माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया
नऊ मे या दिवशी जगभर अनेक संघटना आणि माणसं मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाच्या रोगाशी झुंज देण्याचा निर्धार करत असतात. मल्टिपल स्क्लेरॉसिस. माणसाच्या मज्जातंतूवरचं आवरण नष्ट होण्यानं निर्माण होणारी व्याधी. माणसाच्या शरिरातील मज्जातंतू शरीरभर संदेश वहन करत असतात. मेंदूपासून विविध स्नायूंपर्यंत. स्नायूंपासून मेंदूपर्यंत. माणसाच्या डोळ्याला टेबलावरचा चहाचा कप दिसतो. त्याच्या नाकाला चहाचा वास येतो. नाक आणि डोळे त्यांची संवेदना मेंदूला कळवतात. माणसानं आधी कित्येक वेळा चहा प्यालेला असल्यानं चहाची चव आणि वास मेंदूनं साठवलेला असतो. आवडीचा आणि परिचयाचा असल्यानं हा चहा प्यायला…