ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीसवर ३५० अब्ज युरोचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ग्रीसला आणखी कर्ज घेणं भाग आहे. मागं असंच घडलं होतं. सुरवातीला ११० अब्जाचं कर्ज घेतलं. ते फेडण्यासाठी आणखी २४० अब्जाचं कर्ज घेतलं. आणि आता ते फेडण्यासाठी पुन्हा कर्ज हवंय. ऋणको सांगताहेत की खर्च कमी करा, काटकसर करा, त्रास सहन करा. कर वाढवा, खाजगीकरण करा, सार्वजनिक क्षेत्रावरचा खर्च कमी करा. त्या अटी ग्रीकांना अमान्य दिसताहेत. कर्ज घेतल्यावाचून गत्यंतर नाहीये. तेव्हां नवे दाते शोधण्याच्या खटपटीत ग्रीक सरकार आहे. दाते मंडळींकडून घातल्या जाणाऱ्या अटी कमी जाचक करण्याचा प्रयत्न ग्रीस करत आहे. मागलं कर्ज माफच करून टाका किंवा त्यातलं अर्धपाऊण कर्ज माफ करा असाही फार्म्युला ग्रीक पुढं करत आहेत. व्याज देतो, मुदलाच बोलू नका असंही म्हणत आहेत.  कसंही करा पण आणखी कर्ज द्या असं ग्रीसचं म्हणणं आहे.
कर्जबाजारीपणाची सगळी लक्षणं ग्रीसमधे दिसतात. २५ टक्के बेकारी आहे. ५० टक्के तरूण बेकार आहेत. उत्पादन कमी खर्च जास्त. उत्पन्न कमी खर्च जास्त. कर्ज देणाऱ्या संस्था सांगतात खर्च कमी करा, उत्पन्न वाढवा. खर्च कमी करा म्हणजे माणसांचे पगार कमी करा, विनाकारण भरती केलेल्या माणसांना कामावरून काढून टाका, पेन्शन-आरोग्य-शिक्षण इत्यादी गोष्टीवरचा खर्च कमी करा. आधीच माणसं गांजलेली. पेन्शनची रक्कम पन्नास टक्क्यानं कमी झालेली. बेकारी. दुकानात औषधं नाहीत. दुकानात ब्रेड मिळत नाही. दोन वेळा खायची मारामार. अशात सरकार आणखी नोकऱ्या घालवणार आणि पेन्शन कमी करणार म्हणजे अतीच होतं. त्यामुळं धनकोंनी घातलेल्या अटी मान्य करणं ग्रीक सरकारला जड जातंय. 
उत्पादन वाढवायचं म्हणजे उत्पादन व्यवस्थेत पैसे गुंतवायला हवेत. पण गुंतवायला पैसेच नाहीत. त्यामुळ उत्पादन वाढीची बोंब.
२००४ सालाच्या सुमारास हे संकट सुरु झालंय. ग्रीसनं युरोझोनमधे प्रवेश करून आपलं ड्राचमा हे चलन रद्द करून युरो हे चलन स्वीकारलं. तेव्हां युरोपियन समुदायानं अट घातली होती की बजेटमधली तूट ३ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर युरोझोनमधे प्रवेश मिळणार नाही. ग्रीसनं आकडेवारीची गोलमाल करून तूट १.५ टक्का दाखवली. नंतर लक्षात आलं की तूट ८ टक्के होती. म्हणजे आमदन्नी अठन्नी खर्चा रुपय्या अशी स्थिती थेट २००२ सालापासूनच होती.
अशी स्थिती येण्याची अनेक कारणं असावीत.  
 जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांनी सढळ आणि स्वस्त कर्जं दिली. कर्ज मिळताहेत म्हटल्यावर नाना गोष्टीवर ग्रीसनं खर्च केला. त्यातल्या दोन ठळक बाबी म्हणजे शहरातल्या सोयी आणि शस्त्र खरेदी. दोन्ही गोष्टी उत्पादक नव्हत्या. शहरी सोयीमुळं शहरातलं जगणं छान झालं खरं पण त्यामुळं सुखी माणसं कामाला लागायला हवी होती, त्यांची कार्यक्षमता वाढायला हवी होत. तसं झालं नाही. ट्रॅम्स, विजेवर चालणाऱ्या रेलवे, रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल इत्यादी गोष्टीत पैसे अडकले पण त्यातून शहरातलं उत्पादन वाढलं नाही. उलट लोकांनी चकाचक मर्सिडीझसारख्या गाड्या खरेदी केल्या. शस्त्रांच्या खरेदीतून तर परतावा कधीच मिळत नसतो. ती तर खरंच ‘ डेड ‘ किंवा ‘ डेड करणारी ‘ गुंतवणूक असते. थोडक्यात असं की पैसा गुंतला परंतू त्यातून उत्पादन वाढलं नाही. 
गंमत अशी वरील खर्चाचा फायदा जर्मनी फ्रान्स या देशांनाच झाला. कारण वरील कामांसाठी लागणाऱ्या वस्तू जर्मनी आणि फ्रान्समधूनच आयात कराव्या लागल्या होत्या. म्हणजे धनको देशांनी कर्ज देऊन स्वतःच फायदा करून घेतल्यासारखं झालं. कर्जाची ही एक गंमत असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं ब्रिटन आणि जर्मनीत पैसे खर्च केले, ते देश वर आणण्यासाठी. मार्शल योजने तहत. त्या दोन देशांचं इन्फ्रा स्ट्रक्चर, उद्योग मार्शल प्लाननं उभं केलं. पण त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, प्रक्रिया इत्यादी सारं अमेरिकेतूनच आयात केलं. त्यामुळं जर्मनी ब्रिटनबरोबरच अमेरिकेचंही कल्याण झालं. पैशाचा नीट विनियोग करणं जर्मनी-ब्रीटनला जमल्यानं त्यांचंही कल्याण झालं ही स्वतंत्र गोष्ट. ग्रीक संकटात वेगळंच घडलं. पैशाचा नीट उपयोग करून घेणं ग्रीसला न जमल्यानं ग्रीस खड्ड्यात गेला पण जर्मनी मात्र फायद्यात राहिलं.
दुसरी एक भानगड झाली. गुंतवणूक आणि शस्त्रखरेदी यासाठी आलेल्या पैशातला चांगलाच हिस्सा ग्रीक पुढाऱ्यांनी पळवला, कमीशन किंवा किक बॅकच्या रुपात. ४० ते ५० अब्ज युरो इतकी रक्कम या व्यवहारात ग्रीक पुढाऱ्यांनी हाणली आणि परदेशी बँकांत ठेवली.
पैशाचा अपव्यय, भ्रष्टाचार, अयोग्य नियोजन, धनकोंच्या लबाड्या अशा प्रमुख कारणांमुळं ग्रीसचं अर्थसंकट उभं राहिलं. मधल्या मधे ग्रीक जनता मात्र भरडली गेली.
ग्रीसमधली काही दृश्यं अशी
अथेन्स शहराचा मध्य भाग.
शहराच्या मुख्य रस्त्यावरची दुकानं आणि कॅफे.  दुकानांवर फलक लागले आहेत. ५० ते ७० टक्के सूट. दुकानात  तुरळक गर्दी. 
मुख्य रस्ता सोडून बाजूच्या गल्ल्यांत गेलं की दुकानांची शटर ओढलेली दिसतात. शटरवर ग्रीक भाषेत ग्राफिट्या काढलेल्या. बहुदा निवडणुकीतल्या घोषणा वगैरे. मोठ्या अक्षरात. काही शटर तळात गजलेली, मोठाली भोकं पडलेली. खाली वाकलं, शटरच्या भोकामधे डोकावलं तर आत दुकानातली रिकामी कपाटं, शेल्फ दिसतात.  दुकान वर्ष दोन वर्षं बंद आहे.
एका कॅफेत बरीच गर्दी.  विविध वयांची माणसं. दाढीचे खुंट वाढलेले. कॅफेच्या मालकानं एका चाकाच्या टेबलावर ठेवलेल्या टीव्ही सेटभोवती माणसं जमलेली.
पंतप्रधान सिपारास यांचं भाषण. ते नाना कार्यक्रम जाहीर करत आहेत. लोक टाळ्या वाजवतात. त्यातल्या काही टाळ्या अगदी उघडपणे उपहासात्मक होत्या.
त्या गर्दीत एक वेल्डर पानोस अलेक्सोपोलुस. २००९ साली त्याला मालकानं कामावरून काढून टाकलय. पेन्शन मिळतं. महिना साडेचारशे डॉलर्स. धरात तो एकटाच मिळवणारा आहे. 
‘ सरकारं येतात आणि जातात. काही फरक पडत नाही. सिप्रासांच्या आश्वासनातली १० टक्के आश्वासनं जरी खरी ठरली तरी खूप झालं, ग्रीस सुधारेल.’
।।
डाऊन टाउन अथेन्समधली एक काहिशी काळवंडलेली इमारत. ग्रीक सरकारचं आर्थिक धोरण ठरवणारी माणसं या इमारतीत बसतात. एका खोलीत बसलेत प्रा. थियो शराकिस. ते अथेन्स विद्यापिठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सरकारचं धोरण ते एका पत्रकाराला समजून देताहेत. ‘ अहो केनेशियन सिद्धांताचा वापर करायचाय. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामात पैसे खर्च करायचे आहेत. आपोआप लोकांच्या हातात पैसा जाईल, वस्तूंना मागणी येईल, वस्तूंचं उत्पादन सुरु होईल आणि अर्थव्यवस्था वळणावर येईल. ‘
पत्रकार प्रश्न विचारतो ‘ ते ठीक आहे. पण सार्वजनिक कामात गुंतवायला पैसे कुठून येणार? त्यासाठी कर्जाची मागणी करावी लागणार. घोळ तर तिथंच आहे.’ 
प्राध्यापक संथपणे पत्रकाराला समजून देतात.
प्राध्यापकांना गेलं वर्षभर पगार मिळालेला नाही.
याच इमारतीसमोरच्या चौकातली एक दुपार.
दिमित्रीस ख्रिस्तुलास हा फार्मासिस्ट इमारतीकडं तोंड करून उभा राहिला. सकाळची गर्दीची वेळ. त्याच्याकडं पहायलाही कोणाला वेळ नव्हती. त्यानं खिशातून पिस्तुल काढलं, कानशिलाला लावलं, गोळी झाडली. त्या आवाजानं लोकांचं त्याच्याकडं लक्ष गेलं.
त्याचं पेन्शन पंचावन्न टक्क्यानं कमी झालं होतं.
त्याच्या खिशातल्या कागदावर लिहिलेलं होतं. ‘ सरकारनं माझ्या जगण्याचे सगळे मार्ग बंद केलेत. कचऱ्याच्या ढिगातून खाद्यपदार्थ काढून त्यावर जगण्याचं माझ्या नशिबी येऊ नये यासाठी मी माझं हे सन्मानाचं जीवन नष्ट करत आहे. ‘
00
अथेन्सचं उपनगर, एल्लिनिको. तिथं डॉ. मारिया रोटा यांचं क्लिनिक. क्लिनिकमधे बरीच माणसं बसली आहेत.  फार्मासिस्टच्या आत्महत्येचा विषय निघाल्यावर त्या सांगतात ‘ मी इथं अनेक वर्ष मानसोपचार डॉक्टरी करतेय. मंदी सुरु होण्याच्या आधीपासून.  मंदी सुरु होण्याच्या आधी माझ्याकडं माणसं येत असत. सामान्यपणे समाजातल्या गरीब वर्गातली. गरिबी आणि अभाव यातून निर्माण झालेले तणाव ही त्यांची समस्या असे. आता सुस्थितीतल्या लोकांची गर्दी वाढत चाललीय. चांगले पगार असणारी, व्यावसायिक माणसं. नोकऱ्या गेल्यात. व्यवसाय चालत नाहीये. ‘ 
हे क्लिनिक अथेन्समधले लोक स्वतःहून चालवतात. दोनेकशे स्वयंसेवक गावातल्या माणसांना या क्लिनिकमधे आणतात. हे स्वयंसेवक स्वतः गेली दोनेक वर्ष बेकार आहेत. घरी बसून तरी काय करायचं. निदान लोकांना मदत करावी या हेतूनं स्वयंसेवक आपला सर्व वेळ या कामावर खर्च करतात. स्थानिक लोकांची एक संघटना आहेत. कुठली औषधं आणायची वगैरे निर्णय ही संघटना घेते. लोकांकडून देणग्या म्हणून औषधं गोळा करतात. घरातलं माणूस दगावलं की औषधं उरतात. तीही गोळा करून या दवाखान्यात आणली जातात.
।।
अथेन्सच्या मध्यावरची वसती.
एकेकाळी चांगल्या स्थितीत असावी अशी एक इमारतींची वस्ती.  आता इमारतींची स्थिती ठीक दिसत नाही. रंग गेला आहे, सिमेट जाऊन आतल्या सळया उघड्या पडल्या आहेत.
पोलिसांचा ताफा सर्जिस थियोडोरिडिस यांच्या दारात जमा झाला. त्यांच्या सोबत वीज बोर्डाची माणसं.  सर्जिसचं कित्येक महिन्यांचं वीज बिल थकलंय. माणसं   वीज तोडायला आलीत.  विजेचाही घोळच.  दिवसातला बराच वेळ वीज गायब असते.
सर्जिस अकाऊंटंट होता. एकेकाळी त्याचा व्यवसाय चांगला चालत असे.   तो ज्या कंपन्यांचं हिशोबाचं काम करत असे त्या कंपन्या बंद पडत गेल्या. काही कंपन्या शिल्लक होत्या पण त्या पैसे देऊ शकत नव्हत्या. त्यामुळं सर्जिस कफल्लक झाला. विजेचं बिल देऊ शकत नव्हता.
सर्जिसनं स्थानिक जनसंघटनेच्या कार्यकर्त्याला फोन केला. ही जनसंघटना लोकांनी स्थापन केली होती, आपसात मदत करण्यासाठी. चर्चच्या मदतीनं लोकांना मोफत अन्न वाटप, औषधांचा पुरवठा वगैरे गोष्टी ही संघटना सांभाळत असे. काम करणारे सर्वच स्वयंसेवक, सर्वच बेकार. सर्जिसचा फोन आल्यावर काही मिनिटात पाच पन्नास कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी पोलिसांना घेराव केला. मग चर्चा, बाचाबाची. शेवटी मांडवळ झाली. थोडेसे पैसे देऊन वीज सुरु करायचं ठरलं.
जनसंघटनेनं एका बंद पडलेल्या कारखान्यात आपलं कार्यालय उघडलय.
।।
पेरेमा. बंदराचं शहर. अथेन्सपासून तासभराच्या अंतरावर. ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत साताठ वर्षांपूर्वीपर्यंत जहाज बांधणी आणि जहाज देखभाल-दुरुस्तीचा वाटा मोठा होता. पेरेमा शहर ०८ पर्यंत भरभराटलेलं शहर होतं.
आता.
शहर भकास दिसतं. दिवसाही. बहुसंख्य दुकानं बंद आहेत. इमारती ओस पडलेल्या आहेत. अमेरिकेतल्या ओस पडलेल्या डेट्रॉईट शहराची आठवण येते. इमारतींच्या खिडक्या ओक्या बोक्या, दरवाजे जागेवर नाहीत. इमारतीत गवत वाढलेलं, भिंती शेवाळलेल्या. इमारतीच्या आसपास कुत्र्यांची वर्दळ.
कित्येक ठिकाणी इमारतींचं बांधकाम अर्धवट पडलेलं. चौकटी दिसतात, भिंती तयार नाहीत. लाद्याच्या चळती कंपाऊंडमधे निमूट पडून, वर उचलून नेण्याची वाट पहात. याऱ्या मान वर करून जिराफांसारख्या उभ्या. काही तरी अघटित घडल्यावर माणसं एकाएकी पळून जातात तसं काही तरी घडलं असावं असं वाटतं. हे झालं दिवसाचं.
रात्री रस्त्यावर दिवे लागत नाही. वीज नाही आणि दिवे फुटलेले आहेत. नवे दिवे बसवण्याची पालिकेची क्षमता नाही. बंदरच बंद पडल्यानं शहराला महसूल मिळत नाही. अनेक घरांतही दिवे दिसत नाहीत. नागरिकांजवळ विजेची बिलं भरायला पैसे नाहीत.
एका इमारतीच्या तळ मजल्यावर फूड किचन आहे. प्लास्टिकच्या ट्रेमधे भरलेली भाजी आणि ब्रेड घेण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. परवापरवापर्यंत इथे अगदी किरकोळ पैशात ब्रेड भाजी मिळत असे. तेवढेही पैसे नसल्यानं आता अन्न फुकटच वाटलं जातं. 
या रांगेत उभा एक माणूस उभा. त्याचं नाव निकोस पेनागोस. साठीत पोचलेला. त्याला सहा मुलं आहेत. सहाही मुलं बेकार आहेत. निकोसचं पेन्शन येवढंच उत्पन्न. पेन्शनची रक्कम अर्ध्यापेक्षा कमी झालीय. निकोसला दरमहा चारशे युरो मिळतात. निकोसची एकाद दोन मुलं चर्चच्या बाहेर रांग लावतात, तिथं वाटले जाणारे दानपैसे घेण्यासाठी. दोन मुलं कचरा ढिगातून अन्न शोधतात. निकोस सार्वजनिक अन्नछत्रामधे अन्न शिजवायला जातो, त्या बदल्यात त्याला काही अन्न मिळतं.
।।
माही पापाकोन्सांटिनु. निवृत्त सनदी अधिकारी. एटीएमसमोर. कार्ड टाकलं. यंत्रानं पैसे नाकारले. माही दुसऱ्या बँकेच्या एटीएम यंत्रासमोर उभ्या. त्याही यंत्रानं पैसे नाकारले. बँकेत पैसे नव्हते. माहींचा रक्तदाब वाढू लागला. वाणसामान विकत घ्यायला पैसे नाहीत. कारमधे बसल्या, घराकडं परत निघाल्या. कारमधे अजून पेट्रोल होतं. ते संपलं असतं तर ते घेण्यायेवढेही पैसे जवळ नाहीत. वाटेत एक एटीएम यंत्र दिसलं. यंत्रासमोर कोणी उभं नव्हतं. ‘ पाहूया प्रयत्न करून ‘ असा विचार करून यंत्रासमोर उभ्या राहिल्या. चक्क ५० युरो यंत्रातून बाहेर पडले. 
२०, १०,५ युरोच्या नोटा गायब झाल्या आहेत. एक युरोची नाणीही गायब आहेत. एटीएममधून जास्तीत जास्त ६० युरो बाहेर निघत, आता ती मर्यादा ५० युरोवर आणण्यात आलीय.
नोटा आणि एक युरोपची नाणीही बाजारातून गायब असल्यान माणसं क्रेडिट कार्डानं पैसे देत आहेत. दुकानात जाऊन एक युरोची फुलं किवा ब्रेड वगैरे घेतला तरीही लोक क्रेडिट कार्ड देतात.
दुकानदार म्हणतो ‘ आत्ता आम्ही क्रेडिड कार्डं घेतोय खरी. पण लोकांच्या खात्यात पैसेच नसतील तर कार्डावरचे पैसे मिळणार कसे. काही दिवसांनी कार्डंही चालेनाशी होणार आहेत. ‘
।।
 ग्रीस हा उत्पादक देश नाही. इथे बहुतेक गोष्टी आयात होतात. दररोजच्या वापरातल्याही. औषधं. कपडे. वाणसामान. मांस. पेयं. आर्थिक संकट निर्माण झाल्यावर निर्माण झालेल्या बंधनांमुळं बँकांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद आहेत. त्यामुळं आयात व्यवहार होत नाही. आयात व्यापाऱ्यांचे चेक वटत नाहीत. परिणामी बाजारात वस्तूंचा तुटवडा आहे. कॅन्सवरची औषधं बाजारात नाहीत. रक्तदाबावरची नेहमी लागणारी औषधंही बाजारात नाहीत. माणसं प्रचंड हादरलेली आहेत. 
।।
एरिस हाजीजॉर्जियू. पत्रकार.
‘ हं. आमचंही जगणं कठीण होत चाललंय. आमचा पेपर डावा आहे. आमच्या पेपरच्या मालकांचे समाजातल्या वरच्या थरातल्या लोकांशी घट्ट संबंध आहेत.  वरच्या वर्गातल्या लोकांनी केलेले भ्रष्टाचार, त्यातून कमावलेले आणि परदेशात साचवून ठेवलेले पैसे इत्यादी बातम्या आम्हाला देता येत नाहीत. किक बॅक्सचे पैसे. आम्हाला त्यावर लिहायची परवानगी नाही. अलिकडं श्रीमंत वस्तीतल्या कारच्या काचांवर जाहिराती चिकटवलेल्या असतात. परदेशात जाण्याची, स्थलांतरित होण्याची सोय. सामान हलवणं, जागा मिळवणं, व्हिजा इत्यादी इत्यादी. … आणि हो. मला चार महिने पगार मिळालेला नाहीये. तरी आम्ही बऱ्याच लोकांनी नोकरी सोडलेली नाही. कारण नोकरी सोडून जायचं तरी कुठं. नोकऱ्या आहेत तरी कुठं? ‘
।।
जियानिस्टा. एक छोटं शहर. ट्रायनोस वाफियाडिस. 
‘ माझं वय आहे २४. आमचा सात जणांचा एक ग्रुप होता.शाळेपासून. आता त्यातले सहा जण ग्रीस सोडून गेले आहेत. नोकऱीच्या शोधात. मी कसाबसा टिकून आहे. गेले बरेच दिवस हे असं चाललंय. गावातली तरूण जोडपी हादरलीयत. म्हणताहेत मुलं नकोत. त्यांना लहानाचं मोठं करण्याची कुवत नाहीये. पुढल्या काही वर्षात केवळ म्हातारे उरतील.  काम करणारी माणसं नाहीत,  केवळ खाणारी माणसं उरतील. म्हातारे मेल्यावर? मला मुलं व्हावीशी वाटतात. पण बायको तयार नाहीये. ‘
हे बोलत असताना ट्रायनोसची पत्नी हजर होती. तिच्याकडं पाहून थट्टेच्या हावभावात ट्रायनोस म्हणाला ‘ मला मुल व्हावंसं वाटतं. एकादी स्त्री मला दुसरी पत्नी म्हणून निवडावी लागेल जी मुलाला जन्म द्यायला तयार असेल.’ 
।।
अथेन्सकडून थीबेस या गावाकडं जाणारा रस्ता. रस्त्यावरचा एक टोल नाका. 
 कार अडवून धरणारा अडसर आडवा पडलेला आहे. 
‘ आमचे आधीच वांधे आहेत. सरकार एकामागोमाग कर लावत आहे. कर भरायला  आमच्याकडं   पैसे तर उरायला हवेत. टोल हा पैसे काढण्याचा सरकारचा आणखी एक मार्ग. पण आम्ही आता आमची वाट काढली आहे.’
कार चालवणाऱ्यानं  कार अडसराशी थांबवली. अडसर बळ वापरून वर सरकवला. टोल न भरता गाडी सुरु केली. निघून गेला.
।।
पॉल एवमॉरफिडिस. कोको मार्ट नावाच्या कंपनीचा मालक. त्याचे भाऊही या व्यवसायात आहेत. ग्रीसमधे आर्थिक संकट सुरु होण्याच्या सुरवातीलाच कोको मार्ट ही कंपनी सुरु झाली.  
 अथेन्स शहराच्या मध्यवर्ती व्यापारी विभागात एक छोटं दुकान काढून कंपनी सुरु झाली. दुकानाचं खरं भाडं होतं सुमारे तीस हजार डॉलर. मंदीमुळं साताठ हजार डॉलर भाड्यात दुकान सुरु झालं. युरोपात चांगल्या मॅट्रेसेसनं मागणी होती. कोको मॅट या कंपनीनं ग्रीसमधेच भरपूर उपलब्ध असणारी लोकर, तागाचा धागा, कोको वनस्पतीचा धागा इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून दर्जेदार मॅट तयार केली. योग्य किमत ठेवली. युरोपात कोको मॅटला मागणी आली. ११ युरोपीय देशात कोको मॅटची ७० दुकानं आहेत. नुकतंच एक दुकान न्यू यॉर्कमधे उघडलं. अमेरिकन जनतेला कोकोमॅट आवडली. अमरिकेत आता आणखी १० दुकानं उघडण्याच्या बेतात कंपनी आहे.  २०१० साली कंपनीची उलाढाल ७ कोटी डॉलर्सची होती. 
पॉलचं म्हणणं आहे ‘ ग्रीसमधे वर्षाचे ३०० दिवस कडक ऊन पडतं. विविध वनस्पती आणि पिकं हे ग्रीसचं वैभव आहे. आम्ही कोको वनस्पतीच्या धाग्यांचा वापर आमच्या मॅट्रेसेससाठी करतो. ग्रीसकडं जे आहे त्याचा वापर करून समृद्ध व्हायचं सोडून नको त्या आयटी वगैरे गोष्टींच्या मागं लागलं तर अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल नाही तर काय होईल?
।।
अथेन्सच्या उत्तरेला कॉरिंथचं आखात आहे. तिथल्या डोंगरी विभागातलं एक गाव माऊंट हेलेकॉन. ग्रीसमधे नव्वद टक्के भाग डोंगरी आहे. 
माऊंट हेलेकॉनमधे गेलात तर तिथं स्टेलियॉस नावाचा २७ वर्षाचा तरूण भेटेल. ऐन मंदीच्या काळात स्टेलियसनं आपल्या गावातल्या वडिलोपार्जित जमिनीवरच्या द्राक्षाच्या बागेवर लक्ष द्यायला सुरवात केली. इतर ग्रीक माणसांप्रमाणं अथेन्समधे जाऊन नोकऱी बिकरी करण्याला त्यानं नकार दिला. वडील द्राक्षं पिकवत असत आणि द्राक्षाचा रस वाईन करणाऱ्या कारखान्यांना विकत असत. ग्रीकमधे उत्तम द्राक्षं होतात पण चांगली वाईन होत नाही.  स्टेलियोस, त्याचा भाऊ आणि कुटुंबियांनी स्वतःची वायनरी सुरु केली. मर्लो, कॅबरने, सॉविग्नॉन, शारडोनी या वायनी स्टेलियोस करू लागला.  माहुतारो ही ग्रीक देशी वाईनही त्यानं उत्पादनली.वाईनचा दर्जा उत्तम ठेवला आणि किमतही चांगली ठेवली. ३० डॉलर या किमतीत त्याच्या वाईनच्या बाटल्या किरकोळ दुकानात मिळू लागल्या. युरोपातल्या दहा देशात आणि अमेरिकेत त्याच्या वायनीना उत्तम बाजार मिळाला. गेल्या वर्षी त्यानं २ लाख बाटल्या निर्यात केल्या. शिवाय ग्रीसमधेही त्याच्या देशी वाईन्सचा उत्तम खप होतो.
माऊंट हेलिनॉसचं हवामान उत्तम असल्यानं उत्तम दर्जाची ऑलिव्ह त्या गावात तयार होतात. चांगल्या नोकऱ्या किंवा इतर गोष्टींसाठी अथेन्स किंवा युरोपातल्या इतर देशात गेलेले तरूण आता आपल्या गावात परतलेत.  ऑलिव्ह पिकवू लागले आहेत. गावातली एक सहकारी संस्था ऑलिव्हचं तेल काढून देते, फुकट. गाळलेल्या तेलातलं २ टक्के तेल सहकारी संस्थेच्या उपयोगासाठी घेतलं जातं. या ऑलिव तेलाला युरोपात उत्तम मागणी आहे.
।।
ग्रीसचं वार्षिक उत्पन्न २३० अब्ज युरो आणि कर्ज झालंय ३५ अब्ज युरो. 
अमेरिकाही कर्जबाजारीच आहे. अमेरिकेचं वार्षिक उत्पन्न सुमारे १६ ट्रिलियन डॉलरचं आणि त्यांनी घेतलेली कर्ज आहेत सुमारे १८ ट्रिलियन डॉलरची. तरीही अमेरिका सुखात दिसतेय. तिथं बेकारी कमी आहे, लोकांची खायची प्यायची चंगळ आहे. दोन चार लाख अमेरिकन सैनिक इतर देशांत हाणामारी करत फिरत आहेत. अवकाशातल्या यानांच्या महाग फेऱ्या चालू आहेत. थोडक्यात कर्ज डोक्यावर असलं तरी अमेरिका सुखात दिसते. पण ग्रीस मात्र त्रासात.
कर्जाचा वापर कसा केला जातो याला महत्व असतं. कर्ज वापरण्याची क्षमता ऋणकोत असावी लागते. कोणताही व्यवसाय करताना कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेणाऱ्याकडं उद्योग करण्याची क्षमता असेल, योग्य तंत्रज्ञान असेल, उद्योग चालवण्यासाठी आवश्यक योग्य मनुष्यबळ असेल, बाजाराची शक्यता चांगली असेल तर कर्ज फिटायला वेळ लागत नाही. परंतू वरील गोष्टी नसतील तर कर्जाचा उपयोग होण्याची शक्यता कमीच असते. 
व्यक्ती असो, कुटुंब असो, समाज असो. उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालता यायला हवा. मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग संकट काळासाठी ठेवायचा असतो, काही भाग भविष्यात गुंतवणूक अशासाठीही बाजूला ठेवायचा असतो. भविष्यासाठी गुंतवणूक म्हणजे शिक्षण, नव्या जगाशी जुळवून घेणं वगैरे. म्हटलं तर उत्पन्नाची ही सोय सोपी असते. ती कळते पण वळत नाही. माणूस असो की समाज, चार पैसे मिळाले की चैनीकडं माणूस झुकतो. चार पैसे हातात आले मग ते भले कर्जाचे असोत ते पैसे जुगारावर उडवावेसे माणसाला वाटतं. जुगार ही तर गंमतच असते. खिशात पैसे असले तरी माणूस जुगार करतो आणि खिसा रिकामा असला तरी झटक्यात समृद्धीच्या नशेत माणूस जुगार करतो.
ग्रीसमधलं संकट सुरु असतानाच चीनमधेही मंदीचं सावट उभं राहिलं आहे.  चीननं मेहनतीनं पैसा मिळवला खरा पण त्यातला फार पैसा नाहक गुंतून पडला, त्यातून नजीकच्या भविष्यात परतावा मिळण्याच्या शक्यता कमी आहेत. जिथं रहायला जायला कोणी नाही अशा करोडो इमारती उभ्या राहिल्या आहेत, जिथं फिरवायला कार नाहीत असे रस्ते तयार झाले, जिथं कामाला माणसं नाहीत अशी औद्योगिक सोय उभी राहिली.  उद्योगात आणि अर्थव्यवस्थेत एक बुडबुडा प्रचंड गुंतवणुकीमुळं तयार झाला. या बुडबुड्यातून निर्माण झालेल्या अपेक्षा आणि हव्यासातून लोकांनी अब्जावधीची रक्कम शेअर बाजारात धातली. नवा उद्योग उभा रहातो तेव्हां भाडवल गोळा करण्यासाठी बाजारात शेअर्स येतात. त्यात पैसे गुंतवले तर ते उद्योगाच्या उपयोगी पडून उत्पादन सुरु होतं. सुरवातीला बाजारात लोटलेल्या या शेअर्सवर नंतर पैसे गुंतवले जातात तेव्हां ते उद्योगाकडं जात नाहीत, मध्यस्थांकडं जातात. बाजारात आधीच आलेल्या शेअरमधे पैसा गुंतवणं ही व्यवस्थाच मुळात खरी अर्थव्यवस्था नाही, तो जुगार असतो. 
जुगारात एक गंमत असते, थरार असतो. पण थरार ही गोष्ट काही क्षणांपुरतीच असायला हवी. माणसानं थरारावरच जगायचं म्हटलं तर काय होतं? दारुची गंमत असते. माणसानं केवळ दारूवरच जगायचं ठरवलं तर? सेक्सची एक गंमत असते पण सेक्स हेच जगणं करायचं ठरवलं तर?  पटकन,  बाजाराचे नियम-कायदे मोडून एकाचे दहा करणं हा  खटाटोप कोणाच्याच हिताचा नसतो. चीनमधे अनेकांनी भविष्यात उपयोगी पडावे म्हणून साठवलेले पैसे शेअर्समधे लोटले. अनेकांनी कर्ज काढून ते पैसे शेअर्समधे घातले. एका बुडबुड्यावर त्यांनी पैसे लावले. बुडबुडा फुटला. मंदी आणखी गडद झाली.
गुंतवणूक आणि नफा यातलं प्रमाण कायच्या अपेक्षिणं आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टी आर्थिक व्यवहारात फार घातक असतात. वरील दोन्ही दोष भारतात फार दिसू लागले आहेत. 
एका नव्या पैशाचीही गुंतवणूक न करता, गुंजभरही उत्पादन न करता, केवळ काँटॅक्ट्सचा वापर करून अब्जावधी रुपये ललित मोदी नावाच्या माणसाला ज्या अर्थव्यवस्थेत मिळतात ती अर्थव्यवस्था वांध्यात आहे. निवडणुकीत भाग घेण्याच्या आधी मामुली उत्पन्न असणारा माणूस निवडून आल्यावर दर वर्षाला लाख-करोडोनी संपत्ती वाढवत जातो ही गोष्ट भविष्याबद्दल भीती निर्माण करणारी आहे. कारण या देशात लाखो खेडी आहेत, हजारो पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा आहेत, २९ राज्यं आहेत आणि संसदेची दोन सभागृहं आहेत. यात मिळून चार पाच लाख तरी लोकनियुक्त लोक आहेत. ही सर्व माणसं मिळून दर वर्षी किती पैसा भ्रष्टाचारात उभा करतात याची कल्पना करून पहावी.
।।

One thought on “ग्रीस, चीन, भारतही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *