नोलानचा चित्रपट डंकर्कची मोहीम दाखवतो. त्यामधे प्रत्यक्ष कारवाई हा केंद्रबिंदू आहे, चर्चिल नव्हे. नोलान हा दृश्यमांडणीत निष्णात माणूस आहे, त्यानं डंकर्क उत्तम मांडलंय. पण अर्थात त्यात चर्चिल नाही.

नेटफ्लिक्सनं ‘ क्राऊन ‘ ही मालिकाही २०१७ सालातच केली. त्यातल्या काही भागांत चर्चिल आहे. तो चर्चिल अधिक चांगला रंगवलेला आहे, इतिहास आणि चर्चिल यांच्याबद्दल जे जे विश्वासार्ह लिहिलं आहे त्याच्याशी क्राऊनमधला चर्चिल प्रामाणिक आहे. खरं म्हणजे ‘ क्राऊन ‘ मधल्या संबंधित भागांतले चर्चिल यांचे तुकडे वेगळे करून एकत्र केले तर तो चर्चिल यांच्यावरचा उत्तम चित्रपट होऊ शकेल. चर्चिल आणि राणी एलिझाबेथ यांचे संबंध, चर्चिलचं परंपरा प्रेम, चर्चिलची भाषा या बरोबरच चर्चिल यांची वादग्रस्त बाजू (उद्धटपणा, सत्तेची हाव ) याही गोष्टी त्यात आहेत. पण हाताळणी इतकी हळुवार आहे की चर्चिल यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व कंगोरे दिसता दिसता तो माणूस सर्वात ग्रेट ब्रिटीश कां ठरला याचा अंदाज येतो.

‘ डार्केस्ट आवर ‘  आणि ‘ चर्चिल ‘ या दोन्ही चित्रपटात चर्चिल यांचे दोष दाखवलेत. अगदी ठळकपणे. त्यावर वर्तमानपत्रात लिहिलं गेलं, टीका झाली. संपलं. मोर्चे नाहीत, चित्रपटावर बंदी नाही. गंमत वाटते.

Related image

ब्रिटीश समाज, ब्रिटीश माणूस कसा घडलाय पहा.  चर्चिल असो की शेक्सपियर. दोनंही माणसं इतिहासात भक्कम उभी आहेत. त्यांच्या सगळ्या बाजूंबद्दल लिहिलं गेलं आहे. त्यात खरं किती आणि खोटं किती यावर वाद होतात पण ती माणसं सरळ नव्हती, जाम गुंत्याची होतं हे ब्रिटीशांना समजतं. ब्रिटीश माणसं त्यांची खरपूस टिंगल करतात. शेक्सपियरवरचा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शेक्सपियर इन लव्ह हा चित्रपट देखणा होता, त्यात जाम मजा होती. शेक्सपियरचं कामजीवन त्यात फारच देखणेपणानं दाखवलं होतं. पण या राष्ट्रीय नाटककाराबद्दल असं कां दाखवलं असं कोणी म्हणालं नाही, मोर्चे नाहीत, नाटकांसमोर निदर्शनं नाहीत, बंदी बिंदी नाही. चर्चिल, शेक्सपियर, राजा, राणी इत्यादींबद्दल ब्लोक, ब्लडी, बास्टर्ड असे शब्द ब्रिटीश माणसं वापरतात, बारमधे, घरगुती गप्पामधे, बाजारात. पण तरीही त्यांना जपतात, त्याना राष्ट्रीय चिन्हं, प्रतिकं मानतात.

काय मजा आहे नाही.

।।

 

 

 

 

 

4 thoughts on “विन्सटन चर्चिल यांच्या जीवनावरचे तीन चित्रपट

  1. गुणदोषासहित स्विकारण हा परिपक्वतेचा भाग आहे.

  2. भारतामधील अभिव्यक्ती स्वातंत्र बरचसं कागदावर आहे. गेल्या महिन्यातला पद्मावत सिनेमा आणि त्या निमित्ताने झालेली जाळपोळ बघितल्यानंतर आपण या क्षेत्रातही किती मागे आहोत याची खिन्न जाणीव होते. तुमचा लेख वाचून तर ही जाणीव अजूनच त्रास देते.

  3. I would rather rate Duke of Wellington as the greatest British ever. He was the one who defeated Napoleon, one of the greatest General history has seen , in the war ,he himself fought,and latter became the Prime Minister for two terms,never lost a single battle or election, in his life.

  4. On same subject at a time 3 movies – but makers were different – so they giving different treatment is not exceptional

    But one MAN at a time critically analysing the three treatments – show his deep study of the main subject CHURCHILL

    Hats off to Nilu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *