ट्रंप. अशा माणसाला लोकांनी कां निवडलं?

ट्रंप. अशा माणसाला लोकांनी कां निवडलं?

रशियन लोकांशी ट्रंपनी बोलणी करणं देशद्रोहासारखं आहे हे फायर अँड फ्युरी या पुस्तकातलं वाक्य प्रसिद्ध झालं आणि मायकेल वुल्फ यांनी लिहिलेलं हे पुस्तक गाजू लागलं.

Image result for fire and fury

प्रेसिडेंट ट्रंप यांच्या भोवती व्हाईट हाऊसमधे कोण कोण असतं, ट्रंप यांचे निर्णय कसे होतात, ट्रंप यांचं व्यक्तिमत्व कसं आहे इत्यादी गोष्टी   या पुस्तकात लेखकानं सांगितल्या आहेत.

डॉन आणि एरिक ही ट्रंप यांची दोन मुलं ट्रंप यांचा आर्थिक कारभार सांभाळतात. ट्रंप यांची प्रचार मोहिमही त्यांनीच  सांभाळली. या दोघांवर ट्रंप यांची मदार असते. त्या दोघांबद्दल ट्रंप आसपासच्या लोकांसमोर उघडपणे म्हणतात ” देव अक्कल वाटायला आला तेव्हां हे दोघं तिथं गैरहजर होते.”

ट्रंपनी व्हाईट हाऊस आणि आपला सगळा कारभार मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर यांच्या हातात सोपवला. या जावयाबद्दलही ट्रंप उघडपणे चार चौघात म्हणतात की तो खुषमस्कऱ्या आहे.

बॅनन हा ट्रंप यांचा उजवा हात. निदान बॅनन तरी तसं मानत असे.   बॅनन  मूर्ख आहे, खुषमस्कऱ्या आहे, माझ्याकडं रडत भेकत नोकरी मागण्यासाठी आला होता, तो नालायक आणि बदफैली आहे असं ट्रंप यांचं मत.

गॅरी कोहन आणि दिना पॉवेल ही दोन माणसं गोल्डमन सॅक्समधून व्हाईट हाऊसमधे ट्रंप यांचे सल्लागार म्हणून दाखल झाली. त्यांना राजकारणाचा किवा समाजकारणाचा शून्य अनुभव होता. जॅरेड कुशनरनं त्यांना व्हाईट हाऊसमधे आणलं. बॅनरला हाकलून त्या जागी या जोडगोळीपैकी एकाला चीफ ऑफ स्टाफ नेमायची कल्पना होती. ही दोन माणसं कोण आहेत, त्यांना काय येतं आणि काय नाही याची चौकशी ट्रंपनी केली नाही.

दाखल झाल्यावर काही दिवसांतच टिना पॉवेलनं एक ईमेल लिहिली. ती खास खास मित्राना पाठवली. मित्रांनी ती आपल्या मित्रांना पाठवली. असं करत करत हज्जारो लोकांनी, त्यात पत्रकारही आले, ती मेल वाचली. त्या मेलमधला मजकूर असा. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा सावळा गोंधळ इथं आहे. एक मूर्ख माणूस, विदुषकांच्या घोळक्यानं घेरलेला. ट्रंप काहीही वाचणार नाहीत. एक पानांचा मेमो असो की धोरणं विषद करणारे कागदपत्रं. जागतीक पुढाऱ्यांच्या बैठकीत ट्रंप मधेच उठून जातात, कारण ते बोअर झालेले असतात.

… त्यांचा स्टाफही वेगळा नाही. कुशनर हे एक काहीही माहित नसलेलं बाळ आहे. बॅनन प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा स्वतःला जास्त शहाणा समजणारा उद्धट माणूस आहे. ट्रंप हा एक माणूस नसून अनेक लक्षणांचा समुच्चय आहे. आसपासची सर्व माणसं वर्षभरात इथून नाहिशी होतील, फक्त ट्रंप शिल्लक राहील. मला या कामाचा तिटकारा आहे. पण मला इथं राहिलंच पाहिजे कारण इथं काय चालतं, ट्रंप हे काय प्रकरण आहे ते मलाच समजलय. इथं अजूनही अनेक पदं भरलेली नाहीत कारण पदं भरण्याची इथली कसोटी म्हणजे ट्रंपनिष्ठा, शुद्ध ट्रंपनिष्ठा. I am in a constant state of shock and horror…

ट्रंप खाजगीत अत्यंत घाण भाषेत बोलतात. न आवडणाऱ्या स्त्रियांना, सीनियर सरकारी अधिकारी स्त्रियांना ते गलिच्छ शिव्या देतात. पुस्तकात त्या शिव्या आहेत, ती अवतरणं इथं द्यायलाही लाज वाटते.

ट्रंप यांच्या भोवती माणसं कशी होती पहा.  बॅननना वाटत होतं ट्रंप मूर्ख आहेत आणि आपल्याच सांगण्याप्रमाणं ते वागतील आणि शेवटी आपणच खरे अध्यक्ष असल्यासारखं घडेल. बॅनननी आपल्या जवळची माणसं व्हाईट हाऊसमधे नेमली. ट्रंप यांची प्रचार मोहिम बॅननी आखली आणि ट्रंप प्रेसिडेंट झाल्यावर तेच ट्रंप प्रशासनाचे प्रमुख रणनीतीकार होते.

ट्रंप पराभूत होतील असंच ट्रंपच्या सहकाऱ्यांना वाटत होतं. ट्रंप हा एक विनोद आहे, यथावकाश त्यांचा पचका होणार आहे असा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा होरा होता. ट्रंपच्या पत्नी मेलानिया  या व्यवसायानं मॉडेल. त्यांचं जग एकीकडं सार्वजनिक आणि दुसरीकडं खाजगी. नग्नतेत मॉडेलिंग आणि गुप्ततेत प्रकाशापासून दूर रहायचं असं त्यांचं एकेकाळचं जगणं. ट्रंप अध्यक्ष झाले तर आपल्याला व्हाईट हाऊसमधे रहावं लागणार, आपलं खाजगीपण संपणार याची भीती त्यांना होती. शेवटचा निकाल हाती येईपर्यंत त्यांना आशा होती की ट्रंप हरतील. ट्रंप जिंकले असं जाहीर झालं तेव्हां त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आता मी काय करू असं मेलानियांनी   विचारलं. ट्रंप म्हणाले घटस्फोट घे, Sui.

मुलगी इवांकाला वाटे की आपल्या वडिलाना काही कळत नाही. तिचा नवरा जेरार्ड कुशनर याचंही तसंच मत होतं. जेरार्ड कुशनरचे वडील एकेकाळी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाऊन आले होते. कुशनर आणि इवांका यांना व्हाईट हाऊस आपल्या हाती हवं होतं. बॅनन असो की जनरल केली असोत की टिलरसन असोत, सगळी माणसं आपल्या हाताखाली असावीत नाही तर त्यांना हाकलून द्यावं असं दोघांचं मत होतं. अमेरिकेतल्या धनाढ्य लोकांना (उदा. रुपर्ट मरडॉक ) फोन करायला लावून ते दोघं ट्रंप यांचे कान भरत.

पक्षातल्या माणसांनाही ट्रंप नको होते. उदा. पॉल रायन. रायन प्राथमिक चाचणी मोहिमेत ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी होते. पक्षातल्या कंझर्वेटिव, कट्टर ट्रंपविरोधी गटाचे ते म्होरके होते. त्यांनी ट्रंप यांना ढील दिली. ट्रंप आणि रायन सतत एकमेकाचा अपमान करत असत, एकमेकाला जाहीर शिव्या देत असत. रायन यांचा डाव होता की ट्रंप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरतील आणि नंतर आपण बंड करून त्यांना हाकलून द्यायचं आणि पुढल्या निवडणुकीत प्रेसिडेंट व्हायचं.

ट्रंप संध्याकाळी आपल्या खाजगी खोलीत जाऊन फॉक्स न्यूज हे भंपक चॅनेल पहात असत. त्या चॅनेलवर पेरलेल्या बातम्यांनी ते प्रभावित होत असत. कधी कुशनर तर कधी बॅनन ट्रंपना प्रभावित करण्यासाठी आपल्या हस्तकांकरवी फॉक्स चॅनेलवर चर्चा घडवून आणत. ट्रंप त्या चर्चा ऐकत आणि भडकत. भडकले की ते कोणाचही ऐकत नसत, एकटे होत.

एका संध्याकाळी फॉक्स चॅनेलवर ट्रंप हस्तकांनी एक चर्चा घडवली. त्यात मुद्दा होता की निवडणुक मोहिमेच्या काळात ट्रंप टॉवर वर (ट्रंप मोहिेमेचं मुख्यालय) ओबामा सरकारनं टेहळणी केली होती. ट्रंप खवळले. पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ट्रंपनी ट्वीट केलं. “ओबामानी माझा टेलेफोन टॅप केला. wires tapped. ”

फोन टॅप करणं आणि टेहळणी या दोन गोष्टीत खूपच फरक आहे. फोन टॅप करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. वॉटरगेट या इमारतीतल्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयातला फोन टॅप केला या मुद्द्यावरच निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. ट्रंपना टॅप आणि टेहळणीतला फरक कळत नव्हता. असं ट्वीट करण्याआधी आपल्या सहाय्यक, सल्लागार, कायदा सल्लागारांना विचारावं असं त्यांना वाटलं नाही.  ते कधीच कोणाचा सल्लाबिल्ला घेत नसतात. ट्वीट करून मोकळे झाले.

चार वाजून एकुणपन्नास मिनिटांनी दुसरा ट्वीट. “एका पदावर असलेल्या प्रेसिडेंटनं प्रेसिडेंशियल स्पर्धेतल्या उमेदवाराचा फोन टॅप करणं. किती नीच पातळी.”

पाच वाजून दोन मिनिटांनी तिसरा ट्वीट.” प्रेसिडेंट ओबामानी पवित्र निवडणुक प्रक्रियेत माझा फोन टॅप करणं, किती नीचपणा.  निक्सन, वॉटरगेट. वाईट्ट, आजारी माणूस.”

निक्सन यांच्याच पक्षाचे.

सहकारी असलेल्या जनरल फ्लिनना काढून टाकणं असो, एफबीआयचे प्रमुख कोमी यांची हकालपट्टी असो, सीरियावर टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा हल्ला असो, सौदी राजपुत्र सलमान यांच्या हुकूमशाहीला दिलेला पाठिंबा असो की द.कोरियाच्या किम जाँग उन यांच्या हातातल्या अणुबाँब बटनाला आपल्या हातातलं बटन अधीक प्रभावशाली आहे असं दिलेलं उत्तर असो. सर्व निर्णय कोणालाही न विचारता, कोणताही सल्ला न घेता, जावई किंवा बॅननसारख्या माणसांनी कान भरण्यातून झाले.

जगातल्या एका बलाढ्य देशाचा प्रमुख, मूर्ख, स्वार्थी, आहे; त्याच्या जिभेला हाड नाही, त्याला  केवळ प्रसिद्धी हवीय, केवळ प्रकाशात रहायचंय. त्याला राजकारण, अर्थकारण, समाजकारण कळत नाही.

वुल्फ यांनी रंगवलेलं चित्र भयानक आहे.

Image result for trump

लेखक वुल्फनी पुस्तक लिहिण्यासाठी व्हाईट हाऊसमधे प्रवेश मागितला, ट्रंप यांची मुलाखत मागितली. ट्रंप यांना पुस्तकात रस नव्हता, व्हाईट हाऊस तर स्वतःच्याच भानगडीत गुंतलं होतं, त्यानी वुल्फकडं दुर्लक्ष केलं. वुल्फ किमान २०  वेळा व्हाईट हाऊसमधे गेले, तिथल्या लोकांशी बोलले. किमान एक वेळ ते २६ मिनिटं ट्रंप यांच्याशी फोनवर बोलले. वुल्फ भिंतीवर बसलेल्या माशीसारखे व्हाईट हाऊसमधे वावरले, जे दिसलं, जे ऐकलं त्याच्या आधारे हे पुस्तक त्यांनी लिहिलं.

पुस्तकाच्या शैलीबद्दल पत्रकार जगात नाराजी आहे. १९६० ज्या दशकात ट्रुमन कॅपोट आणि टॉम वुल्फ यांनी पत्रकारीचे पारंपरीक संकेत दूर सारले. बातमीदाराला वाटलं तेच सत्य, बातमीदारानं पाहिलेलं ते सत्य नाही अशी बातमीदारीची व्याख्या त्यांनी केली. या पत्रकारीला न्यू जर्नालिझम असं नाव पडलं.  त्यांच्या बातम्या वाचताना खरं किती याबद्दल लोकांना शंका वाटे. त्यांचं लिखाण चटकदार असे, साहित्यासारखं असे. लोकांना ते आवडलं होतं. मायकेल वुल्फ यांचं फायर अँड फ्युरी हे पुस्तक चटकदार आहे, त्यात खूप माहिती आहे, त्यातली बरीच माहिती शक्य आहे, पण त्यातला सत्याचा भाग किती आहे या बद्दल जातीवंत पत्रकार साशंक आहेत. बॉब वुडवर्डच्या पुस्तकांप्रमाणं पक्के आधार तरी द्यायला हवे होते असं पत्रकार म्हणतात.पुस्तकात अनेक ठिकाणी likely असं  म्हणत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

ट्रंप यांची जाहीरपणे दिसणारी कारकीर्द आणि पुस्तकातला मजकूर यात मेळ बसल्यानं हे पुस्तक शंभर टक्के खरं नसलं तरी जितकं तितकं खरं आहे तितकं ते स्फोटक आणि हादरवून टाकणारं आहे.

Fire and Fury

Michael Wolff

Little,Brown Publication

।।

 

 

 

 

4 thoughts on “ट्रंप. अशा माणसाला लोकांनी कां निवडलं?

  1. ही नेते मंडळी थोडी चक्रम असतात पण ट्रंप यांनी बहुधा मापदंड व्हायचं ठरवलंय. अमेरिकेत पण असे लोक सत्तेवर येतात हे कोड्यात टाकणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *