युरोपातलं अटळ स्थलांतर, अडचण आणि आव्हान

युरोपातलं अटळ स्थलांतर, अडचण आणि आव्हान

ऐलान
कुर्डी या छोट्या मुलाचं निश्चेष्ट शरीर समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत पडलेलं
जगानं पाहिलं. खळबळ उडाली. 
ऐलान
कुर्डी, त्याचा भाऊ गालिब, त्याची आई रेहान आणि पिता अब्दुल्ला कुर्डी हे मुळचे
कुर्डिस्तानचे रहिवासी.  कुर्डिस्तान तुर्कस्तान, इराक, इराण,  आर्मेनिया 
या देशांच्या सीमांवर पसरलेला आहे. इस्लाम येण्याच्या आधी  कुर्डांची स्वतंत्र
संस्कृती होती, स्वतंत्र उपासना पद्धती होत्या. इस्लाम स्विकारायला कुर्डांनी
विरोध केला होता. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यांना जबरदस्तीनं अंकित केलं, सुन्नी
केलं. काही कुर्ड शिया झाले.  धर्मांतर
झालं तरी कुर्डांची संस्कृती मुळातलीच राहिली. अरब, तुर्की, पर्शियन संस्कृती
स्विकारायला त्यांनी नकार दिला.
कुर्ड
समाज इराण,इराक, सीरिया,तुर्कस्तान या देशांत विभागलेला आहे. कुर्डाना त्यांचा
स्वतंत्र देश हवाय.
   इराण,
तुर्कस्तान, इराक हे तिन्ही देश कुर्डांना स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत. त्याना
इराकी, इराणी आणि तुर्की देशांनी चालवलेल्या जबरदस्तीला तोंड द्यावं लागतंय.स्वतंत्र
कुर्डिस्तानची चळवळ कुर्ड समाज चालतवतोय. त्यांच्यातला एक गट दहशतवादी वाटेनं
जातोय.
सीरियामधे
चाललेल्या असाद विरोधी लढ्यात, इराकमधेही कुर्डांचं सैन्य अमेरिकेला मदत करतेय.
त्याच्या बदल्यात अमेरिका कुर्डांना स्वातंत्र्य देणार आहे.
  कुर्डिस्तानातली परिस्थिती अतिशय वाईट आहे.
परिणामी अब्दुल्ला त्याचं कुटुंब घेऊन इराकमधे गेला, दमास्कसमधे. मोठं शहर आहे,
राजधानीचं शहर आहे, तिथं रोजगार मिळेल या आशेनं. तर तिथं आणखीनच भयानक स्थिती.
तिथं सरकारच नाही. विविध जिहादी गट मारामाऱ्या करत असतात. या गटाचा नाही तर त्या
गटाचा बाँब घरावर पडणार.
आपलं
कुटुंबं घेऊन, गोळा झालेले चार पैसे घेऊन अब्दुल्ला इस्तंबुलला पोचला. तोवर इराक
आणि सीरियातल्या यादवीचे चटके तुर्कस्तानलाही बसू लागले होते. अब्दुल्लाचं
तुर्कस्तानातलं जगणंही कठीण होऊ लागलं. तोवर सीरिया आणि इराकमधले लोक युरोपात पळू
लागले होते. अब्दुल्लानंही तोच विचार केला.
तुर्कस्तानातून समुद्रातून बोटीनं ग्रीसमधे जायचं. तिथून
मिळेल त्या वाटेनं सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया अशी मजल दरमजल करत जर्मनीत जायचं.
नंतर तिथून जमल्यास कॅनडात जायचं.
येव्हाना तुर्कस्तानात स्मगलरांच्या टोळ्या तयार झाल्या
होत्या. खोटे कागदपत्रं, खोटे पासपोर्ट, खोटे विजा तयार करून देणं, बोटींची
व्यवस्था करून देणं हा उद्योग सुरू झाला होता. अशाच एका स्मगरला अब्दुल्लानं धरलं.
पाचेक हजार डॉलर दिले. जरा जास्तच पैसे दिले. चांगली बोट द्यावी असा विचार करून.
स्मगलरनं एक अगदीच बेकार होडकं दिलं.
अब्दुल्लाचं कुटुंब होडक्यात बसलं. उंच लाटा आल्या.
होडकं उलटलं. स्मगलरनं लाईफ जॅकेट्सही दिली नव्हती. नवरा बायको एकेका मुलाला उंच
धरून नाका तोंडात पाणी जाण्यापासून वाचवत होते. काही तास खटपट चालली. शेवटी कधी
तरी दोघंही थकले, मुलंही थकली. पत्नी रेहाना बुडाली. दोन्ही मुलं बुडाली. त्यांना
शोधता शोधता अब्दुल्ला थकला. किनाऱ्याला लागला.
काही तासांनी ऐलानचं प्रेत किनाऱ्याला लागलं.
अब्दुल्लाचं कुटुंब नष्ट झालं, अब्दुल्ला इस्तंबुलला
परतला. आता  पुन्हा युरोपात जायचा विचारही
तो करणार नाही.  कोणासाठी जगायचं आणि
कोणासाठी युरोपात जायचं असा प्रस्न त्याच्यासमोर आहे.
 अब्दुल्ला मागं
राहिला पण सुमारे 4 लाख  सीरियन, कुर्ड,
इराकी युरोपात पोचले आहेत. आणखी सहा सात लाख माणसं युरोपात स्थलांतरित होण्याची
शक्यता आहे.
सर्वांना जर्मनीत जायचंय. त्यांनी ऐकलंय की जर्मनी
श्रीमंत आहे, तिथं रोजगार मिळेल. जर्मनीच्या राज्यघटनेतच संकटात सापडलेल्या
स्थलांतरिताना आश्रय देण्याची तरतूद आहे.
हंगेरी, ऑस्ट्रिया, सर्बिया, झेक, स्लोवाकिया, ग्रीस,
इटाली, स्पेन इत्यादी देशांची आर्थिक स्थिती चांगली नाही. घरचं झालं थोडं आणि
व्याह्यानं धाडलं घोडं अशी त्यांची स्थिती आहे. ते देश स्थलांतरिताना स्विकारायला
तयार नाहीत, कसंही करून त्यांना घालवून द्यायला ते उत्सूक आहेत.
काही युरोपीय देशांचा आरोप आहे की जर्मन लोकांना देशात विविध कामं करण्यासाठी माणसांची जरूर आहे म्हणून ते या लोकांना घेताहेत. जर्मनीची लोकसंख्या वाढ थांबलीय. तिथं म्हाताऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. काम करणारे तरूण कमी आहेत. कामं आहेत पण ती करायला माणसं नाहीत. म्हणून स्वार्थीपणानं ते स्थलांतरीताना बोलावत आहेत.
 येणारी माणसं
मुस्लीम आहेत.त्यांची संस्कृती आणि सवयी युरोपीय नाहीत.ते आले तर आपली
संस्कृती,जगणं बिघडेल अशी लोकांची प्रतिक्रिया दिसते. दबक्या आवाजात ती
प्रतिक्रिया व्यक्त होतेय. फक्त ब्रिटीश लेबर पार्टीचे नवे अध्यक्ष कॉर्बिन यांनी
अगदी स्पष्टपणे या लोकांना स्वीकारावं अशी मागणी केलीय.
युरोपला
अशा स्थलांतराची सवय नाही. कित्येक शतकं युरोप आणि अमेरिका यांनी आपल्या सीमाभिंती
पक्क्या ठेवल्या होत्या. आता त्या भिंती कोसळू घातल्या आहेत. युरोप, अमेरिका आणि
जगभर या स्थलांतरानं मोठी चर्चा आरंभली आहे.
पश्चिम आशियातले लोक स्थलांतराची  जबाबदारी युरोपवर टाकताहेत. पश्चिम आशियावर
युरोपनं युद्ध लादली. त्यातूनच लाखो असहाय्य माणसं युरोपकडं निघालीत. आणि ही
जबाबदारी नाकारून युरोप स्थलांतरितांना घालवून देतंय असा पश्चिम आशियातल्या
लोकांचा आरोप आहे.
“  युरोपीय आणि ख्रिस्ती समाज
असहिष्णु आहे, वंशद्वेष्टा आहे,  स्वार्थी
आहे.  त्याला केवळ स्वतःचं भलं करायचं आहे.
तेलाचा शोध लागल्यानंतर या समाजानं पश्चिम आशियातल्या देशांवर कबजा केला,तेल
मिळवलं, पश्चिम आशियातला समाजात दुही पसरवली, त्याना मागास ठेवलं,त्यांचं शोषण
केलं. इराक आणि सीरियातल्या यादवी आणि हिंसेला युरोप-अमेरिका जबाबदार आहेत.
इराकमधे अमेरिकेनं आणि ब्रीटनने घुसण्याची आश्यकता नव्हती, इराकमधे अल कायदाचं
अस्तित्व अजिबात नव्हतं, केवळ सद्दामची राजवट उलथवण्यासाठी अमेरिका-ब्रिटन तिथं
घुसलं. पश्चिमी समाज इस्लाम विरोधी आहे, इस्लाम खतम करायला निघालाय.”  असे आरोप होताहेत.
 दुसरे देश काबीज करणं, दुसऱ्या देशांवर आक्रमणं
करणं, दुसरे समाज आणि देश लुटणं अशी परंपरा सिविलायझेशनच्या निर्मितीपासून चालत
आलेली आहे.
पहिल्या
शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत जगभरचे सर्व समाज दुसऱ्या समाजांवर आक्रमणं करून
स्वतःची संपत्ती वाढवत आले आहेत. ख्रिस्ती राजांनी तेच केलं आणि इस्लामी राजांनीही
तेच केलं. स्वतःच्या समाजात स्वतंत्रपणे आर्थिक विकास करण्याची कल्पनाच त्या काळात
विकसित झालेली नव्हती. शेतकरी शेती करीत, विविध कसबांची माणसं विविध  वस्तू तयार करीत. पण तेवढ्यावर भागत नव्हतं. दुसरे
समाज काबीज करणं, त्यांना लुटणं, त्यांच्याकडली संपत्ती हस्तगत करणं हीच जगण्याची
वाट त्या काळात प्रचलित होती. कोणताही समाज याला अपवाद नाही. ख्रिस्तींनी इस्लामी
समाजावर आक्रमणं केली आणि इस्लामी लोकांनीही ख्रिस्तींवर आक्रमणं केली. आपला समाज
थोर आणि इतर कमी प्रतीचे या आधारावरच ख्रिस्ती आणि इस्लामी धर्म वाढले.
तेव्हां
अन्याय सर्व समाजांनी वेळोवेळी केले आहेत.
पंधराव्या
शतकापासून पश्चिमी समाजानं विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगीकरण या क्षेत्रात आघाडी
घेतली आणि तुलनेत पूर्वेतले, इस्लामी समाज मागं पडले. पश्चिमी समाजानं आपल्या
अर्थव्यवस्था मजबूत केल्या आणि छुप्या वाटेनं जगावर आपलं वर्चस्व स्थापण्याचा
प्रयत्न केला. पश्चिम आशिया जसा अंकित केला तसंच भारतीय उपमहाद्वीपही काबीज केलं.
तंत्रज्ञान, उत्पादन तंत्रं, व्यापारतंत्र इत्यादी गोष्टींच्या वाटेनं पश्चिमी
समाजानं जगावर आपला प्रभाव टाकला.
क्रुसेड्सच्या
काळात, इस्लामी विस्ताराच्या काळात सैन्य वापरलं जात असे. आता पैसा, तंत्रज्ञान,
व्यवस्थापन ही तंत्रं वापरली जातात. आता  पहिल्या ते बाराव्या शतकात झालेल्या लष्करी
कारवायांच्या तुलनेत खूपच कमी बळाचा वापर करून 
देशांवर वर्चस्व स्थापलं जातं.
या
खेळात अरब,आखाती,इस्लामी समाज कमी पडले.इस्लामी समाज आधुनिक झाले नाहीत. इस्लामी
समाज सातव्या शतकातच अडकून राहिला. धर्माच्या वेड्या कल्पनांना चिकटून राहिला.
पश्चिमी समाजानं केलेली बळजोरी आणि अन्याय यांना तोंड देण्याची क्षमता इस्लामी
समाजात निर्माण झाली नाही. विकासाचं सामाजिक आणि आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर इस्लामी
समाजात तयार नसल्याचा फायदा पश्चिमी समाजाला मिळाला.
आज
सीरिया, इराक, अफगाणिस्तान इत्यादी देशातल्या लाखो माणसांना युरोपकडं जावं लागतंय
याची  50 टक्के जबाबदारी खुद्द इस्लामी
समाजाचीही आहे . शिया आणि सुन्नी एकमेकांचे जीव घाऊकपणे कां घेतात? इस्लामी
नसलेल्या लोकांना आपल्या समाजात कां सामावून घेत नाहीत? युरोपीय
लोक सामावून घेत नाहीत अशी तक्रार करणारे मुस्लीम लोक आपल्या समाजात
ख्रिस्ती,हिंदू, ज्यू इत्यादीना सामावून घेत नाहीत त्याचं काय?  इराण-सौदी आपसात कां भांडतात? येमेनमधे सौदी बाँबवर्षाव
कां करतं? गंमत अशी की आपसातल्या मारामाऱ्यामधे त्यांना युरोपीय देशांची मदत आणि
शस्त्रं  लागतात. सद्दाम, असद हे झोटिंगशहा
आपल्याच देशातल्या मुसलमानांचं कांडात काढत असतात.आणि आयसिस. ते तर पश्चिमी नाहीत.
तालिबान, अल कायदा, आयसिस या लोकांनी पश्चिमी समाजाच्या तुलनेत इस्लामचं अधिक
अकल्याण केलं आहे.
सीरिया, इराक इत्यादी ठिकाणच्या लोकांना स्थलांतर करावं
लागतं यामधे पश्चिमेची जबाबदारी कितपत? काही प्रमाणात  आहे. पण सर्वस्वी नाही. पश्चिमी समाजानं
पूर्वेतल्या देशात पुरेशी विधायक कामं केली नाहीत. अमेरिका दहा वर्षं
अफगाणिस्तानात होती. तिथं कॉलेजं काढली नाहीत, विद्यापीठं काढली नाहीत, चांगली
हॉस्पिटलं काढली नाहीत. अमेरिकेनं पाकिस्तानात अब्जावधी डॉलर ओतले.शस्त्रांच्या
रुपात. पाकिस्तानला आधुनिक व्हायला अमेरिकेनं मदत केली नाही. पाकिस्तानातल्या
हुकूमशहांना अमेरिकेनं पाठीशी घातलं, तिथं लोकशाही मजबूत करायला मदत केली नाही. ही
अमेरिकेची आणि ब्रिटनची चूक. परंतू आपले समाज सुधारण्याचे प्रयत्नही अफगाणिस्तान,
पाकिस्तान, सीरिया, इराक इत्यादी देशांनी केले नाहीत, हेही ध्यानात घ्यायला हवं.
 सीरिया,
इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातली परिस्थिती बिकट आहे. अगतीक झालेल्या माणसांना
स्थलांतरित होण्यापलिकडं दुसरी वाटच तिथल्या समाजानी, सरकारानी ठेवलेली नाही.
उद्या पाकिस्तानातून भारतात लोंढे आले तर आश्चर्य वाटायला नको.
स्थलांतर त्रासाचं असलं तरी अटळ दिसतंय. स्थलांतरित
युरोपात रहाणार. तिथं भविष्यात अडचणी तयार करणार. युरोपीय संस्कृतीशी न जुळवून
घेता सातव्या शतकात जायचा प्रयत्न करणार. हेही अटळ नसलं तरी शक्य दिसतय. तरीही
स्थलांतरांना सामावून घेण्यावाचून गत्यंतर दिसत नाहीये.
चिनी माणसं आफ्रिकेत पोचली आहेत. तुर्की जर्मनीत गेले
आहेत. आता युरोपीय नसलेली माणसं युरोपात जाणार आहेत. जगभरच विविध  माणसं एकत्र येत आहेत. एक नवी स्थिती तयार
होतेय. या स्थितीत एक नवा समाज घडवावा लागणार आहे.नाना प्रकारच्या माणसांनी एकत्र
रहाण्याची सवय लावावी लागणार आहे.
वसुधैव कुटुंबकम ही कल्पना याही वाटेनं खरी ठरतेय.   
सीरिया, इराकमधल्या लोकांना आश्रय देण्यावाचून युरोपला
गत्यंतर नाहीये.  
 हे संकट समजून
घेऊन ही पाळी कोणावरही येऊ नये याची काळजी युरोपबरोबरच जगातल्या सर्व देशांना
घ्यावी लागेल.
सीरिया आणि इराकमधून माणसं स्थलांतरित होणार नाहीत याची
जबाबदारी सीरिया आणि इराकलाही उचलावी लागेल.
विविध संस्कृती आणि धर्माच्या समाजांना सहजीवनाची सवय
लावून घ्यावी लागेल.
।।

5 thoughts on “युरोपातलं अटळ स्थलांतर, अडचण आणि आव्हान

  1. विस्तृत आणि माहितीपूर्ण. समस्या अवघड आहे आणि मानवी समाजांच्या कासोटीची. संकुचितपणाचा रोग सार्वत्रिक झाला आहे… हे खर.

  2. It is surprising that Europe is blamed for inability of Islam to change with time. Those expecting Europe to accommodate refugees , will allow beggars and poor of their town to invade their houses.

  3. मुस्लीम पक्षपाती म्हणजे काय ते मला समजलं नाही. युरोपात स्थलांतरित होणारी माणसं मुस्लीम आहेत. त्यांच्या देशात त्यांनीच निर्माण केलेल्या संकटामुळं ती स्थलांतरित होत आहेत. लोंढा येवढा आहे की तो रोखणं शक्यच नाही. तो मर्यादित करणं आणि आलेल्या लोकांना थोड्या काळासाठी किंवा कायमसाठी स्वीकारणं ही एक वाट असते. या माणसाचं मुस्लीम असणं युरोपीय संस्कृतीला आणि धार्मिकांना अडचणीचं आहे. स्थलांतरित माणसं कालबाह्य इस्लामी कल्पनाना चिकटून बसली तर ती युरोपची पंचाईत करणार आहेत. मुस्लीमांनी कालसुसंगत होणं ही दीर्घकालीन आणि किचकट प्रक्रिया आहे, ती केव्हां कशी पूर्ण होईल ते सांगता येत नाही. पण तोवर या माणसांचं काय करायचं? ७२-७४ च्या काळात मराठवाड्यातली, बिहारातली, ओरिसातली माणसं मुंबईत आली. धर्माच्या हिशोबात ती हिंदू असली तरी भाषा-आचरण-दैनंदिन जगणं इत्यादी अनेक बाबतीत ती मुंबईच्या संस्कृतीशी समरस होणारी नव्हती. शिवाय त्यांना स्वीकारण्याची क्षमताच मुंबईत नव्हती. पण इलाज नव्हता. ती माणसं जाणार तरी कुठं? त्यांना मुंबईत यावं लागणं हे राज्याचं आणि देशाचं एक ऐतिहासिक अपयश होतं. पण तरीही त्यांना सामावण्यावाचून गत्यंतर नव्हतं. युरोपात तसं आणि धार्मिक याचं मिश्रण आहे. आपण व्यक्तिगत काहीही बोलणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सरकार म्हणून निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करणं ही एक स्वतंत्र गोष्ट आहे.
    सेक्युलर असणं म्हणजे गुन्हा आहे की काय? धर्म ही गोष्ट सार्वजनिक व्यवहारापासून दूर रहावी असं मानणं यात काय गुन्हा आहे मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीकडं धर्माच्या दृष्टिकोनातूनच पहायला पाहिजे असं नाही. माणसाच्या जगण्याला आर्थिक, बाजार, तंत्रवैज्ञानिक, वैज्ञानिक, भाषा, विभाग इत्यादी अनंत पैलू असतात. धर्म हा त्यातला एक पैलू असू शकतो. स्थलांतरीत माणसं मुसलमान आहेत, सीरियन आहेत, गरीब आहेत, संकटग्रस्त आहे, अरब किंवा तुर्की आहेत, अरब किंवा आशियन आहेत, साधनहीन आहेत, त्यांना किती तरी पैलू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *